Sugarcane Farming:- कुठल्याही पिकाचे भरघोस उत्पादन हवे असेल तर त्याचे व्यवस्थित व्यवस्थापन आणि ते देखील वेळेला होणे खूप गरजेचे असते. जितके व्यवस्थापन उत्तम असेल तितके त्या पिकापासून भरघोस उत्पादन मिळण्याची शक्यता अधिक असते. ही बाब प्रत्येक पिकाला जशी लागू होते तशीच ती ऊस पिकाला देखील लागू होते.
तसेच दुसरा मुद्दा म्हणजे जर एखाद्या गोष्टींमध्ये आपण कित्येक वर्षापासून काम करत असलो तर आपल्याला त्यातील सगळी खाचखडगे व बारकावे समजतात व कालांतराने आपण त्या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर यशस्वी होतो व तीच बाब शेतीला देखील लागू होते. अगदी या दोन्ही मुद्द्यांना धरून जर आपण सांगली जिल्ह्यातील हिंगणगाव बुद्रुक या गावच्या विठ्ठल खराडे या शेतकऱ्याची यशोगाथा पाहिली तर ती या दोन्ही मुद्द्यांना साजेशी आहे.

घरची वडीलोपार्जित साडेतीन एकर शेती आणि कायम त्या ठिकाणी असलेले पाणीटंचाई यामुळे कोरडवाहू शेती त्यांच्याकडे होती. या परिसरामध्ये टेंभू योजना आली आणि शेतीचा कायापालट झाला. पाण्याची सोय झाल्यामुळे खराडे यांनी नऊ एकर शेती कराराने घेतली व 2011 सालापासून ते त्यावर आडसली ऊस तसेच आले ही पिके घेतात.
यामध्ये जवळपास तीन एकर लागवडीचा ऊस व तीन एकर खोडवा व दीड एकरामध्ये निडवा ऊस असतो व प्रामुख्याने उसाच्या को 86032 या वाणाची लागवड करतात. विशेष म्हणजे या शेतकऱ्याने ऊस शेतीत मास्टरी मिळवली असून एकरी 100 टन ऊस उत्पादन घेण्यामध्ये त्यांनी सातत्य ठेवलेले आहे. त्यामुळे या लेखामध्ये ते ऊस पिकाचे नियोजन कसे करतात? त्याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत.
ऊस शेती संबंधीचे प्रशिक्षण आले कामाला
त्यांनी जेव्हा ऊस शेती करायची असा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी इतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून माहिती घेतली व त्याबाबत प्रेरणा मिळवत त्या शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीने व्यवस्थापन केले होते त्या पद्धतीने सगळे व्यवस्थापन करायचे ठरवले. यामध्ये एक टर्निंग पॉईंट असा ठरला की सन 2016 मध्ये सोनहिरा साखर कारखान्याच्या माध्यमातून मांजरी येथे वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट या ठिकाणी ऊस शेती संबंधित प्रशिक्षणाची संधी त्यांना मिळाली व त्यांनी त्या ठिकाणी प्रशिक्षण घेतले
. त्यामध्ये त्यांनी जे काही ज्ञान मिळवले त्याचा पूर्ण वापर ऊस शेतीमध्ये केला. गेल्या 14 वर्षापासून सतत ऊस शेती संबंधी अनुभव मिळवत त्यांनी आज ऊस उत्पादनामध्ये कौशल्य मिळवले आहे.इतकेच नाहीतर गेल्या काही वर्षांपासून एकरी शंभर टन ते त्यापेक्षा जास्त ऊस उत्पादन मिळवण्यामध्ये देखील त्यांनी सातत्य ठेवले आहे.
असे करतात ऊस व्यवस्थापन
1- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ते लागवडीकरिता दर्जेदार आणि खात्रीशीर व निकोप अशा ऊस बेण्याची निवड करतात. बेण्याकरिता प्रामुख्याने 10 महिने वय झालेल्या उसाचा वापर ते करतात व एक किंवा दोन डोळा पद्धतीचा लागवडीसाठी वापर करतात.
2- साडेचार फूट सरीचा वापर लागवडीकरिता होतो व दोन डोळ्यांमध्ये एक फुटाचे अंतर ते ठेवतात.
3- महत्वाचे म्हणजे ऊस लागवड करण्यापूर्वी त्या जमिनी ते हिरवळीचे खत म्हणून तागाची लागवड करतात व दीड महिन्यांनी तो जमिनीमध्ये काढून देतात.
4-विशेष म्हणजे लागवड, खोडवा व निडवा घेऊन झाल्यानंतर मात्र पुढच्या वर्षी ते ऊस पिक न घेता त्या जमिनीला पूर्णपणे विश्रांती देतात.
5- पिकांची फेरपालट करण्यावर त्यांचा भर असतो व फेरपालटासाठी ते हरभरा तसेच शाळु व आले या पिकांचा समावेश करतात.
6- जेव्हा ते ऊस शेती तयार करण्यासाठी नागरणी करतात तेव्हा नांगरट करण्यापूर्वी एका वर्षाआड एकरी आठ ट्रॉली शेणखत वापरतात.
7- जेव्हा ऊस पिकाला मोठी भरणी करण्याची वेळ येते तेव्हा कोंबडी खताचा एकरी 40 ते 60 गोणी अशा पद्धतीने वापर करतात.
8- तसेच जानेवारीमध्ये पाला काढला जातो व तो सरीतच ठेवला जातो. असे केल्याने फायदा असा होतो की पाण्याचे बाष्पीभवन होत नाही व जमिनीत ओलावा टिकून राहतो.
9- जो ऊस गाळपाला जाणार आहे त्याची संख्या 43 हजार ते 45000 पर्यंत मर्यादित ठेवली जाते.
किती मिळवले उसाचे उत्पादन?
सन 2020 मध्ये त्यांनी एकरी तब्बल 127 टन उत्पादन घेतले होते व कारखान्याकडून त्यांचा गौरव देखील करण्यात आलेला होता. अलीकडे काही वर्षांमध्ये त्यांनी लागवडी उसाचे एक ते शंभर टन उत्पादनात सातत्य ठेवले आहेच. परंतु खोडवा उसाचे ते ६० ते ७० जणांच्या आसपास उत्पादन घेतात. साधारणपणे 80 हजार रुपये एकरी त्यांना उत्पादन खर्च येतो व कारखान्याकडून प्रति टन 3100 पर्यंत दर त्यांना मिळत आहे.