अहमदनगरच्या राजकारणात पवार साहेबच किंगमेकर ! यंदा तरुणांवर लावणार डाव

Ahmednagarlive24
Updated:

नगर जिल्हा हा शरद पवारांचा बालेकिल्ला. समोर कुणी असो, शरद पवारांनी डोक्यावर हात ठेवला तर विजय निश्चित. हे समीकरण गेल्या कित्येक वर्षांपासून नगरकरांना माहिती आहे. बारामतीला लागून असल्याने पवारांचे येथे विशेष लक्ष. विखे वगळता या तालुक्यातील इतर अनेक प्रमुख नेते, हे पवारांच्या तालमीतच तयार झालेत. पवारांनी हात धरल्यावर थेट खुर्चीवर बसता येतं याचं ताजं उदाहरण म्हणजे खा. निलेश लंके. तसंच पवारांनी हात सोडल्यावर खुर्चीच काय, पण सगळंच गमवावं लागतं याचं उहादरण म्हणजे अकोल्याचं पिचड कुटुंब. सहकाराचा जिल्हा असल्याने पवारांनी नगरमध्ये कायम सर्वसमावेशक राजकारण केलं. येथील प्रस्तापितांना न दुखवता, पवारांनी विस्तापितांच्या हातीही अनेकदा सत्तेच्या चाव्या दिल्या. आताही वयाच्या 83 व्या वर्षी शरद पवारांचं नगरवर विशेष लक्ष आहे. नगर जिल्ह्यातील बाराही जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी पवारांनी टाईट फिल्डिंग लावलीय. यावेळी पवार साहेब व्हाईट वाँश देतील का, हे पहाणे मनोरंजक ठरेल..

सहकारातही पवारांचाच वाटा
नगर जिल्हा हा सहकाराचा. येथे तब्बल 19 साखर कारखाने आहेत. पवारांनी कायम या साखर सम्राटांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेतली. साखर उद्योगाला उर्जितावस्था देण्याच्या येथील कारखानदारांच्या प्रत्येक प्रयोगात, पवारांनी अनेकांना मोलाची साथ दिली. गडाख, घुले, काळे, कोल्हे, राजळे, थोरात, मुरकुटे या उत्तरेतील सगळ्या साखर सम्राटांनी कधी ना कधी, पवार साहेबांची मदत घेतलीय. राजकारण असो व सहकार, नगरच्या प्रगतीत पवारांचाही वाटा आहेच. मात्र तरीही पवारांची जादू यावेळी चालेल का, हे पहावे लागणार आहे.

विखेंसोबत पाठशिवणीचा खेळ
नगर जिल्ह्यातील चौदाही तालुक्यात शरद पवार साहेब कित्येक कार्यकर्त्यांना नावानिशी ओळखतात. सत्ता असो वा नसो, पवार फॅक्टरशिवाय नगरचे राजकारण पूर्ण होत नाही. नगर जिल्ह्यात पवारांनी कायम विखेंशी स्पर्धा केली. या लढाईत कधी विखे जिंकले तर कधी पवार. मात्र पवारांना या जिल्ह्यावर विखेंना कधीही एकहाती वर्चस्व प्रस्तापित करु दिलं नाही. दुसऱ्याच्या नातवाची जबाबदारी मी का घ्यावी, म्हणत त्यांनी सुजय विखेंना काँग्रेस सोडायला लावली हा इतिहासही आहे. त्याच विखेंनी गेल्यावेळी पवारांचा पठ्ठ्या पराभूत केला. मात्र त्याची भरपाई पवारांनी लगेच यावर्षी केली. निलेश लंकेंसारखा सामान्य कार्यकर्त्याला संधी देऊन पवारांनी विखेंना पराभूत केलं.

लोकसभेच्या दोन्ही जागांवर विजय
स्थानिक स्वराज्य संस्थांपासून आमदारकी खासदारकीपर्यंतच्या नगरमधील सगळ्या निवडणुका या पवारांशिवाय पूर्ण होत नाहीत. 1978 ला केलेला पुलोदचा प्रयोग किंवा 1999 ला केलेली राष्ट्रवादीची स्थापना, या सगळ्या घडामोडीत नगर जिल्ह्यातील अनेक मोठे नेते शरद पवारांसोबत राहिले. शरद पवारांना जसा नगर जिल्ह्यावर जिव्हाळा आहे तसाच जिल्ह्यालाही पवारांना विश्वास आहे. त्यामुळेच गेल्यावर्षी राष्ट्रवादीत तोडफोड होऊन व दोन्ही खासदार महायुतीचे असूनही, पवारांनी यावेळी नगर जिल्ह्यातील दोन्ही जागांवर आपले उमेदवार निवडून आणले.

रोहितदादांचा डाव जिंकला
राष्ट्रवादीचा रौप्यमहोत्सवी मेळावा पवारांनी नगरमध्ये घेतला. शिवाय त्यापूर्वी पक्षाचे अधिवेशनही त्यांनी नगरमध्ये घेतले. पवारांना नगरकरांवर विश्वास आहे, आणि येथील सच्चा कार्यकर्त्यांवरही विश्वास आहे, याचेच ते द्योतक होते. गेल्यावेळीच्या विधानसभेला केंद्रात मोदी लाट असतानाही पवारांनी आपले सहा उमेदवार निवडून आणले होते. त्यात कर्जत-जामखेडला उभा केलेला आपला नातू रोहित पवारही होता. कर्जत-जामखेडमध्ये सलग चार टर्म असलेली भाजपची सत्ता पवारांनी उलथवून टाकली होती. अगदी परफेक्ट फासे टाकत, पवारांनी आयुष्यातील पहिली निवडणूक लढविणाऱ्या रोहित पवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणले होते.

पहिला तरुण उमेदवार जाहिर
गेल्या विधानसभेला पवारांनी नगर जिल्ह्यात जादूची कांडी फिरवली होती. विधानपरिषदेचे उपाध्यक्ष राहिलेले विजय औटी, पालकमंत्री राहिलेले राम शिंदे, माजी मंत्री असलेले अनिलभैय्या राठोड, माजी मंत्री राहिलेले शिवाजी कर्डीले, घरात कित्येक वर्षे मंत्रीपद असलेले वैभव पिचड आणि साखर सम्राट असलेल्या स्नेहलता कोल्हेंचा पराभव हा केवळ शरद पवारांमुळेच होऊ शकला होता. यावेळीही शरद पवारांना महाविकास अघाडीकडून किमान पाच किंवा सहा जागा मिळणार आहेत. या सहाही जागांवर पवारांचे पारडे सध्यातरी जड दिसतेय. गेल्याच आठवड्यात अकोल्यात येत त्यांनी अमित भांगरे या तिशीतील युवकावर आपला पहिला डाव लावला.

पाच किंवा सहा जागांवर विजयी डाव
त्यापूर्वी कवठे महांकाळमध्ये रोहित पाटील या पंचवीशीतील उमेदवाराला पवारांनी आपला पहिला उमेदवार म्हणून घोषित केला. त्यामुळे पवारांची रणनिती ठरल्याची चर्चा आहे. येत्या विधानसभेला शरद पवार हे युवा चेहऱ्यांवर डाव लावतील, याचा अंदाज आहे. शरद पवार गटाकडे राहुरीची जागा जाण्याची शक्यता आहे. तेथील आमदार प्राजक्त तनपुरे, हे 47 वर्षांचे आहेत. शरद पवारांचा युवा नेत्यांवर निवडणूक लढण्याचा प्लॅन पाहता, यावेळीही तनपुरेंचं तिकीट फिक्स समजलं जातं. दुसरी जागा आहे, कर्जत-जामखेडची. तेथील आमदार रोहित पवार हे 38 वर्षांचे आहेत. त्यांचही तिकीट फिक्स समजलं जातंय. शरद पवारांकडे तिसरी जागा जाणार ती पारनेरची. तेथ निलेश लंके हे आमदार होते. मात्र त्यांनी लोकसभेसाठी राजीनामा दिला. निलेश लंके हेही 44 वर्षांचे आहेत. पवारांचा युवा चेहऱ्याचा शोध पाहता, पारनेरमध्येही चाळीशीच्या आसपास असणाऱ्या राणीताई लंकेंच्या नावाचा विचार होण्याची शक्यता वाढते. शेवगाव-पाथर्डीचा विचार केला तर शरद पवार गटाचे संभाव्य उमेदवार प्रताप ढाकणे हेच फक्त पन्नाशीतले आहेत.

मात्र त्यांच्यासोबत असलेल्या तरुणांचा संच पाहता, त्यांच्याही उमेदवारीवर नक्कीच शिक्कामोर्तब होऊ शकतं. याशिवाय नगर किंवा श्रीगोंद्याची जागाही शरद पवार गटाकडे येऊ शकते. नगरमध्ये अभिषेक कळमकर आणि श्रीगोंद्यात राहुल जगताप हे दोन तरुण उमेदवार पवारांकडे आहेत. यावेळी पवारांचे फासे नेमके कसे पडतात, हे येण्याऱ्या काळात समजणार आहेच. मात्र तरीही विखेंबरोबरच अजित पवार गट अशी दुहेरी लढत पवारांना यावेळी द्यावी लागणार आहे, हे नक्की…महाविकास आघाडीतील जागावाटपानंतर राष्ट्रवादी, ठाकरे गट व काँग्रेसचे उमेदवार कळणार आहेत. गेल्यावेळी पवारांना आठपैकी सहा जागांवर विजय मिळवला होता. यावेळच्या विधानसभेला पवार काय करतात, हे पहाणे पहिल्यापेक्षा जास्त मनोरंजक ठरणार हे मात्र नक्की

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe