एकेकाळी दुसऱ्याच्या शेतात मजुरी, शिक्षण 7 वी पास पण आज देशी गाय पालनातून वाढवला १२३ देशांमध्ये व्यवसाय! वर्षाला 6 कोटींची उलाढाल

Ajay Patil
Updated:
rameshbhai rupareliya

एखादा व्यवसाय सुरू करणे आणि त्या व्यवसायाच्या संबंधाने इतर काही उत्पादने किंवा व्यवसाय सुरू करून तो व्यवसाय विस्तारणे ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. शेती म्हटले म्हणजे शेतीसोबत अनेक प्रकारचे जोडधंदे केले जातात व त्यामध्ये पशुपालन हा व्यवसाय भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो.

पशुपालन व्यवसायामध्ये गाय व म्हशींचे पालन हे प्रामुख्याने दूध उत्पादनाच्या दृष्टिकोनातून केले जाते व हे दूध उत्पादन हा पशुपालन व्यवसायाचा प्रमुख आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत किंवा कणा असतो. यामध्ये जर आपण गाय पालनाचा विचार केला तर यात संकरित आणि देशी गाईचे पालन मोठ्या प्रमाणावर होते.

अशा गाईपालनातून आता बरेच शेतकरी दुधाचे उत्पादन तर घेतातच. परंतु त्यापासून अनेक उत्पादने बनवून व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढवतात. अशाच प्रकारे गुजरात राज्यातील राजकोट जिल्ह्यातील गायपालक रमेशभाई रुपारेलिया यांचे उदाहरण आपल्याला घेता येईल.

एकेकाळी मजूर म्हणून काम करणाऱ्या या शेतकऱ्याने आज देशी गाईंच्या संगोपनातून करोडपती होण्यापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे व 123 पेक्षा जास्त देशांमध्ये त्यांनी तयार केलेली उत्पादने आज विकली जातात.

 रमेशभाई रूपारेलिया यांचा जीवन प्रवास

अत्यंत गरीब कुटुंबामध्ये जन्मलेले रमेशभाई यांचे शिक्षण फक्त सातवी पर्यंत झालेल्या असून घरची गरीबी असल्यामुळे काही कारणाने वडिलोपार्जित जमीन देखील विक्री करण्याची वेळ त्यांच्यावर आली. शेवटी पोटाची खळगी भरण्यासाठी दुसऱ्याच्या शेतात मजुरी म्हणून देखील काम करावे लागले व महत्वाचे म्हणजे दुसऱ्या शेतकऱ्यांच्या गाई राखण्याचे काम देखील त्यांनी केले.

परंतु 2010 मध्ये त्यांनी भाड्याने जमीन घेऊन शेती करायला सुरुवात केली. परंतु रासायनिक खते घेणे परवडत नसल्यामुळे त्यांनी शेणखत वापरावर भर देऊन शेती सुरू केली. रासायनिक कीटकनाशकांऐवजी नैसर्गिक पद्धतीने तयार केलेली पेस्ट कंट्रोल म्हणजेच कीटकनाशक तयार करून त्यांचा वापर शेतीत केला व हळूहळू त्यांना यामध्ये यश मिळायला लागले. म्हणजे त्यांनी नैसर्गिक पद्धतीने शेती करायला सुरुवात केली व या शेतीतून त्यांना चांगला नफा मिळायला लागला.

कालांतराने त्यांनी स्वतःचे चार एकर जमीन घेतली आणि सेंद्रिय शेती करण्यासोबतच गाय पालनाचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला व तो सुरू देखील केला. गाईंचे पालन करण्यासाठी  त्यांनी कमी आहारात जास्त दूध देण्यास सक्षम असलेल्या गीर आणि इतर देशी गाईंचे संगोपन सुरू केले.

त्यामध्ये गिर गाईची निवड यासाठी केली की ही गाय विविध उष्ण कटिबंधीय प्रदेशामध्ये जे काही पशुंना रोग होतात त्यांना चांगली प्रतिरोधक असते व तिचे दूध देखील उच्च दर्जाचे असते. त्यासोबतच सेंद्रिय पद्धतीने शेती करताना शेण आणि गोमूत्र पासून खते आणि कीटकनाशके तयार केली गेली व त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढली आणि पिकाची गुणवत्ता देखील वाढली.

याबाबत बोलताना रमेशभाई रूपारेलिया यांनी सांगितले की, लोकांना आता स्थानिक देशी गाईचे दूध आणि त्यांच्या नैसर्गिक उत्पादनाबद्दल जागरूकता निर्माण होत आहे व हेच पाहून त्यांनी नैसर्गिक पद्धतीने डेअरी फार्म सुरू करण्याचे निश्चित केले व आज त्यांच्याकडे 250 पेक्षा जास्त गिर गाई आहेत.

विशेष म्हणजे या गाईंना जो काही चारा पुरवला जातो तो देखील पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने पिकवला जातो. ते आज या देशी गाईच्या दुधापासून अनेक प्रकारचे उत्पादने तयार करतात व परदेशामध्ये त्यांना प्रचंड मागणी असून परदेशात विकतात.

छोट्या स्वरूपात सुरू केलेला त्यांचा हा व्यवसाय हाच 123 देशांमध्ये पसरला आहे व दरवर्षीचे सहा कोटींची उलाढाल या माध्यमातून करत आहेत. यामागे निश्चितच त्यांचे कष्ट तसेच ध्येय साध्य करण्यासाठी करावी लागणारी व्यवस्थित प्लानिंग आणि सातत्य या जोरावर त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

 250 गाईंपासून वार्षिक सहा कोटी रुपयांचा व्यवसाय

आज त्यांच्याकडे 250 पेक्षा जास्त गीर गाई आहेत व त्यांचा चारा पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने पिकवला जातो. त्यांनी इतके उत्तम नियोजन ठेवले आहे की त्यांचा या गाईंचा गोठा पाहण्यासाठी देश विदेशातून लोक येतात. विशेष म्हणजे त्यांच्या या फार्मवर उत्पादित होणारे दूध, ताक तसेच लोणी आणि तुपाला खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.

विशेष म्हणजे रमेशभाई यांच्या गाईंच्या गोठ्यात बनवलेल्या तुपाला खूप मागणी आहे व त्यांनी बनवलेले विशेष प्रकारचे तूप 51 हजार रुपये किलोपर्यंत देखील विकले जाते व परदेशांमध्ये याला प्रचंड मागणी आहे. त्यांचा हा छोट्या प्रमाणावर सुरू केलेला व्यवसाय 123 देशांमध्ये पसरला आहे.

रमेशभाईनी उत्पादनांचे विशिष्टता आणि गुणवत्ता लक्षात घेऊन हे उत्पादने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आणली व त्यासाठी लागणारी आवश्यक प्रमाणपत्रे आणि परवाने मिळवले. तसेच या उत्पादनांना योग्य पॅकेज आणि लेबलिंग करून  फेसबुक आणि youtube सारखा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या पद्धतीने स्वतःच मार्केटिंग सुरू केले व त्यामुळे त्यांचे उत्पादने लोकांपर्यंत पोहोचली व विक्री वाढली.

रमेशभाई यांचे शिक्षण जरी कमी असले तरी आधुनिक शिक्षण आणि तंत्रज्ञानाचे महत्त्व त्यांना कळते. आज ते कम्प्युटर शिकून कॉम्प्युटर ऑपरेट करण्यात देखील तज्ञ आहेत.

त्यांचे स्वतःच्या वेबसाईट आणि यूट्यूब चैनल आहेत व या माध्यमातूनच ते त्यांच्या कामाची आणि उत्पादनाची जाहिरात मोठ्या प्रमाणावर करतात. जिद्द आणि योग्य मार्गदर्शन घेऊन जर आपण पुढे गेलो तर जागतिक स्तरावर देखील आपल्याला यश मिळवता येते याचे उत्तम उदाहरण रमेशभाईंचे घेता येते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe