Farmer Success Story:- शेतकरी आत्महत्या हा एक गंभीर आणि ज्वलंत प्रश्न असून महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्याचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावर आहे. जास्त करून हे प्रमाण मराठवाडा आणि विदर्भात दिसून येते. वारंवार येणारा अवकाळी पाऊस तसेच गारपीट व अतिवृष्टीचे संकट इत्यादीमुळे हातातोंडाशी आलेले उत्पन्न शेतकऱ्याकडून हिरावून नेले जाते व शेतकरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणीत सापडतो.
तसेच सरकारची बरीच धोरणे देखील शेतकऱ्यांना मारक असल्याने आर्थिक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांची परिस्थिती खूपच वाईट झाल्याने कर्जबाजारीपणा वाढीस लागून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ होताना आपल्याला दिसून येत आहे. परंतु याही परिस्थितीत शेतकरी काळ्या आईची सेवा करतो व परिस्थितीशी दोन हात करायला तयार होतो.
सध्याच्या परिस्थिती आपण बघतो की अनेक शेतकऱ्यांनी या अशक्य अशा परिस्थितीमध्ये देखील मोठ्या कष्टाने या सगळ्या परिस्थितीतून बाहेर निघण्याचा प्रयत्न चालवला आहे व काही निघत देखील आहेत. अगदी याच पद्धतीने जर आपण पैठण तालुक्यातील आंतरवाली( खांडी) येथील कृष्णा डोईफोडे या शेतकऱ्याचे उदाहरण घेतले तर हा शेतकऱ्याने एकेकाळी आत्महत्येच्या विचारात असताना त्यातून सावरत आज शेतीत मोठ्या प्रमाणावर प्रगती साधली आहे.
विविध प्रकारच्या फळबाग लागवडीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्यांच्याकडे असलेल्या वडिलोपार्जित पाच एकर जमीन ही साडेतेरा एकर पर्यंत वाढवली आहे. याचा शेतकऱ्याचे यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.
कृष्णा अशा पद्धतीने आले शेतीकडे
कृष्णा हे शिक्षण घेत होते तेव्हा त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. जेव्हा त्यांचे शिक्षण पूर्ण झाले तेव्हा 2011 यावर्षी त्यांच्या वडिलांना आजारपणाने ग्रासले व त्यामुळे पाच एकर शेतीची सगळी सूत्रे त्यांच्या हाती आली.जेव्हा शेती त्याच्याकडे आली तेव्हा शेतामध्ये पाण्याची व्यवस्थित सोय नव्हती व जेमतेम वीस ते पंचवीस फूट खोल विहिरीचा आधार सिंचनासाठी होता.
पाण्याची सोय नसल्यामुळे कपाशी व बाजरी सारखी इतर पारंपारिक पिके लागवडी शिवाय त्यांच्याकडे कुठलाही पर्याय नव्हता. परंतु शेतीमध्ये काहीतरी नवीन करावे या इच्छेने त्यांनी अद्रक पिकाची लागवड करण्याचे ठरवले व इतर शेतकऱ्यांकडून मदत घेऊन एक एकर क्षेत्रावर आल्याची लागवड केली.
त्याचे व्यवस्थापन देखील व्यवस्थित केले व या माध्यमातून चांगले उत्पादन मिळेल ही अपेक्षा त्यांना असतानाच जेव्हा अद्रक बाजारपेठेत विकण्याची वेळ आली तेव्हाच भाव गडगडले व मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले. वडिलांच्या आजारपणामुळे मोठ्या प्रमाणावर कर्जाचा डोंगर व त्यात या पिकाचा खर्च देखील निघाला नसल्याने ते कर्जाच्या कचाट्यात सापडले.
शेवटी आत्महत्याचे विचार मनामध्ये घोळू लागले. त्यानंतर या परिस्थितीतून काहीतरी मार्ग किंवा आर्थिक मदत मिळते का व यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून काही आर्थिक मदतीच्या अपेक्षेने ते मंत्रालयात गेले. परंतु मंत्रालयामध्ये मंत्र्यांची भेट झाली नाही व तिथूनच खाली उडी मारण्याचा त्यांचा विचार सुरू असताना काही नागरिकांनी त्यांना रोखले व पोलिसांच्या हवाली करत त्यांना सुखरूप घरी पोहोचवले.
या घटनेनंतर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची झाली मदत
या घटनेनंतर मात्र कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने कृष्णा यांना शेतीत पुन्हा उभे करण्यासाठी मदत करण्यात आली व काही शेती योजनांचा लाभ त्यांना देण्यात आला. त्याचा फायदा घेत त्यांनी दीड एकर मध्ये मोसंबीची बाग लावली व या माध्यमातून त्यांनी पुन्हा उभे राहण्याचा प्रयत्न केला.
मोसंबी फळबागेच्या लागवडीपासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास आज साडेतेरा एकर शेतीपर्यंत पसरला असून आज त्यांच्यावर एक रुपयाचे देखील कर्ज नाही.
फळबागेने दिला आधार
2012 मध्ये त्यांनी दीड एकर क्षेत्रामध्ये न्यू शेलार जातीच्या मोसंबीची 15 बाय 15 या अंतरावर लागवड केली व संपूर्ण बाग सरकारी योजनेच्या फायद्यातून घेतली. त्यानंतर 2020 या वर्षी पुन्हा दीड एकर व 2021 मध्ये परत एक एकर व 2022 मध्ये अजून एक एकर अशी साडेतीन एकर मोसंबीची घरून लागवड केली.
तसेच 2023 च्या जुलै महिन्यामध्ये आठ बाय बारा अंतरावर सीताफळाची लागवड देखील त्यांनी केलेली असून अजून जे काही क्षेत्र उरलेले आहे त्यामध्ये देखील आता वेगवेगळ्या प्रकारचे फळबाग लागवडीचा त्यांचा प्लानिंग आहे.
जेव्हा त्यांनी 2012 मध्ये मोसंबीची लागवड केली होती त्यानंतर या मोसंबीच्या बागेपासून त्यांना चार वर्षांनी उत्पन्न हातात मिळणार होते. त्यामुळे या कालावधीत त्यांनी मिरची, टोमॅटो आणि कांद्यासारखी आंतरपिके या बागेत घेतली व त्या माध्यमातूनच त्यांचा आर्थिक जम चांगला बसला.
किती मिळते कृष्णा यांना उत्पन्न?
त्याच्याकडे साडेतेरा एकर शेती असून पाच एकरमध्ये ते मोसंबी तसेच दीड एकरमध्ये सिताफळ आणि उरलेल्या क्षेत्रांमध्ये कपाशी व बाजरी सारखी इतर पिके घेतात. त्याच्या एकूण फळबाग क्षेत्रापैकी दीड एकर फळबाग त्यांना सध्या उत्पन्न देत आहे व इतर बागांमध्ये ते आंतरपिके घेतात.
एकरी 90 ते 95 क्विंटल कांद्याचे उत्पादन घेतात व मिरची तसेच टोमॅटो माध्यमातून देखील चांगले उत्पादन घेऊन चांगला पैसा मिळवतात. या सगळ्या पिकांच्या माध्यमातून त्यांना सर्व खर्च वजा जाता वार्षिक सहा ते सात लाखांचे उत्पन्न सध्या मिळत असल्याचे देखील त्यांनी सांगितले.