या तरुणाने इंजीनियरिंग पूर्ण करून नोकरी न करता शेतीत आजमावले नशीब; शेतीतून वर्षाला घेतो 16 लाखाचे उत्पन्न

कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील लाखोंचे उत्पन्न घेण्यामध्ये ते यशस्वी ठरताना दिसून येत आहेत. याच मुद्द्याला धरून जर आपण सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात असलेल्या जवळगाव येथील प्रताप ढेंगळे या तरुणाची यशोगाथा पाहिली तर ती इतर तरुणांना प्रेरणा देणारी आहे.

Published on -

शेतीमध्ये उच्चशिक्षित तरुण मोठ्या प्रमाणावर नशीब आजमावतांना आपल्याला दिसून येत आहेत. नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय करण्याच्या दृष्टिकोनातून तरुणांनी शेतीची केलेली निवड ही अनेक अर्थाने सार्थ ठरताना दिसून येत आहे.

कारण अशा तरुणांनी शेतीमध्ये आल्यानंतर आता तंत्रज्ञानाचा वापर  सुरू केला आहे व या तंत्रज्ञानाच्या मदतीने आधुनिक पिके जसे की भाजीपाला उत्पादन तसेच फळ पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घ्यायला सुरुवात केली आहे.

इतकेच नाही तर कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील लाखोंचे उत्पन्न घेण्यामध्ये ते यशस्वी ठरताना दिसून येत आहेत. याच मुद्द्याला धरून जर आपण सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात असलेल्या जवळगाव येथील प्रताप ढेंगळे या तरुणाची यशोगाथा पाहिली तर ती इतर तरुणांना प्रेरणा देणारी आहे.

 ड्रॅगन फ्रुट लागवडीने साधली आर्थिक समृद्धी

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बार्शी तालुक्यात असलेल्या जवळगाव येथील इंजिनीयर असलेले प्रताप ढेंगळे यांनी इंजिनिअरिंग पास केल्यानंतर स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याचे ठरवले. परंतु हे स्वप्न अपूर्ण राहिले व त्यानंतर त्यांनी खाजगी कंपनीमध्ये नोकरी करायला सुरुवात केली.

परंतु मुळातच त्यांच्यामध्ये व्यवसायाची आवड असल्याकारणाने ते त्या दिशेने प्रयत्न करत होते व अनेक ट्रेनिंग सेशनमध्ये सहभागी होत होते. व्यवसाय करण्याच्या दृष्टिकोनातून तयारी करत असताना मध्येच कोरोना आला व प्रताप यांना पुणे सोडून गावी यावे लागले.

परंतु गावी आल्यानंतर शेती करावी या उद्देशाने त्यांनी प्रयत्न सुरू केले व ड्रॅगन फ्रुट लागवड करण्याचे ठरवले. लागवड करण्याआधी त्यांनी या पिकाची संपूर्णपणे सखोल माहिती घेतली व ऑगस्ट 2021 मध्ये सव्वा एकर क्षेत्रामध्ये सीएम रेड या जातीच्या ड्रॅगन फ्रुटची लागवड केली.

पहिल्याच वर्षी 11 टन ड्रॅगन फ्रुटचे उत्पादन घेतले व 13 लाख रुपयांचे उत्पन्न हाती आले. यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला व दुसऱ्या वर्षी तब्बल दुप्पट म्हणजेच 22 टन ड्रॅगन फ्रुटचे उत्पादन घेऊन 16 लाखांचे उत्पन्न हाती मिळवले.

चालू वर्षी देखील त्यांनी तीन एकर क्षेत्रामध्ये नवीन ड्रॅगन फ्रुट ची लागवड केली आहे व येणाऱ्या भविष्यकाळात 13 एकरावर ड्रॅगन फ्रुटची लागवड करण्याचा त्यांचा मानस आहे.

याबाबत बोलताना प्रताप म्हणतात की, पुण्यामध्ये असताना जेव्हा मुंबई या ठिकाणी जाऊन व्यवसायांविषयी ट्रेनिंग घेतले व त्याचाच खरा फायदा शेतीत झाला. सध्या वर्षाला सुमारे 16 लाखांचे उत्पादन घेत आहेत व येणाऱ्या काळात फळावर प्रक्रिया करून अनेक उत्पादने  तयार करण्यासाठी ड्रॅगन फ्रुट प्रक्रिया युनिट उभारण्याचा त्यांचा मानस आहे.

 ड्रॅगन फ्रुट लागवड फायद्याची का?

हे फळ उष्णकटिबंधातील फळ असल्याने ते कमी पाण्यावर व कमी खर्चात उत्पादन देऊ शकणारे पीक आहे. पावसाळ्याच्या कालावधीमध्ये बुरशी सारखे थोडाफार रोगांचा प्रादुर्भाव झाला तर फवारणी व फळाचे उत्पादन वाढावे याकरिता थोडी खतांची मात्र याला लागते.

महाराष्ट्रातील हवामान पाहिले तर सीएम रेड व जम्बो या दोन ड्रॅगन फ्रुटच्या जातींच्या वाढीसाठी पोषक आहे व त्यातील सीएम रेड या जातीचे फळ उन्हाळ्यात 55°c पर्यंत तापमान देखील उत्तम पद्धतीने टिकते. बाहेरच्या देशांमध्ये देखील ड्रॅगन फ्रुटला खूप मोठी मागणी आहे व भारतात देखील स्थानिक बाजारपेठ उपलब्ध असल्यामुळे वाहतुकीचा खर्च देखील जास्त येत नसल्याने अगदी आरामात विक्री करता येते.

ड्रॅगन फ्रुट शेतीमध्ये तुम्ही एकदा गुंतवणूक केली तर तीस वर्षापर्यंत तुमच्या हाती उत्पन्न येत राहते. महाराष्ट्रमध्ये सोलापूर हे ड्रॅगन फ्रुटसाठी चांगले मार्केट आहे व महाराष्ट्र बाहेर जर पाहिले तर तेलंगणा, आंध्रप्रदेश तसेच केरळ, तामिळनाडू व कोलकत्ता सारख्या ठिकाणचे व्यापारी जागेवर येऊन माल खरेदी करतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News