नितीन भाऊ करतात गांडूळ खत व्यवसायातून 50 लाखांची उलाढाल! उभारला आहे पुण्यातील सर्वात मोठा गांडूळ खत प्रकल्प

जुन्नर तालुक्यातील ओझर येथील नितीन ढमढेरे यांचे उदाहरण बघितले तर ते इतर तरुणांना प्रेरणा देणारे ठरेल. नामांकित कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी सोडून नितीन यांनी  त्यांच्या वडिलांचा गांडूळ खत उत्पादनाचा व्यवसाय वाढवला व आज त्या माध्यमातून ते वर्षाला 50 लाखाची उलाढाल करत आहेत.

Published on -

शेती आणि शेतीला एखादा शेतीपूरक जोडधंदा असणे खूप गरजेचे आहे. कारण नुसते शेतीवर अवलंबून न राहता त्याला जर जोडधंद्याची मदत असेल तर शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक उत्पन्नाचे साधन निर्माण तर होतेच व त्यातून आर्थिक स्थिरता देखील प्राप्त होते.

त्यामुळे आता अनेक शेतकरी उत्तम अशा शेती सोबतच वेगवेगळ्या प्रकारचे शेती पूरक व्यवसाय करून स्वतःच्या उत्पन्नामध्ये भर टाकण्याचे महत्त्वपूर्ण काम करत आहे. यामध्ये तरुण शेतकरी खूप पुढे असून आत्ताच शेतीमध्ये पाऊल ठेवलेले  व आयुष्यात करिअरच्या दृष्टिकोनातून शेती कडे पाहणारे तरुण अशा व्यवसायांमध्ये खूप पुढे आहेत.

याच पद्धतीने जर आपण जुन्नर तालुक्यातील ओझर येथील नितीन ढमढेरे यांचे उदाहरण बघितले तर ते इतर तरुणांना प्रेरणा देणारे ठरेल. नामांकित कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी सोडून नितीन यांनी  त्यांच्या वडिलांचा गांडूळ खत उत्पादनाचा व्यवसाय वाढवला व आज त्या माध्यमातून ते वर्षाला 50 लाखाची उलाढाल करत आहेत.

 नितीन ढमढेरे यांचा गांडूळ खत प्रकल्प

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असलेल्या ओझर येथील नितीन ढमढेरे हे कॉर्पोरेट क्षेत्रातील एका कंपनीमध्ये चांगल्या पदावर नोकरीला होते. परंतु नोकरी करत असतानाच त्यांची नाळ ही शेतीशी देखील तितकी जुळलेली होती. त्यामुळे त्यांना कायम शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करायला खूप आवडायचे.

त्यांनी शेती सोबत शेळीपालनापासून तर कुक्कुटपालनापर्यंतचे प्रयोग केले. यामध्ये स्वतः त्यांचे वडील हे 2006 सालापासून गांडूळ खताचे उत्पादन घेत होते व हाच व्यवसाय पुढे वाढवायचा हे नितीन यांनी ठरवले. वास्तविक पाहता त्यांच्या वडिलांनी जो काही गांडूळ खत तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला होता

त्यामध्ये ते उत्तम दर्जाचे गांडूळ खत तयार करत व शेतकऱ्यांकडून देखील त्यांच्या या गांडूळ खताला चांगली मागणी होती. याच गांडूळ खताचा स्वतःचा ब्रँड असावा असे नितीन यांना वाटले व त्यांनी 2020 मध्ये सुहा अग्रोनिक्स या कंपनीची स्थापना केली व याच ब्रँडखाली उत्पादने विकायला सुरुवात केली.

 गांडूळ खत तयार करण्याची आहे वेगळी पद्धत

नितीन हे त्यांच्या गांडूळ खताच्या प्रकल्पामधून शेतकऱ्यांना थेटपणे खताची विक्री न करता गांडूळ खत घ्यायला आलेले शेतकरी कोणत्या पिकासाठी त्या खताचा वापर करणार आहेत त्यानुसार त्या खतामध्ये आवश्यक एनरिचमेंट करून खते दिली जातात.

म्हणजेच पिकानुसार गांडूळ खतांमध्ये आवश्यक ते अन्नद्रव्य मिक्स केली जातात व त्यानुसार शेतकऱ्यांना गांडूळ खताची विक्री केली जाते. पिकांना  लागणारे आवश्यक पोषक द्रव्यानुसार खत मिळाल्याने पिकांना देखील त्याचा फायदा होतो व या सगळ्यामुळे शेतकऱ्यांचा देखील मोठ्या प्रमाणावर त्यांच्यावर विश्वास आहे.

नितीन यांना या व्यवसायामध्ये नारायणगाव कृषी विज्ञान केंद्र यांच्याकडून खूप मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. नवनवीन उत्पादनांची निर्मिती आणि दर्जा कसा सुधारावा याबाबत या कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ञांनी त्यांना मोलाचे मार्गदर्शन केलेले आहे.

 नितीन तयार करतात ही उत्पादने

2020 मध्ये त्यांनी सुहा ॲग्रोवनिक्सची स्थापना केली व त्यामध्ये ते गांडूळ खतच नाही तर त्यासोबत वर्मीवॉश, दशपर्णी अर्क तसेच जीवामृत, फोस्पॉ कंपोस्ट आणि न्यूट्री कंपोस्ट सारखे उत्पादने देखील तयार करतात व त्याची विक्री करतात.

 किती मिळते आर्थिक उत्पन्न?

जेव्हा त्यांनी गांडूळ खत व्यवसाय वाढवायला सुरुवात केली त्या अगोदर ते फक्त 50 ते 60 टन गांडूळ खताची विक्री करत असत. परंतु आता वर्षाला विक्री पाहिली तर ती 500 टनापर्यंत पोहोचली असून हा पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा गांडूळ खत प्रकल्प आहे. गांडूळ खताला 9 ते 12 रुपये प्रति किलोचा दर मिळतो व साधारणपणे 50 लाख रुपयांची उलाढाल या व्यवसायातून ते करतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News