शेत जमिनीच्या संबंधित पाहिले तर आपल्याला अनेक प्रकारचे वाद उद्भवताना दिसतात व असे अनेक प्रलंबित वाद आज देखील कोर्टामध्ये मोठ्या संख्येने आहेत. शेत जमिनीच्या संदर्भात प्रामुख्याने शेताची हद्द, बांध कोरणे तसेच रस्त्याच्या बाबतीतले वाद प्रामुख्याने असतात.
यामध्ये जर शेतीची हद्द किंवा सातबारा उताऱ्यावर असलेले क्षेत्र आणि प्रत्यक्षात असलेली जमीन यातील तफावत देखील बऱ्याचदा आढळून येते व अशावेळी शेत जमिनीची मोजणी करून योग्य ते क्षेत्र काढण्यात येते. जर जमीन मोजणीचे अर्जदारांची संख्या पाहिली तर ती दिवसेंदिवस अशा प्रकरणांमुळे वाढताना दिसून येत आहे.

उदाहरणादाखल जर आपण सोलापूर जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून बघितले तर या ठिकाणी प्रत्येक महिन्याला सरासरी 550 शेतकरी जमीन मोजणीसाठी अर्ज दाखल करत आहेत.
परंतु या सगळ्या प्रकारांमध्ये जमीन मोजणीच्या वेळी मात्र मोजणी झाल्यानंतर जेव्हा हद्द किंवा खुणा निश्चित करण्यात येतात त्यावेळी शेजारचा शेतकरी मात्र विरोध करताना आपल्याला दिसून येतो व अशावेळी मात्र खूप मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण होते.
आपल्याला माहित आहे की जेव्हा आपण जमिनीची मोजणी करतो तेव्हा मोजणी झाल्यानंतर संबंधित क्षेत्राचे एक रेकॉर्ड तयार केले जाते तसेच त्यासोबत क्षेत्र कोणत्या दिशेने सरकले, सध्याच्या वहीवाटीचे क्षेत्र इत्यादी बाबींचा विचार केला जातो व त्यानुसार जमिनीच्या हद्द व खुणा निश्चित केल्या जातात.
या सगळ्या प्रक्रिया करता मात्र मनुष्यबळ खूप लागते व तेच मनुष्यबळ कमी असल्याने मोजणीच्या तातडीच्या आणि अति तातडीच्या प्रकाराला देखील विलंब लागू शकतो.
रोव्हर मशीन चा वापर करून आता जमिन मोजणी कमी वेळेत करता येणे शक्य
आपल्याला माहित आहे की सध्या रोव्हर मशीनच्या माध्यमातून मोजणी केली जाते व यामुळे जमीन मोजणीचा कालावधी कमी झाला. परंतु त्यानंतर मात्र संबंधित क्षेत्राचे रेकॉर्ड बनवणे, मोजणी झाल्यानंतर जमिनीचे हद्द-खुणा निश्चित करण्यासाठी मात्र तितकाच वेळ लागतो.
परंतु अशा परिस्थितीत देखील तातडी, अति तातडीची मोजणी वेळेत पूर्ण केली जाते. ज्यांना क्षेत्राची मोजणी करायची असते अशा व्यक्तींना ऑनलाईन अर्ज करावा लागतो. साधारणपणे आताची प्रोसेसर आहे.
जमिनीच्या मोजणीला जर एखादा शेतकरी हरकत घेत असेल तर निमताना आणि सुपर निमताना मोजणी करता येते
समजा एखाद्या शेतकऱ्याने जमीन मोजणीसाठी अर्ज केला व त्याच्या क्षेत्राची मोजणी करताना शेजारील खातेदार शेतकरी जर हरकत घेत असेल किंवा झालेली मोजणी अमान्य करत असेल तर अशाप्रसंगी भूमी अभिलेख कार्यालयाचे कर्मचाऱ्यांना संबंधित मोजणी अर्ध्यावर ठेवून परत यावे लागते.
असा प्रसंग उद्भवला तर संबंधित शेतकऱ्यांना निमताना मोजणी करून घेता येते. परंतु यामध्ये पहिल्या मोजणीच्या तीन पट शुल्क भरणे गरजेचे असते. निमताना मोजणीच्या वेळी तालुक्याचे भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक संबंधित जागेवर येतात.
तसेच यातील दुसरा प्रकार म्हणजे सुपर निमताना मोजणी होय. मोजणीसाठी जवळपास पाचपट शुल्क भरावी लागते व मोजणी प्रकारांमध्ये जिल्ह्याचे भूमी अभिलेख कार्यालयाचे अधीक्षक स्वतः त्या क्षेत्राच्या मोजणीसाठी जातात व मोजणी करून हद्द व खुणा कायम करून देतात.
जमीन मोजण्यासाठी किती शुल्क भरावे लागते?
नवीन मोजणीसाठी हेक्टरी दोन हजार रुपयांचे शुल्क भरावे लागते. याशिवाय दोन हेक्टरकरिता मोजणी करायची असेल तर तीन हजार रुपये शुल्क भरणे गरजेचे असते. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे शुल्क देखील ऑनलाईनच भरावे लागते.