अहिल्यानगर जिल्ह्यातील संगीता ताईंनी फळ प्रक्रिया उद्योगात उभारले स्वतःचे विश्व! शून्यातून सुरुवात करून आज करतात 12 लाखापर्यंत उलाढाल

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या खडांबे  या गावचे काशिनाथ तोंडे व त्यांच्या अर्धांगिनी संगीता ताई यांची यशोगाथा बघितली तर ती खूपच प्रेरणादायी अशी आहे. या कुटुंबाकडे फक्त राहता येईल एवढी जागा होती व एकंदरीत आर्थिक परिस्थिती देखील हलाखीचीच होती. परंतु आज या संगीता ताईंनी फळ प्रक्रिया उद्योगांमध्ये स्वतःचा ब्रँड तयार केला असून या प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून ते आज दहा ते बारा लाखापर्यंतची उलाढाल करत आहेत.

Published on -

Fruit Processing Business: तुमची कौटुंबिक आणि आर्थिक परिस्थिती कशी आहे? याला महत्व नसून आहे त्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी  कष्ट घेणे खूप गरजेचे असते व आर्थिक परिस्थिती किती जरी हलाखीची राहिली तरी आर्थिक समृद्धी आणण्यासाठी मेहनत ही करावीच लागते व मेहनत केल्याने आर्थिक दृष्ट्या समृद्ध होता येत असते.

माझ्याकडे पैसाच नाही किंवा माझी परिस्थितीच नाही? अशा पद्धतीने हातात हात घालून बसल्याने कुठलीही गोष्ट साध्य होत नाही व आहे ती परिस्थिती देखील जास्त प्रमाणात बिघडत जाते. त्यामुळे परिस्थिती सुधारणे आपल्या हातात असल्यामुळे त्यासाठी प्रचंड प्रमाणात जिद्दीने कष्ट करणे व ध्येयापर्यंत पोहोचणे महत्त्वाचे असते.

अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या खडांबे  या गावचे काशिनाथ तोंडे व त्यांच्या अर्धांगिनी संगीता ताई यांची यशोगाथा बघितली तर ती खूपच प्रेरणादायी अशी आहे. या कुटुंबाकडे फक्त राहता येईल एवढी जागा होती व एकंदरीत आर्थिक परिस्थिती देखील हलाखीचीच होती. परंतु आज या संगीता ताईंनी फळ प्रक्रिया उद्योगांमध्ये स्वतःचा ब्रँड तयार केला असून या प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून ते आज दहा ते बारा लाखापर्यंतची उलाढाल करत आहेत.

 संगीता ताईंची यशोगाथा

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या खडांबे या गावातील रहिवासी असलेले काशिनाथ तोंडे हे कुटुंबाचा चरितार्थ चालावा याकरिता महात्मा फुले कृषी विद्यापीठात एक कंत्राटी मजूर म्हणून कामाला होते.

नेमके त्यावेळेला महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये फळ प्रक्रिया उद्योगाचे एक ट्रेनिंग होणार होते व त्यांना त्याबाबतची माहिती मिळाल्याने लागलीच काशिनाथ तोंडे यांनी त्यांच्या पत्नी संगीता तोंडे यांचा सहभाग त्या प्रशिक्षणासाठी नोंदविला. 2007 मध्ये विद्यापीठाच्या माध्यमातून राबवल्या गेलेल्या या प्रक्रिया उद्योगाचे एक महिन्याचे प्रशिक्षण संगीता ताईंनी घेतले.

प्रशिक्षण घेतल्यानंतर स्वस्थ न बसता त्यांनी 2008 मध्ये बचत गटाची मदत घेतली व सुरुवातीला घरगुती आवळा प्रक्रिया उद्योगाला सुरुवात केली. कुठल्याही गोष्टीची जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा भरपूर अडचणी येत राहतात व तशाच अडचणी आवळा प्रक्रिया उद्योगांमध्ये त्यांना आल्या.

परंतु आलेल्या या अडचणीवर मात करत त्यांनी त्यांच्या या गृह उद्योगाला आज चांगल्या अर्थसंपन्न प्रक्रिया उद्योगाच्या ब्रँडमध्ये रूपांतरित केले. विशेष म्हणजे याच व्यवसायाच्या जोरावर त्यांनी सहा वर्ष अगोदर एक एकर शेती विकत घेतली व आज ते कुटुंब स्थायिक झाले आहे.

 अशाप्रकारे केला प्रक्रिया उद्योगाचा विस्तार

त्यांनी ज्या ठिकाणी एक एकर जमीन घेतली त्या क्षेत्रावरच घर व प्रक्रिया उद्योगाकरिता पंचवीस बाय साठ या अंतराचे शेड उभारले व इतकेच नाहीतर प्रक्रिया उत्पादने सुकवण्याकरिता टनेल ड्रायर देखील घेतले व उरलेल्या क्षेत्रांमध्ये पंधरा बाय पंधरा अंतरावर आवळा बागेची लागवड केली आहे.

संपूर्ण कुटुंबाच्या मेहनतीने त्यांचा आज श्रावणी ऍग्रो फूड प्रोसेसिंग नावाचा ब्रँड दिमाखात उभा असून चार महिलांना रोजगार देण्याचे काम देखील त्यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. त्यांच्या या प्रक्रिया उद्योगांमध्ये आवळ्यापासून कॅन्डी तसेच आवळा पावडर, ज्युस, उसापासून गूळवडी,

काकवी तसेच गूळ पावडर, गुळ आले पाक, लोणचे व इतकेच नाही तर तूप तसेच अद्रक, बडीशोपचा वापर करून तयार केलेली विशेष पद्धतीची गुळवडी त्यांच्या उत्पादनाचे खास आकर्षण आहे. जांभळापासून ज्यूस व पावडर अशी उत्पादने देखील ते बारमाही तयार करतात.

शासनाच्या योजनेची मदत ठरली फायद्याची

उद्योगाचा विस्तार करण्याकरिता मशिनरी खरेदी करणे गरजेचे होते. याकरिता त्यांनी 2018 मध्ये कृषी विभागाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेचा लाभ घेतला व या योजनेच्या माध्यमातून आवळा व जांभूळ या फळांवर प्रक्रिया करण्याकरिता यंत्रांची खरेदी केली व आवळ्यासाठी बास्केट प्रेशर,

क्रेशर मशीन तसेच सिलिंग मशीन, पॅकिंग मशीन, आवळ्यापासून कँडी तयार करण्यासाठी आवश्यक असलेले टॅंक,जांभळाचा गर काढण्यासाठी आवश्यक यंत्रे व पावडर करण्यासाठी ग्राइंडिंग मशीन उसाचा रस काढण्यासाठीची मशीनरी अशी 18 लाखांपेक्षा अधिक किमतीची यंत्रे या योजनेच्या माध्यमातून त्यांना विकत घेता येणे शक्य झाले.

अशाप्रकारे आहे विक्री व्यवस्थापन

संगीता ताई त्यांच्या या प्रकल्प उद्योगाच्या माध्यमातून तयार उत्पादने विक्रीकरिता बचत गटांचे प्रदर्शने तसेच कृषी महोत्सव इत्यादी ठिकाणी स्टॉल लावतातच परंतु किराणा दुकाने आणि ऑनलाईन विक्रीच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणावर उत्पादने विकली जातात. आज जवळपास 11 ते 12 लाखांचा त्यांचा टर्नओव्हर असून  या माध्यमातून तीस ते पस्तीस टक्के पर्यंत नफा त्यांना राहतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe