Onion Crop Management:- कांदा हे महाराष्ट्रातील प्रमुख पीक असून अगोदर जास्त करून नाशिक आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये कांद्याची लागवड आणि उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जायचे. परंतु गेल्या काही वर्षापासून जर आपण कांदा लागवडीचे क्षेत्र बघितले तर हळूहळू आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते वाढताना दिसून येत आहे.
खरीप आणि रब्बी हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात कांदा लागवड केली जाते. परंतु कांदा लागवडीच्या दृष्टिकोनातून जर बघितले तर कांदा हे एक संवेदनशील पीक असल्यामुळे वातावरणात थोडा जरी बदल झाला तरी त्यावर अनेक प्रकारच्या बुरशीजन्य रोगांचा, किडींचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते.

साहजिकच अशा प्रकारे जर बुरशी तसेच जिवाणूजन्य व विषाणूजन्य रोगांचा आणि विविध किडींचा जर पिकावर प्रादुर्भाव झाला तर आपल्याला अशा प्रकारचे रोग आणि किडींचा अटकाव करण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करणे क्रमप्राप्त असते.
जर आपण कुठलाही पिकाचा उत्पादन खर्च जर बघितला तर यामध्ये फवारणी वरील खर्च हा जास्त प्रमाणात होत असतो व त्याप्रमाणे तो कांदा पिकावर देखील होतो.
कांदा पिकाच्या दृष्टिकोनातून बघितले तर बऱ्याचदा महागडी औषधांची फवारणी करून देखील रोग व किडींचे योग्य प्रकारे नियंत्रण साध्य करता येत नाही. अशावेळी एकात्मिक रोग व किडनियंत्रण करणे खूप गरजेचे असते.यामुळे फवारणी वरील खर्च देखील कमी होऊ शकतो.
अशाप्रकारे कमी करता येऊ शकतो कांदा पिकावरील फवारणीचा खर्च
1- कांद्याचा कुठलाही हंगाम पाहिला तर त्यामध्ये एखाद्या भागाचे लागवड करायची असेल तर ती एक आठवड्यात पूर्ण करावी.
2- तसेच दोन हंगामांमध्ये जर अंतर ठेवले तर रोगजंतू किंवा किडींचा जो काही जीवनक्रम असतो तो खंडित करता येतो. त्यामुळे दोन हंगामामध्ये अंतर ठेवणे किंवा राखणे गरजेचे आहे.
3- रोपवाटिका तयार करताना रोपवाटिकेत व शेतामध्ये ट्रायकोडर्मा व्हिरिडी हेक्टरी 1.25 किलो पाचशे किलो शेणखतात पंधरा दिवस आधी मिसळून जमिनीत टाकून द्यावे.
4- बियाण्याचा वापर करताना ते प्रमाणित बियाणे वापरावे. तसेच बीज प्रक्रिया करून घेणे आवश्यक
5- तसेच पिकाची फेरपालट करावी.
6- ज्या जमिनीतून योग्य प्रकारे पाण्याचा निचरा होत नसेल अशा जमिनीमध्ये कांदा लागवड करू नये.
7- रोपांची लागवड करताना ती गादीवाफ्यांवर करावी.
8- कांदा पिकावर जैव कीटकनाशक, नैसर्गिक, जैविक मिश्रणे यांचा वापर करावा. त्यामुळे अनेक किटकांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
9- ब्युवेरिया बसियाना( जैविक कीटकनाशक), ट्रायकोडर्मा( जैव बुरशीनाशक), कडुलिंबाचा अर्क आणि काही सूक्ष्म पोषक घटकांचा वापर करावा.
10-कांदा पिकावर रस शोषक किडींचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होतो. त्यामुळे रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी चिकट सापळ्यांचा वापर करावा.