8th Pay Commission:- केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेतन आयोग होय. सध्या कर्मचाऱ्यांना जे काही वेतन किंवा भत्ते मिळत आहेत ते सातव्या वेतन आयोगानुसार मिळत आहेत. परंतु आता देशातील एक कोटींपेक्षा जास्त केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मात्र आठव्या वेतन आयोग स्थापनेची आतुरता लागली असून तो कधी स्थापन होईल याची चातकासारखी कर्मचारी वाट पाहत आहेत.
सध्या जर आपण महागाईचा आलेख बघितला तर तो खूप वाढणारा असून त्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पगारवाढीची मागणी आता जोर धरू लागल्याचे चित्र आहे. सध्या सातवा वेतन आयोग लागू असून जानेवारी 2026 मध्ये दहा वर्ष या आयोगाच्या स्थापनेला पूर्ण होतील. नियमानुसार दहा वर्षानंतर वेतन आयोग स्थापन करावा लागतो व या परिस्थितीत आता आठवा वेतन आयोग आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
कधी स्थापन होणार आठवा वेतन आयोग?
नियमानुसार जर बघितले तर केंद्र सरकार दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग स्थापन करत असते. सातवा वेतन आयोगाची स्थापना 2014 मध्ये करण्यात आली होती व त्याच्या शिफारसी जानेवारी 2016 मध्ये लागू करण्यात आल्या होत्या. यानुसार जर आपण बघितले तर 2025 मध्ये आठव्या वेतन आयोगाची स्थापना होणे अपेक्षित आहे.
जर 2025 मध्ये आठवा वेतन आयोग स्थापन झाला तर त्याच्या शिफारसी जानेवारी 2026 पासून लागू होतील. परंतु अजून पर्यंत केंद्र सरकारच्या माध्यमातून आठव्या वेतन आयोग स्थापन करण्याबाबत मात्र कुठल्याही प्रकारची घोषणा करण्यात आलेली नाही.
याबाबत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींनी या विषयावर कॅबिनेट सचिवांची भेट घेतली होती व सचिवांनी 2026 अजून खूप दूर असल्याचे म्हटले व आयोगाची स्थापना करणे अजून तरी विचाराधीन नसल्याचे सांगितले.
आठवा वेतन आयोग स्थापन झाल्यानंतर पगारात किती होऊ शकते अपेक्षित वाढ?
जेव्हा सातवा वेतन आयोग स्थापन करण्यात आला होता तेव्हा कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये 23 टक्क्यांची वाढ करण्यात आली होती. सहाव्या वेतन आयोगामध्ये करण्यात आलेली पगारातील वाढ ही सातव्या वेतन आयोगापेक्षा जास्त होती.
जर आपण अहवालानुसार बघितले तर आठवा वेतन आयोग स्थापन झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 18 हजार रुपयांवरून थेट 34500 केले जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आठव्या वेतन आयोग स्थापनेनंतर महागाई भत्त्याचे सूत्र बदलले जाईल का?
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी बघितल्या तर त्यानुसार महागाई भत्ता वाढीचा फॉर्म्युला सध्या ठरवला जातो. परंतु आठवा वेतन आयोग स्थापन झाल्यानंतर या फार्मूल्यामध्ये सुधारणा होऊ शकते अशी देखील एक शक्यता आहे.
2024 च्या आर्थिक सर्वेक्षणात भारताच्या चलनवाढीच्या उद्दिष्ट पासून अन्नधान्य चलन वाढ वेगळे करण्याचे सुचवण्यात आले होते. असोसिएशनच्या म्हणण्यानुसार आठव्या वेतन आयोग अंतर्गत महागाई भत्ता वाढीचा फॉर्मुला देखील बदलला जाण्याची शक्यता आहे व ज्यामुळे कर्मचाऱ्यांना अधिकचा फायदा मिळू शकतो. आठव्या वेतन आयोगाच्या आगमनाने कर्मचाऱ्यांच्या पगारात खूप मोठी वाढ होईल अशी आशा केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आहे.