Health Tips For Liver:- शरीराचे उत्तम आरोग्य हे सुखी आणि समृद्ध जीवनासाठी खूप महत्त्वाचे असून आरोग्य जर उत्तम आणि ठणठणीत असेल तर व्यक्ती कुठलीही गोष्ट सहजरित्या पूर्ण करू शकतो व सगळे आयुष्य आनंदात व्यतीत करतो. परंतु जर आरोग्याच्या बाबतीत समस्या उद्धवायला सुरुवात झाली तर मात्र त्याचा विपरीत परिणाम हा जीवनाच्या सगळ्याच क्षेत्रात आपल्याला दिसून येतो.
त्यामुळे शरीराचे आरोग्य चांगले ठेवणे ही आपली पहिली जबाबदारी असते. एकंदरीत शारीरिक रचना बघितली तर यामध्ये लिव्हर अर्थात यकृत हा अतिशय महत्त्वाचा अवयव असून याचे आरोग्य जपणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
आपल्याला माहित आहे की दारू किंवा सिगारेट सारख्या व्यसनांमुळे यकृताला अनेक समस्या निर्माण होतात. याशिवाय काही औषधांचा बऱ्याच दिवसांपासून सातत्याने वापर, आवश्यक पोषक घटकांचा अभाव, प्रचंड प्रमाणात ताण तणाव व अपुरी झोप इत्यादी गोष्टींमुळे देखील लिव्हरवर वाईट परिणाम होऊ शकतो.
त्यामुळे महत्त्वाच्या असलेल्या या लिव्हरचे जर आरोग्य ठणठणीत ठेवायचे असेल तर काही फळे तुमच्यासाठी खूप वरदान ठरू शकतात. याच फळांची माहिती आपण या लेखात बघणार आहोत.
या फळांचे सेवन लिव्हरला ठेवतील ठणठणीत
1- द्राक्षे- द्राक्ष म्हटले म्हणजे विटामिन सी तसेच विटामिन ए, फायबर्स, कॅल्शियम आणि लोहाचा भरपूर भंडार आहे. लिव्हर मधील सूज कमी करण्यामध्ये द्राक्षांची खूप मोठी मदत होते. द्राक्षांमध्ये असलेल्या नॅरींगिन आणि नॅरींगेनीन या अँटिऑक्सिडंट मुळे यकृताच्या आरोग्याला खूप मोठा फायदा होतो.
2- संत्री- संत्रा तसेच लिंबू सारख्या साईट्रस असलेल्या फळांमध्ये विटामिन सी मोठ्या प्रमाणावर असते. या फळांच्या सेवनामुळे यकृतावरील सूज कमी होण्यास आणि लिव्हरचे संरक्षण होण्यामध्ये खूप मोठी मदत होते. संत्रा मधील पॉलिफिनॉल्स हे अँटिऑक्सिडंट लिव्हरच्या कार्यक्षमतेला खूप मोठ्या प्रमाणावर चालना देते.
3- ब्रोकोली- ब्रोकोली हे विदेशी भाजीपाला पीक असून लिव्हरच्या आरोग्यासाठी खूप फायद्याचे आहे. ब्रोकोली मध्ये फॅटी लिव्हर पासून संरक्षण करण्याची क्षमता आहे.तसेच पचनक्रिया सुधारण्याकरिता आणि लिव्हरचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी ब्रोकोली फायद्याचे ठरते.
4- ओट्स- ओट्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात आणि ते यकृताच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. ओट्समध्ये बीटा ग्लुकेन या नावाचे संयुगे असतात. जे यकृतामध्ये जमा झालेल्या फॅटच्या प्रमाणाला कमी करतात. त्यामुळे यकृताला शुद्ध आणि निरोगी राहण्यास मदत होते.
5- अक्रोड- अक्रोड मध्ये मोनोसॅच्युरेटेड आणि पॉलिसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड असतात. ज्यामुळे शरीरातील अमोनिया बाहेर काढण्यास मदत होते. तसेच अक्रोडमध्ये ओमेगा तीन फॅटी ऍसिड, अँटिऑक्सिडंट्स आणि अर्जिनिन यामुळे लिव्हरच्या काही विकारांचा धोका कमी होतो.
6- बीट- बीटमध्ये विटामिन ए, विटामिन बी सहा, लोह तसेच अँटिऑक्सिडंट मोठ्या प्रमाणावर असतात. यामुळे शरीरातील जे काही विषारी पदार्थ असतात ते बाहेर निघण्यास मदत होते. तसेच यकृतातील सूज आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्याला बीट फायद्याचे ठरते.
7- लसुन- लसणामध्ये विटामिन बी सहा तसेच ॲलिसीन, सेलेनियम या पोषणतंतूंचा समावेश असतो व लसणात असलेले सल्फर संयुगे यकृताला विषारी घटक बाहेर काढायला मदत करतात. त्यामुळे यकृताच्या कार्यक्षमतेमध्ये सुधारणा होते.