Maharashtra Government GR:- कुठलाही सरकारी कर्मचारी जेव्हा निवृत्त होतो म्हणजे सेवेतून रिटायर होतो त्यानंतर कर्मचाऱ्याला पेन्शन म्हणजेच सेवानिवृत्ती वेतन मिळत असते. कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर मिळणारी पेन्शन हाच त्या कर्मचाऱ्यांचा उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत असतो व या पेन्शनचा फायदा कुटुंबाला देखील होत असतो.
परंतु बऱ्याचदा काही बाबतीत मात्र या निवृत्तीवेतनाबाबत बरेच वाद कुटुंबांमध्ये होताना आपल्याला दिसून येतात व प्रामुख्याने असे वाद हे एखाद्या कर्मचाऱ्याच्या मुलीचा निवृत्तीवेतनातील वाटा या संदर्भात देखील आपल्याला पाहायला मिळतात.
यामध्ये आता मिळणारी पेन्शन म्हणजेच निवृत्तीवेतनाबाबत महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने 7 जानेवारी 2025 ला एक शासन निर्णय जाहीर केला असून शासकीय कर्मचाऱ्यांच्या/ निवृत्तीवेतनधारकाच्या मृत्यूनंतर अविवाहित,
घटस्फोटीत किंवा विधवा मुलीला व मानसिक दुर्बल असलेल्या किंवा अपंग किंवा विकलांग असलेल्या अपत्त्यास कुटुंब निवृत्ती वेतन प्रदान करणेबाबत मार्गदर्शक सूचना अशा नावाने हा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.
केंद्र सरकारच्या माध्यमातून या संबंधी असलेल्या नियमात सुधारणा केल्या होत्या व त्यानंतर अशाच प्रकारच्या सुधारणा राज्य शासनाने देखील केल्या व या शासन निर्णयाच्या माध्यमातून त्या जाहीर केल्या.
काय आहेत या शासन निर्णयामधील प्रमुख तरतुदी
1-अविवाहित, घटस्फोटीत किंवा विधवा मुलीच्या बाबतीत जर बघितले तर मुलीला वय वर्ष 24 पूर्ण झाल्यानंतर तिला तिच्या पूर्ण हयातभर म्हणजे आयुष्यभर, तिचा पुनर्विवाह होईल तोपर्यंत किंवा तिने स्वतः कमवायला सुरू केल्यानंतर यापैकी जे पहिले घडेल तोपर्यंत कुटुंब निवृत्तीवेतन मिळणार आहे.
2- कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वेळी इतर पात्र कुटुंब निवृत्तीवेतनधारक वारस व त्यांच्यासोबत अविवाहित, घटस्फोटीत किंवा विधवा मुलीच्या नावाचा समावेश करण्यात येणार आहे.
3- विधवा मुलीच्या बाबतीत बघितले तर तिच्या पतीचा मृत्यू आणि घटस्फोटीत मुलीच्या बाबतीत कायदेशीर घटस्फोट हा शासकीय कर्मचाऱ्याच्या/ निवृत्तीवेतनधारकाच्या किंवा जोडीदाराच्या हयातीत झालेला असणे आवश्यक आहे
तसेच काही कारणांमुळे जर घटस्फोट प्रकरण प्रलंबित असेल तर घटस्फोट आदेश दिनांक पासून निवृत्ती वेतन दिले जाईल.
4- शासकीय कर्मचाऱ्यांचे दोन किंवा त्यापेक्षा अधिक अपत्य असतील तर त्यापैकी शेवटचे अज्ञान अपत्य 21 किंवा 24 वर्ष वयाचे होईल तोपर्यंत कुटुंब निवृत्तीवेतन प्रथमतः अज्ञान अपत्यांना दिले जाईल
आणि त्यानंतर कुटुंब निवृत्तीवेतन मानसिक दुर्बलता असलेल्या किंवा अपंग किंवा विकलांगता आणि अविवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोटीत मुलगी अशी दोन्ही अपत्य असल्यास मानसिक दुर्बल किंवा अपंग अपत्यास प्रथम कुटुंब निवृत्तीवेतन मंजूर करण्यात येईल.
5- मृत झालेल्या कर्मचारी किंवा निवृत्तीवेतनधारक यांच्या पश्चात 24 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या एकापेक्षा अधिक अविवाहित, घटस्फोटीत किंवा विधवा मुली असतील तर त्यांच्या जन्मक्रमांका नुसार कुटुंब निवृत्ती वेतन देण्यात येईल.
6- मृत कर्मचारी किंवा निवृत्तीवेतनधारक हयात असताना अविवाहित, विधवा किंवा घटस्फोटीत मुली पालकांवर अवलंबून असणे आवश्यक आहे आणि त्याकरिता तसेच स्वघोषणापत्र नोटरी करून सादर करावे लागणार आहे.
7- विधवा तसेच अविवाहित किंवा घटस्फोटित मुलीने पुनर्विवाह केला वा स्वतः अर्थार्जण सुरू केल्यास त्याने तसे निवृत्ती वेतन घेत असलेल्या कोषागार कार्यालयाला कळवणे गरजेचे आहे.