अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :- परतीच्या पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले त्यावर राज्य सरकारने या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सहाय्य करण्यासाठी पॅकेजची घोषणा केली आहे.
शेतकऱ्यांना हे अर्थसहाय्य मिळावे यासाठी नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. मात्र या अंतर्गत केवळ उभ्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे होत असल्याने नुकसान भरपाई अत्यंत थोड्या शेतकऱ्यांना मिळेल व बहुसंख्य शेतकरी भरपाई पासून वंचित राहतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

त्यामुळे सदोष पंचनामे थांबवा व शेतकऱ्यांना सरसकट भरपाई द्या अशी मागणी कीसान सभेचे डॉ.अजित नवले यांनी केली आहे. परतीच्या पावसाने भिजून खराब झालेल्या पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले गेले आहेत.मात्र डाळिंब, द्राक्ष, संत्री, मोसंबी, आंबे उत्पादक शेतकरी मदतीपासून वंचित रहात आहेत.
अति पावसाने ऊस व कपाशीचेही मोठे नुकसान झाल्याने ही पिकेही धोक्यात आली आहेत. पंचनामे करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने, पंचनामे करताना कागदपत्रांच्या पूर्तता करण्यात खूप वेळ जात आहे, शिवाय कोरोना साथीमुळे प्रत्यक्ष पंचनाम्यांना मर्यादा येत आहे.
परिणामी शेतीतील पाणी आटून गेल्यावर व शेतकऱ्यांची पिकांची काढणी, मळणी करून झाल्यावर अधिकारी पंचनामे करण्यासाठी शेतात पोहचत आहेत. पंचनाम्यांमध्ये यामुळे नुकसानीच्या खऱ्या स्वरूपाची नोंद होत नाही. अशा परिस्थितीत सरकारने पंचनाम्यांचा हा गोंधळ थांबवावा व शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी अशी मागणी किसान सभेने केली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved