प्रशांत गडाख यांनी शेताच्या बांधावर जाऊन केले असे काही…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-नेवासा तालुक्यातील भालगाव येथील गुप्ताईदेवी मंदिराकडे जाणारा सुमारे अडीच किलोमीटर अंतराचा रस्ता शेताच्या बांधाच्या व व्यक्तिगत वादामुळे बंद होता.

या रस्त्याचे काम मार्गी लागत नसल्याने या परिसरातील पादचारी व वाड्यावस्त्यांवर राहणारे शेतकरी ही चिंतेत होते. मात्र, यशवंत प्रतिष्ठाणचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी शेताच्या बांधावर जाऊन या रस्त्याचा वाद असणाऱ्या दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांमध्ये समेट घालवून हा वाद सोडविला.

त्यामुळे, रस्त्याच्या कामाला प्रारंभ झाल्याने परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी गडाख यांना धन्यवाद दिले. भालगाव येथील गुप्ताई देवी परिसरातील कायमच दुर्लक्षित असलेल्या या रस्त्यावर कधी साधा मुरूमही पडलेला नव्हता.

अशा दुर्लक्षित अडीच किलोमीटर अंतराच्या रस्त्यासाठी मंत्री शंकरराव गडाख यांनी प्रशांत गडाखांनी निवडणूक काळात दिलेल्या रस्ता कामाच्या अश्वासनास पुढाकार घेऊन सुमारे २५ लाखाचा निधी मंजूर करत वचनपूर्ती केली. मात्र, रस्ता काम सुरू असतांना बांधावर पाईप टाकण्याच्या वादामुळे या रस्त्याचे काम बंद पडल्याने भागातील सर्वजण चिंतेत पडले.

प्रशांत गडाख यांनी तातडीने भालगाव गुप्ताई रस्त्याची पहाणी केली. वाद असलेल्या काही शेतकऱ्यांना समोरासमोर आणून त्यांची समजूत काढत गावकऱ्यांचे हित व एकोपा जोपासण्याचे आवाहन केले. गावकऱ्यांनीही त्यास प्रतिसाद दिला. त्यांच्यातील दुवा बनून वाद जागेवर मिटवला आणि रस्त्याच्या रखडलेल्या कामास सुरुवात करण्यात आली.

प्रशांत गडाख यांनी शिष्टाई केल्यामुळे रस्त्यातील वाद कायमचा मिटवून रस्त्याचे काम सुरू झाल्याने उपस्थित शेतकरी व ग्रामस्थांनी गडाख यांचा सत्कार करू लागले. परंतु, ज्यांच्या सामंजस्याने वाद मिटला तेच खरे या सत्कारास पात्र असल्याचे सांगून गडाख यांनी दोन्हीही बाजूच्या शेतकऱ्यांचा पुष्पहार व शाल घालून गौरव केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News