गंदा है…पर धंदा है.. कोरोनाचा भुताटकीसारखा वापर…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :-  कोरोनाचा भुताटकीसारखा वापर करीत अनेक खासगी डॉक्टर तसेच हॉस्पिटलकडून नागरिकांची अडवणूक व लुटमार होऊन ससेहोलपट होत आहे, असा दावा अॅड. श्याम आसावा यांनी केला आहे. 

त्यांनी सोशल मिडियातून निवेदन प्रसिद्धीस दिले असून, त्यात म्हटले आहे की, कोरोना काळात सामान्य रुग्णांना कोणीही वाली नाही. कोरोना संशयामुळे शासकीय दवाखाने इतर आजारातील पेशंट्सला दाखलच करून घेत नाहीत, या पेशंटला खासगी हॉस्पिटल्समध्ये उपचारासाठी जावे लागते. तेथे पेशंटला दाखल करून घेण्यास कसरत करावी लागते.

अनेकदा संबंधित हॉस्पिटलला हितसंबंधी डॉक्टरांची किंवा प्रतिष्ठितांची शिफारस लागते किंवा आगावू मोठी रक्कम भरणे आवश्यक असते. त्यानंतर पेशंटला भीती घालून आर्थिक पिळवणूक केली जाते. गरज नसतानाच्या टेस्ट, पीपीई कीटसाठीची रक्कम वगैरे घेतली जाते.

हॉस्पिटलचा कोरोना पार्श्वभूमीवर घ्यावयाच्या दक्षतेमुळे नक्कीच व्यवस्थापनाच्या वाढलेल्या खर्चाचा भार पेशंटवर पडणार, परंतु त्याला मर्यादा असायला हवी. काही हॉस्पिटलमध्ये तर पीपीई कीटचा खर्च जणूकाही हॅण्ड ग्लोज बदलले अशा प्रमाणात आहे. त्यामुळे हॉस्पिटल्सची बिले व त्याचा तपशील डोळ्यात काजवे चमकावणारा आहेत.

लॅबचे विसंगत रिपोर्ट हा तर वेगळा चर्चेचा विषय आहे, असे स्पष्ट करून अॅड. आसावा यांनी म्हटले आहे की, मुळात कोरोनामुळे अनेक हॉस्पिटलमध्ये पेशंट बरोबर नातेवाईकांना दवाखान्यात राहू दिले जात नाही. त्यात रुग्णास कोरोनाची लागण असेल तर नक्कीच राहू दिले जात नाही.

अशा वेळी त्या रुग्णाला नेमक्या व नक्की काय सुविधा दिल्या जात आहे, वैद्यकीय उपचार केले जात आहे, कोणकोणती औषधे-इंजेक्शन-सलाईन दिले जात आहे, पेशंटची स्थिती लक्षात घेता ते करणे अथवा न करणे आवश्यक होते का? हे त्याच्या बाहेर असलेल्या नातेवाईकांना समजण्यास काहीही मार्ग नाही.

काही हॉस्पिटल तर पेशंटला दवाखान्यात मोबाईल वापरू देत नाही. यात मेख हीच की पेशंट उपचार फाईलचे फोटो काढील, गलथानपणाबाबत फोटो व शुटींग करील ही धास्ती. काही हॉस्पिटलमध्ये पेशंटकडे मोबाईल नाही, टीव्ही नाही, करमणूक अथवा स्वतः ला गुंतवून ठेवण्याचे साधन नाही,

भीतीदायक वातावरण, स्टाफची वागणूक, एकलेपणा यामुळे पेशंट नैराश्यात राहून आजारपणात भर पडते, असाही दावा त्यांनी केला आहे. अनेक हॉस्पिटल्स पेशंटला केवळ बिल देत आहेत, परंतु रिपोर्ट व दैनदिन उपचाराची फाईल दिली जात नाही. वास्तविक, पेशंटला ते मिळविण्याचा हक्क आहे.

अनेकांना हे कागदपत्रे पेशंटने बाहेर दाखविली तरी आपली पोल खुलेल ही भीती असावी. इतकेच काय, कोरोना प्रादुर्भाव टाळण्याच्या सबबीखाली डिस्चार्जच्या वेळेस पेशंटची उरलेली औषधे ना तर मेडिकलवाल्यास परत केली जातात ना पेशंटला. मुळात अनेक हॉस्पिटलमधील मेडीकल स्टोअरही ह्यांचीच.

शिवाय औषधे तेथूनच खरेदी करण्याचे बंधन. हा सर्व प्रकार अनैतिक व अनुचित व्यापार पध्दतीत मोडणारा असून याविरुध्द पेशंट डॉक्टर व हॉस्पिटलविरुद्ध इंडियन मेडिकल असोसिएशनकडे तक्रार अथवा जिल्ह्यातील ग्राहक तक्रार निवारण मंच न्यायालयात दाद मागू शकतात. यासाठी मी मार्गदर्शन मोफत कायदेशीर करण्यास तयार आहे,

असेही त्यांनी स्पष्ट केले. (मोबाईल क्रमाक-७०२०७५४७७८). जिल्हा रुग्णालयात सर्वच रुग्णांची फरफट होत आहे. इतर रुग्णांना तर खाट खाली नाही, हीच कॅसेट वाजवून दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जाते. रुग्णांच्या नातेवाईकांनाच रुग्णाची देखभाल जीव धोक्यात घालून करावी लागते,

पेशंट त्रास देत असल्याने त्यास घेवून जा असे निरोप धाडले जातात. एका निराधार व गरीब भगिनीला पतीने प्रचंड मारहाण करून घरातून हाकलले, मारहाणीवर उपचाराकरिता जिल्हा रुग्णालयात नेले तर दाखल करून घेण्यास खाट नाही असे सांगत खासगी रुग्णालयात न्या असे सांगितले.

जेव्हा तिला रुग्णालयाच्या दारातच ठेवण्याचा पवित्रा घेतला, तेव्हा कुठे अनिच्छेने प्राथमिक उपचार करण्यात आले. एका अशाच कोरोना पॉझिटिव्ह महिलेस सामाजिक संस्थेच्या मदतीने दाखल करण्यात आले. कदाचित आपबीतीमुळे त्या महिलेची मानसिक स्थिती खराब आहे, ती त्रास देते म्हणून ज्या संस्थेने दाखल केले,

त्यांनाच या कोरोना पॉझिटिव्ह पेशंटला घेऊन जाण्यासाठी तगादा लावला जात आहे. गोरगरीब, निराधार, गरजवंतांना उपचार (कोरोना, मानसिक अथवा इतर) देण्याची जबाबदारी असताना, आवश्यक असल्यास पुणे येथील शासकीय मनोरुग्णालयात हलविण्याची कारवाई त्यांनी करणे आवश्यक आहे

अथवा या निराधार महिलेस शासकीय अनुदान मिळणाऱ्या महिला आधारगृहात दाखल करणे आवश्यक असताना हा बेजबाबदारपणा योग्य नाही. शासकीय महिला आधारगृह केवळ कागदोपत्री अनुदान लाटण्यासाठी नाहीत. डॉक्टरच्या पैश्याच्या हव्यासामुळे गोरगरीब, गरजवंत, निष्पाप पेशंट्स लुटले जात आहेत

किंवा इतर आजार असूनही उपचार करून घेण्यासाठी दारोदार फिरावे लागत आहे. अनेक डॉक्टरच्या कॅबिनमध्ये व हॉस्पिटलमध्ये विवेकानंदांच्या फोटोसह रुग्णाच्या आजारपणाबाबत काही मिनिटांत निदान करणारे जादूगार नसल्याचे फलक लावलेले आहेत.

हे खरे परंतु अव्वाच्या सव्वा बिले ही जादुगारासारखीच असतात. ती भरण्याकरता पेशंट जादुगाराप्रमाणे जादू करून पैसे उपलब्ध करू शकत नाहीत, हे माहिती असूनही लूटमार केली जाते, असा दावाही अॅड. आसावा यांनी केला आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment