ग्राहकांचे हक्क अबाधित राखण्यासाठी ग्राहक कायद्याचे महत्व अधिक – जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :-ग्राहकांच्या हक्क अबाधित राखण्यासाठी राष्ट्रीय ग्राहक कायद्याचे महत्व अधिक आहे. या कायद्याच्या जागृतीबाबत प्रशासन आणि ग्राहक संरक्षणासाठी काम करणाऱ्या संस्थांची जबाबदारी अधिक असल्याचा सूर आजच्या राष्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उमटला.

ग्राहक कायदयाचा हेतू आणि उद्देश समजावून घेऊन त्याबाबत ग्राहकांना माहिती मिळाली पाहिजे. तो ग्राहकांचा अधिकार असल्याचे प्रतिपादन यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी केले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचे पालन करीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले अध्यक्षस्थानी होते. जिल्हा ग्राहक संरक्षण मंचाचे अध्यक्ष न्या. व्ही.एस. प्रेमचंदानी, न्यायिक अधिकारी चारु डोंगरे, कायदेविषयक अभ्यासक प्रज्ञा हेंद्रे,

अतिरिक्त पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी डॉ. भोसले म्हणाले, ग्राहकांच्या हितासाठी असणाऱ्या कायद्याची अंमलबजावणी करताना प्रशासनाची भूमिका खूप महत्वाची आहे.

त्यामुळेच नव्या कायद्यात प्रशासनाला दिलेले अधिकारांचा वापर ग्राहकांच्या हितासाठी अधिकाधिक केला जाईल, यासाठी यंत्रणांनी पुढाकार घेतला पाहिजे. प्रशासनासोबतच ग्राहक चळवळीत काम करणाऱ्या संस्थांची जबाबदारी अधिक आहे. अधिकाधिक जनजागृती करुन, कायद्याची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवून त्यांना हक्काची जाणीव करुन देणे महत्वाचे आहे.

सध्याच्या बदलत चाललेल्या परिस्थितीत ही भुमिका महत्वाची आहे. ग्राहकांनीही त्यांच्या हक्कांसाठी उपलब्ध असलेल्या व्यासपीठाचा उपयोग केला पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. न्या. प्रेमचंदानी यांनी नवीन कायद्यातील तरतूदी आणि ग्राहकांच्या हक्कांबाबत त्याची अंमलबजावणी याबाबत सविस्तर विवेचन केले.

नव्या ग्राहक कायद्यात प्रत्येक गोष्टीशी निगडीत बाबी समाविष्ट करण्यात आल्या आहेत. सध्या ईलेक्ट्रॉनिक पद्धतीने तसेच डिजीटल पद्धतीने व्यवहार वाढले आहेत. त्याबद्दलही नव्या कायद्यात ग्राहकांना संरश्रण तसेच फसवणूकीबद्दल दाद मागण्याची संधी असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्राहक संरक्षण कक्षाकडे दाखल झालेल्या दाव्यांच्या निराकरणाचे प्रमाण सुमारे 92 टक्क्यांहून अधिक असल्याचे त्यांनी नमूद केले. श्रीमती हेन्द्रे यांनी सध्याचा कायद्याची व्यापक भूमिका स्पष्ट केली. सध्या ग्राहकांकडे क्रयशक्ती आहे. मात्र, खरेदी कौशल्य नसल्याने उत्पादक अथवा विक्रेत्यांकडून फसवणूक होण्याची शक्यता असते.

या कायद्यान्वये अशा फसवणूक प्रकरणी दाद मागण्याचा हक्क ग्राहकांना मिळाल्याचे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती माळी यांनी केले. यावेळी त्यांनी सादरीकरणाद्वारे कायद्याबाबत सविस्तर माहिती दिली. ग्राहक संरक्षण अधिनियम 2019 हा दिनांक 20 जुलै 2020 पासून लागू करण्यात आला आहे.

सध्याच्या बाजारातील ऑफलाईन आणि ऑनलाईन खरेदी करणारा ग्राहक अशी ग्राहकाची विस्तारित व्याख्या करण्यात आली आहे. जिल्हा ग्राहक आयोग आणि राज्य ग्राहक आयोगोत दाखल करावयाच्या दाव्यांच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे.

जिल्हा तक्रार निवारण आयोगात रुपये एक कोटीपर्यंत तर राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगात रुपये 10 कोटी तसेच राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगात रुपये 10 कोटीचे पुढील दावे दाखल करता येणार आहे. सुरुवातीच्या कायद्यात आधी विक्रेता किंवा सेवा जेथून घेतली असेल किंवा सेवा जेथून घेतली असेल तिथेच तक्रार दाखल करावी लागत होती.

या कायद्यानुसार आता ग्राहक ज्या जिल्ह्यात राहत असेल तिथे तक्रार दाखल करता येणार आहे. कंपन्यांच्या भ्रामक व फसव्या जाहिरातींवर तक्रार आल्यास कारवाई करता येणार आहे.ई-फायलिंग हे या कायद्याचे वैशिष्ट्य असून तक्रारदार आता ऑनलाईन तक्रार दाखल करु शकतो तसेच सुनावणी, साक्षीपुरावे तपासणी यासाठी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment