Vidhansabha2019 : स्पेशल रिपोर्ट अकोले मतदारसंघ

Ahmednagarlive24
Published:

चार दशकांची विजयाची परंपरा पिचड राखणार का?

लक्षवेधी लढत-अकोले

राज्यातील सर्वांत उंच शिखर असलेलं कळसुबाई, भंडारदरा, हरिश्चंद्रगडासारखी पर्यटनस्थळं असलेला अकोले हा मतदारसंघ. राज्यात गेली चार दशकं एकाच कुटुंबाची सत्ता असलेली जे अपवादात्मक मतदारसंघ राज्यात आहेत, त्यात अकोल्याचा समावेश होतो. मधुकर पिचड यांनी ती किमया केली आहे.

अगोदर काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस असा त्यांचा प्रवास झालेला. त्यांच्या साम्राज्याला हादरे देण्याचा प्रयत्न अनेकांनी केला; परंतु आव्हान देणारेच नंतर पिचडांच्या छत्रछायेखाली आले, असा वारंवारचा अनुभव. या मतदारसंघावर पिचडांचं वर्चस्व असलं, तरी त्यांच्या मागं मतदारसंघ एकजुटीनं उभा राहिला, असंही कधीच झालं नाही.

मतविभागणीचा फायदा घेत पिचड पितापुत्र निवडून येत राहिले. कधी कधी पाच आकडी मताधिक्य गाठताना पिचड यांची दमछाक झाली. त्यासाठी शेजारच्या बाळासाहेब थोरातांची मदत त्यांना मिळत गेली. संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषदेचे काही गट अकोले विधानसभा मतदारसंघात आहेत.

थोरात आणि पिचड यांच्यात आतापर्यंत कधीच वितुष्ट आलं नाही; परंतु आता मात्र पिचड यांनी राज्याचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांचं बोट धरून भाजपत प्रवेश केला. उमेदवारीही मिळवली. पिचड आणि विखे यांच्यात कधी सख्य तर कधी वितुष्ट असे नाट्याचे अनेक प्रयोग घडले. लोणीत येऊन रात्री बाळासाहेबांबरोबर गुफ्तगू करायचं आणि शरद पवार यांच्यावर निष्ठाही दाखवायची असंही त्यांच्या बाबतीत घडलं आहे.

नगर जिल्ह्यात लोकसभेच्या निवडणुकीत बारापैकी अकरा मतदारसंघात युतीला मताधिक्य आणि फक्त अकोले मतदारसंघात आघाडीला मताधिक्य मिळालं होतं. असं असतानाही पिचड यांनी भाजपत प्रवेश केला. आतापर्यंत भारतीय जनता पक्षाला शिव्या देणारे पिचड आता भाजपच्या आरत्या ओवाळायला लागले आहेत.

पिचड यांना आतापर्यंत कायम मतविभागणीचा फायदा झाला. गेल्या पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत मतविभागणीचा फायदा बबनराव पाचपुते यांच्याविरोधात शरद पवार यांनी खेळी केली होती, तीच खेळी आता अकोल्यात करण्याचं घाटतं आहे. त्यामुळं सर्व पिचड विरोधकांनी शरद पवार यांच्यांशी चर्चा करून वैभव पिचड यांच्याविरोधात एकास एक उमेदवार दिला आहे.

त्यातच मध्यंतरी थोरात यांच्यावर टीका करून पिचड यांनी थोरातांचा रोष ओढवून घेतला आहे. एरव्ही संगमनेर तालुक्यातील गावांतून मिळणा-या मताधिक्यावर पिचडाची विजयाची नाैका पैलतीराला जायची. आता थोरात अजिबात मदत करण्याची शक्यता नसल्यानं पिचडांपुढं आव्हान उभं राहिलं आहे.

अकोले तालुक्याची आदिवासी तालुका अशी ओळख आहे. हा मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी आरक्षित आहे. पिचड यांच्याशिवाय या मतदारसंघातून कोणतंही मोठं नेतृत्व तयार झालं नाही. 35 वर्ष या मतदारसंघातून प्रतिनिधीत्व करणाऱ्या मधुकर पिचड यांनी आपल्या राजकीय कारकिर्दित आघाडीची सत्ता असताना अनेक मंत्रिपदं भूषवली.

विरोधी पक्षनेता, प्रदेशाध्यक्ष अशी पदं ही त्यांना मिळाली. जिल्ह्यातील अन्य ज्येष्ठ नेत्यांना डावलून शरद पवार यांनी पिचडांना सर् काही दिलं. त्यानंतर 2014 विधानसभा निवडणुकीत मधुकर पिचड यांनी आपला राजकीय उत्तराधिकारी म्हणून पुत्र वैभव पिचड यांना निवडलं.

वैभव पिचड यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या मधुकर तळपाडे यांना धूळ चारत विधानसभेत एन्ट्री केली.  2014 विधानसभा निवडणुकीत वैभव यांनी तळपाडे यांचा 20 हजार 62 मतांनी पराभव केला.

शिवसेना-भाजप 2014 ची निवडणूक स्वतंत्रपणे लढल्यानं मतांची विभागणी झाली होती, याचा फायदा वैभव पिचड यांना झाला. अकोले विधानसभा मतदारसंघात एकूण 2 लाख 38 हजार 420 मतदार आहेत. पिचडांविरोधात उभ्या राहिलेल्या विरोधकांची मतं विचारात घेतली, तर ती पिचडांपेक्षा कितीतरी जास्त होती. 

पिचड भाजपत गेल्यानं त्यांच्याविरोधातील डाॅ. किरण लहामटे आणि अशोक भांगरे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. माकपच्या उमेदवाराला मागच्या वेळी 11  हजारांहून अधिक मतं मिळाली होती.

शेतक-यांच्या प्रश्नावर गेली दोन वर्षे काॅ. अजित नवले आंदोलनं करीत आहेत. त्यांना शेतक-यांचा पाठिंबा वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत माकपनं निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता; परंतु विरोधकांच्या मतांचं विभाजन होऊ नये, म्हणून सर्व विरोधक एकत्र आले.

माकपनं आपला उमेदवारी अर्ज दाखल न करता पिचड विरोधात रिंगणात असलेले डाॅ. किरण लहामटे यांना बळ देण्याचं ठरविलं आहे. भांगरे आणि लहामटे यांचा पिचडविरोधक हा समान दुवा आहे. पिचड यांनी आदिवासींचं बनावट प्रमाणपत्र वापरून आदिवासींच्या जमिनी लाटल्याचा आरोप असून त्याबाबत त्यांच्याविरोधात भांगरे आणि लहामटे लढा देत होते. युती सरकारनं कारवाई करू नये, म्हणून पिचडांनी हाती कमळ घेतल्याचं सांगण्यात येतं.

पिचड पिता-पुत्रांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळं त्यांना आदिवासी मतांवर पाणी सोडावं लागण्याची शक्यता आहे. भाजप प्रवेशानंतर पिचड पिता-पुत्रांविरोधात अनेक मोर्चे अकोल्यात निघाले होते. या मोर्चांमध्ये आदिवासी समाजही मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता.

पिचड यांनी मोठा भ्रष्टाचार केला असून त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भांगरे यांनी केली. आघाडीची सत्ता येणार नाही, अशा परिस्थितीत मतदारसंघातील विकासमकामं व्हावी, यासाठी भाजपमध्ये जात असल्याचं पिचड पिता-पुत्रांनी सांगितलं होतं; मात्र आता मतदारसंघातून त्यांना मोठा विरोध होत आहे.

महत्त्वाचं म्हणजे मतदारसंघातील भाजपच्या नेत्यांनीही त्यांना विरोध दर्शवला आहे. याचा फटका  पिचड यांना निवडणुकीत बसू शकतो. अकोले विधानसभा मतदार संघ पर्यटनाचं मोठं केंद्र आहे. एकीकडं राज्यातील पर्यटन वाढवण्यासाठी शासन प्रयत्न करत असताना अकोलेसारख्या पर्यटन स्थळाकडं दुर्लक्ष होत आहे.

अकोले, भंडारदरा, घाटघर याठिकाणच्या मुख्य रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांची अक्षरश: चाळण झाल्यानं नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. आदिवासी तालुका म्हणून ओळख असली, तरी आदिवासींच्या समस्या ‘जैसे थे’ आहेत.

भाजप प्रवेशानंतर मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांच्यासमोर स्थानिक भाजप व शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय घडवून आणण्याचं मोठं आव्हान आहे. भाजप प्रवेशानंतर आगामी निवडणुकीत शिवसेनेच्या वाट्याला असलेल्या मतदार संघात शिवसेनेच्या भूमिकेला महत्व असून युती होणार, की नाही, यावर अनेक गणितं अवलंबून आहेत. त्यामुळं पिचड कुटुबीयांचा हा बालेकिल्ला अजिंक्य राहणार का? हे आगामी विधानसभा निवडणुकीत स्पष्ट होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment