Tractor Subsidy : कृषी क्षेत्राचा विकास आणि त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांचा विकास हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कृषी क्षेत्राकरता अनेक प्रकारच्या योजना राबविल्या जातात. अशा योजनांच्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील विविध बाबी पूर्ण करण्याकरिता शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात किंवा थेट आर्थिक मदत देखील दिली जाते.
यामध्ये फळबाग लागवडीसाठी देखील योजना आहेत परंतु कृषी यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन देण्याकरिता देखील अनेक यंत्रांच्या खरेदीवर शेतकऱ्यांना अनुदान मिळते. कृषी यंत्रांमध्ये ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित यंत्रे यांना अनन्य साधारण महत्व असून या यंत्राच्या खरेदीवर देखील शासनाकडून राज्य पुरस्कृत यांत्रिकीकरण उप अभियान या योजनेच्या माध्यमातून अनुदान देय आहे.
राज्य पुरस्कृत यांत्रिकीकरण उप–अभियान योजना
शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन मिळावे तसेच विभागनिहाय पिकरचनेनुसार गरजेनुरूप मागणीप्रमाणे पूर्व तपासणी केलेली दर्जेदार कृषी अवजारे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देता यावेत व कृषी उत्पादन प्रक्रियेमध्ये यंत्रसामग्री वापरासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे इत्यादी महत्त्वाची उद्दिष्ट आहेत.यामध्ये लाभार्थींचे निवड करताना राज्यातील जिल्ह्यांना वेगवेगळा लक्षांक देण्यात येतो.
हा लक्षांक निश्चित करताना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रवर्गनिहाय संख्या तसेच पेरणी खालील क्षेत्र, मागील वर्षातील या योजनेनुसार मंजूर कार्यक्रम व मागच्या सहा वर्षांमधील खर्च इत्यादी बाबी लक्षात घेतल्या जातात. या अंतर्गत अनुदान मिळण्याकरिता mahadbtmahit या पोर्टलवर अर्ज मागविण्यात येतात. यामध्ये प्राप्त झालेल्या अर्जांमधून ऑनलाईन लॉटरी पद्धतीने ज्येष्ठताक्रम निश्चित करून पूर्वसंमती दिली जातात. लाभार्थ्यांचे निवड ते अनुदान देणे या सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येतात.
कोणत्या यंत्रांना मिळते अनुदान?
या योजनेच्या माध्यमातून ट्रॅक्टर तसेच पावर टिलर, स्वयंचलित यंत्रे, ट्रॅक्टर चलीत अवजारे, ट्रॅक्टरचलीत पिक संरक्षण अवजारे, पिक काढणी पश्चात प्राथमिक प्रक्रियेसाठी आवश्यक अवजारांचा समावेश आहे.
किती मिळते अनुदान?
या योजनेच्या माध्यमातून सर्वसाधारण किमतीच्या 40 ते 50 टक्क्यांपर्यंत किंवा केंद्र शासनाने अनुदानाची जी काही उच्च मर्यादा घोषित केली आहे त्या मर्यादेपैकी जी कमी असेल इतके अनुदान देण्यात येते. तसेच महत्त्वाचे बाब म्हणजे कृषी अवजारे बँकेची स्थापना करायची असेल एकूण भांडवल खर्चाच्या 40 टक्के अनुदान देण्यात येते.
कशी असते अनुदानाची प्रक्रिया?
या योजनेची पूर्वसंमती मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या आवडीनुसार बाजारातून यंत्र खरेदीची संधी देण्यात येते. यंत्र खरेदी करताना शेतकऱ्यांनी स्वतःच्या बँक खात्यामधून चेक / डीडी किंवा ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करणे आवश्यक असते. त्यानंतर डीबीटी पद्धतीचा वापर करून अनुदानाची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यावर क्रेडिट करण्यात येते. अशा पद्धतीने ही एक महत्वपूर्ण योजना असून ज्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर चलीत अवजारे खरेदीवर अनुदान घ्यायचे असेल असे शेतकरी अधिकच्या माहितीकरिता जवळील कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून माहिती घेऊ शकतात.