सध्या विविध खाद्यपदार्थांमधील भेसळ हा एक खूप चिंतेचा विषय असून त्यामुळे मानवी आरोग्यावर थेट विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. दूध असेल किंवा तूप तसेच इतर दुग्धजन्य पदार्थ इतकेच काय तर मागे जिऱ्यामध्ये देखील भेसळ केल्याची घटना समोर आली होती. त्यामुळे आपण बाजारातून जे खाद्यपदार्थ विकत घेत आहोत ते खरंच शुद्ध आहेत की नाही याची आपल्याला कुठलीही शाश्वती राहत नाही.
हीच बाब तुपाच्या बाबतीत देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसून येते. जर असे भेसळयुक्त तूप विकत घेऊन तुम्ही खाल्ले तर अनेक आजारांना निमंत्रण देऊ शकतात व इतकेच नाही तर हृदयविकाराचा झटका येण्याची देखील शक्यता यामध्ये वाढते. मागील काही दिवसाअगोदर काही मीडियामध्ये बातम्या आल्या होत्या की गुजरातच्या अन्न व औषध नियंत्रण प्रशासनाच्या माध्यमातून नवसारी येथे तब्बल 3000 किलो बनावट तूप जप्त करण्यात आलेले होते व या तुपामध्ये भेसळयुक्त पामोलीन तेल मिसळण्यात आलेले होते.
अशाप्रकारची भेसळ तुपामध्ये केली जाऊ शकते. त्यामुळे तुम्ही बाजारात जर तूप विकत घेत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे. कारण पामोलीन तेलाची भेसळ ही आरोग्याला घातक असून पामोलीन तेलाला हृदयविकाराचे एक प्रमुख कारण समजले जाते. या तेलाच्या सेवनामुळे हृदयाशी निगडित काही आजार देखील होऊ शकतात.
तुपामधील पाम तेलाची भेसळ कशी ओळखावी?
तुम्हाला जर तुपामधील पामतेलाची भेसळ शोधायची असेल तर याकरिता एफएसएसएआयने काही माहिती सांगितली आहे व त्यानुसार बघितले तर…
1- याकरिता दोन कपामध्ये तूप घ्यावे.
2- अशाप्रकारे दोन कपांमध्ये तूप घेतल्यानंतर त्यात एक मिली फेरीक क्लोराईड आणि 0.3 मिली पोटॅशियम फेरीसायनाइड रसायन घालावे व ते चांगले मिसळून घ्यावे.
3- असे केल्यामुळे तुपाचा रंग जर निळा झाला तर समजावे ते तूप भेसळयुक्त आहे आणि तुपाचा रंग जर हिरवा झाला तर ते शुद्ध तूप आहे असे समजावे.
तुपामधील स्टार्चची भेसळ कशी ओळखावी?
1- तुपामध्ये स्टार्च देखील मिक्स केले जाते व अशा पद्धतीने तुपामध्ये स्टार्चची भेसळ केली जाते.
2- तुम्हाला तुपामध्ये स्टार्चची भेसळ आहे की नाही हे ओळखायचे असेल तर या करता एका छोट्याशा बाऊलमध्ये तूप घ्यावे व त्या तुपामध्ये दोन ते तीन थेंब आयोडीन टिंक्चर टाकून ते चांगले मिक्स करून घ्यावे.
3- अशाप्रकारे जर तुपाचा रंग निळा झाला तर समजावे त्यात तुपामध्ये स्टार्चची भेसळ आहे.
बनावट तूप ओळखण्याची साधी आणि सोपी पद्धत
जर आपण याबद्दल काही महत्त्वाची माहिती बघितले तर असे दिसून येते की कुठल्याही प्रकारचे केमिकल न टाकता देखील तुम्ही बनावट तूप ओळखू शकतात. यानुसार एक टीस्पून देसी तूप गरम करावे. अशाप्रकारे जेव्हा तुम्ही तूप गरम कराल तेव्हा तुपाचा रंग तपकिरी होऊ लागेल जेव्हा तुपाचा रंग तपकिरी होतो तेव्हा ते तूप खरे म्हणजे शुद्ध असते. परंतु या ऐवजी जर तुपामध्ये भेसळ असेल तर ते तूप वितळायला वेळ लागतो आणि तुपाचा रंग हलका पिवळा होतो.