Cauliflower Cultivation:- भाजीपाला पिके म्हटली म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये आणि कमीत कमी कालावधीत लाखोत उत्पन्न देणारे पिके म्हणून ओळखले जातात. फक्त बाजारभाव हा योग्य मिळणे गरजेचे असते.त्यामुळे बाजारपेठेचा योग्य अभ्यास करून जर पिकांचे नियोजन केले तर नक्कीच भाजीपाला पिकातून शेतकरी खूप चांगला नफा मिळवू शकतात.
तसे पाहायला गेले तर आता शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रकारची भाजीपाला पिके घेतली जातात व अनेक शेतकरी मोठ्या क्षेत्रावर देखील भाजीपाला लागवडीचा प्रयोग यशस्वी करून विश्वास बसणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळवतात.
अशा पिकांच्या लागवडीमध्ये व्यवस्थापनाला अतिशय महत्त्व असते व तुमचे व्यवस्थापन जितके नीटनेटके व अचूक असेल तितका फायदा हा भरघोस उत्पादन मिळवण्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना होत असतो.
अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात असलेला घोडेश्वर येथील अस्लम चौधरी या उच्चशिक्षित असलेल्या शेतकऱ्याची यशोगाथा बघितली तर या शेतकऱ्याने तब्बल आठ एकर क्षेत्रावर पत्ता कोबी उत्पादनाचा प्रयोग यशस्वी केला असून
जर आता जो बाजारभाव आहे तसाच बाजारभाव जर त्यांना मिळाला तर अडीच महिन्याच्या या पिकातून त्यांना तब्बल 54 लाखांचे उत्पन्न येईल अशी अपेक्षा आहे. सध्या त्यांच्या शेतातून कोबीची काढणी सुरू झाली आहे व परिसरातील व्यापारी शेताच्या बांधावर येऊन कोबीची खरेदी करीत आहेत.
आठ एकर पत्ता कोबीतुन मिळणार 54 लाखांचे उत्पन्न?
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात असलेल्या घोडेश्वर या गावचे प्रयोगशील आणि उच्च शिक्षित शेतकरी अस्लम चौधरी यांनी आठ एकर क्षेत्रावर पत्ताकोबीची लागवड केली व आज त्यांना उत्पादन मिळायला लागले आहे. सध्या जो बाजारभाव चालू आहे त्यानुसार जर बाजारभाव मिळाला तर तब्बल 54 लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल असा अंदाज त्यांना आहे.
जर आपण अस्लम चौधरी यांचे शिक्षण बघितले तर ते बीएससी पदवीधर असून नोकरीच्या मागे न लागता त्यांनी शेतीमध्ये स्वतःचे करिअर करण्याच्या दृष्टिकोनातून खूप मोठे काम सुरू केले आहे.
चौधरी हे केळी तसेच द्राक्ष इत्यादी बागायती पिके देखील घेतात. तसेच ते कायम शेतीमध्ये वेगवेगळ्या पिकांचे प्रयोग करत असतात व या प्रयोगाचाच भाग म्हणून त्यांनी त्यांच्या गावापासून जवळ असलेल्या 8 एकर शेतामध्ये अडीच महिन्यांपूर्वी कोबीची लागवड केली व या पिकाचे योग्य व्यवस्थापन तसेच तणनियंत्रण योग्य पद्धतीने ठेवल्यामुळे चांगले उत्पादन त्यांना मिळाले.
सध्या त्यांच्या शेतातून मिळणारा कोबीचा एक गड्डा साधारणपणे दीड किलो वजनाचा असल्यामुळे संपूर्ण आठ एकरमधून सरासरी 270 टन उत्पादन निघेल असा अंदाज त्यांना आहे. वीस रुपये प्रतिकिलोचा दर गृहीत धरला तरी त्यांना 54 लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.
कसं केले त्यांनी कोबी पिकाचे नियोजन?
चौधरी यांच्या शेतामध्ये जर पाणी व्यवस्थापनाच्या सोयी बघितल्या तर 78 फूट खोल आणि तीस फूट रुंद इतक्या मोठ्या आकाराची विहीर आहे. तसेच त्यांनी भीमा नदीवरून आठ इंची पाईपलाईन देखील टाकली आहे व त्या माध्यमातून नियोजन केलेले आहे.
पत्ताकोबी लागवडीचे जर त्यांचे नियोजन बघितले तर आठ एकर क्षेत्रामध्ये त्यांनी एक लाख 80 हजार रोपांची लागवड केली आहे. एक रोप त्यांना 60 पैसे प्रतिनग या दराने मिळाले आहे याकरिता त्यांना एकरी 45 हजार रुपये एकूण खर्च आलेला आहे.
असे मिळून आठ एकर करिता तीन लाख 60 हजार रुपये उत्पादन खर्च आला. 70 दिवसां अगोदर केलेले लागवड सध्या काढणीच्या स्थितीत आहे व अंदाजे एका गड्डयाचे वजन दीड किलोच्या आसपास आहे.
तसेच त्यांनी पिक तणमुक्त ठेवण्यावर मोठ्या प्रमाणावर भर दिला. तण व्यवस्थापन योग्य प्रकारे केल्यामुळे कोबी पिकावर इतर कीड आणि रोगांचा देखील प्रादुर्भाव झाला नाही. या सगळ्या प्रकारच्या योग्य व्यवस्थापनामुळे ते कोबीचे भरघोस उत्पादन मिळवण्यामध्ये यशस्वी झाले आहेत.