Compost Fertilizer: ‘ही’ पद्धत वापरा आणि घरच्या घरी कंपोस्ट खत तयार करा! कंपोस्ट खत एक फायदे अनेक

Compost Fertilizer:- पिकांच्या भरघोस उत्पादनाकरिता शेतकरी विविध प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात. परंतु रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे जमिनीचे आरोग्य तर खराब झालेच परंतु त्याचा विपरीत परिणाम मानवी आरोग्यावर देखील होण्याची दाट शक्यता असते.

त्यामुळे आता सेंद्रिय शेती पद्धत शेतकऱ्यांनी अवलंबली असून या शेती पद्धतीमध्ये रासायनिक खते व कीटकनाशकांना कुठल्याही प्रकारचा थारा नसतो. यामध्ये प्रामुख्याने शेणखत, कंपोस्ट खत तसेच गांडूळ खताचा वापर केला जातो व कीटकनाशकांसाठी निंबोळी अर्क इत्यादी सेंद्रिय उत्पादने वापरले जातात.

या अनुषंगाने जर आपण कंपोस्ट खत निर्मिती किंवा कंपोस्ट खताचे फायदे पाहिले तर शेतीसाठी आणि पिकांच्या भरघोस उत्पादनाकरिता खूप महत्त्वाचे आहे. या अनुषंगाने आपण कंपोस्ट खताची निर्मिती व त्याचे फायदे बघणार आहोत.

 कंपोस्ट खताचे प्रकार

रासायनिक खतांच्या बेसुमार वापर केल्यामुळे जमिनीमधील सेंद्रिय कार्बनचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर घटले आहे. तसेच रासायनिक कीटकनाशकांच्या फवारणीने जमिनीतील उपयुक्त जिवाणू व गांडूळ मृत्यूमुखी पडतात व जमिनीचे सुपीकता यामुळे कमी होते. त्यामुळे आपल्याला अनेक प्रकारच्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागत आहे.

या अनुषंगाने कंपोस्ट खत तयार करणे व त्याचा वापर हा खूप महत्त्वाचा आहे. कंपोस्ट खत तयार करण्याच्या पद्धती पाहिल्या तर यामध्ये बायोडायनामिक पद्धत तसेच गांडूळ खत, विविध प्रकारच्या कल्चरचा वापर करून कुजविले जाणारे खत, गांडूळ खत तसेच खड्डा पद्धतीने कुजविलेले खत असे अनेक प्रकार यामध्ये आपल्याला दिसून येतात.

प्रत्येक शेतकऱ्याच्या दाराशी  गाई म्हशी असतात. त्यासोबतच शेळ्या व मेंढ्या देखील असतात. अशा प्राण्यांपासून जे काही शेण मिळते व हे शेण खड्डा पद्धतीने शेतकरी बंधू साठवून ठेवतात आणि पावसाळा सुरू होण्यापूर्वी जसेच्या तसे ते शेतामध्ये टाकतात. परंतु त्या शेणखताचे व्यवस्थित विघटन झाल्यामुळे शेणाचे गोळे यामध्ये शिल्लक राहतात व त्याचा दुष्परिणाम होतो. तसेच अपेक्षित परिणाम मिळत नाही.

 कंपोस्ट खतामुळे अळीचे देखील होते नियंत्रण

शेणाचे विघटन व्यवस्थित न झाल्यामुळे हुमणी अळी त्यामध्ये तयार होते. हे न कुजलेले शेण खताच्या माध्यमातून ही अळी शेतामध्ये प्रवेश करते व शेतात असलेल्या पिकांवर हल्ला चढवते. या अळीने पिकांची मुळे खाल्ल्यामुळे पिके सुखायला लागतात. याकरिता शेणखतामध्ये कल्चर सोडून त्याची विघटन करणे गरजेचे आहे.

याकरिता बाजारामध्ये अनेक प्रकारचे वेस्ट डीकंपोजर सारखे जिवाणू कल्चर उपलब्ध आहेत व हे कल्चर पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याचा काडीकचरा व शेणखतावर फवारणी करून काडी कचऱ्याचे विघटन करता येते व या प्रक्रियेला बायो कल्चर कंपोस्ट किंवा कंपोस्ट कल्चर असे देखील म्हणतात.

 कंपोस्ट खत तयार करण्याकरता कल्चर कसे वापराल?

याकरिता बाजारांमधून कोणतेही कल्चर विकत आणावे व चांगला परिणाम येण्यासाठी एक लिटरचे कल्चर 100 लिटर पाण्यामध्ये मिसळावे व चांगले हलवून घ्यावे. शेणखताचा जो काही खड्डा असतो त्यामध्ये एका लाकडी काडीने चांगले होल करून घ्यावा व या पाडलेल्या होलमध्ये हे कल्चरयुक्त पाणी सोडावे.

त्यानंतर हा शेणखताचा खड्डा काडीकचऱ्याने झाकून ठेवावा त्यावर अधून मधून पाणी शिंपडावे. ही प्रक्रिया केल्यानंतर साधारणपणे 40 दिवस झाल्यानंतर चांगल्या प्रतीचे दर्जेदार असे कंपोस्ट खत तयार होते.अशा पद्धतीने कल्चरचा वापर केल्यामुळे दहा ट्रॉली शेणखत निघत असेल त्या ठिकाणी चांगल्या दर्जाचे तीन ट्रॉलीच्या आसपास कंपोस्ट खताची निर्मिती होते.

बाजारामध्ये हे लिक्विड कल्चर औषध हजार रुपयांमध्ये एक लिटर इतके मिळते. हे लिक्विड पाण्यामध्ये मिसळून ते शेणाच्या खड्ड्यावर किंवा ओल्या काडी कचऱ्यावर मारल्यामुळे त्याचे उत्तम अशा कंपोस्ट खतामध्ये रूपांतर होते.

अशा पद्धतीने तुम्ही कल्चरचा वापर करून कंपोस्ट खत निर्मिती करू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe