Farmer Success Story : भारत हा कृषीप्रधान देश. मात्र शेतीमध्ये सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याने कृषीप्रधान देशात आता शेतकरी राजाच शेती नको रे बाबा असा ओरड करू लागला आहे. परंतु राज्यात असेही अनेक नवयुवक आहेत जे शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग राबवत तोट्यात समजल्या जाणाऱ्यां शेतीला फायद्याचा सौदा बनवत आहेत.
सोलापूर जिल्ह्यातही असाच एक नाविन्यपूर्ण प्रयोग पाहायला मिळाला आहे. जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात एका इंजिनीयर तरुणाने चक्क लाल केळीची शेती यशस्वी करून दाखवली आहे. यामुळे सध्या या अवलियाची चांगलीचं चर्चा रंगली आहे. खरं पाहता महाराष्ट्रात केळीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.
केळीच उत्पादन खानदेश मध्ये सर्वाधिक पाहायला मिळते. राज्यात G9 या जातीचे केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परंतु लाल केळी तसेच इलायची केळीचे उत्पादन कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन राज्यातच पाहायला मिळते. दरम्यान आता या जातीच्या केळीचे उत्पादन आपल्या सोलापूर जिल्ह्यातही एका सिव्हिल इंजिनियर तरुणाने घेऊन दाखवले आहे.
विशेष म्हणजे या शेतीतून या शेतकऱ्याने कोट्यावधी रुपयांची कमाई केली आहे. अभिजीत पाटील असे या नवयुवकाचे नाव. खरं पाहता अभिजीत यांच्या कुटुंबांचा मुख्य व्यवसाय हा शेतीचं त्यांचे वडील केळीचे उत्पादन केल्या अनेक वर्षांपासून घेत आहेत. त्यांनी देखील इंजिनिअरिंगच शिक्षण झाल्यानंतर आपल्या वडिलांना शेतीमध्ये मदत करण्यास सुरुवात केली आहे.
ज्यावेळी ते मार्केटमध्ये नेहमीची अर्थातच जी नाईन जातीची केळी विक्रीसाठी जात त्यावेळी त्यांना तिथे इलायची केळी तसेच लाल केळी पाहायला मिळाली. विशेष म्हणजे या केळीचा दर मॉलमध्ये 120 रुपये प्रति किलो असा असल्याचे अभिजीत यांना समजले. त्यानंतर त्यांनी या केळीच्या लागवडीचा प्रयोग आपल्या शेतात राबवण्याचा निर्णय घेतला.
अभिजीत पाटील करमाळा तालुक्यातील वाशिंबे येथील रहिवासी शेतकरी. उजनी धरणाच्या काठावर त्यांच रान. केळीची शेती करण्यापूर्वी अभिजीत यांचे वडील उसाची लागवड करत असत. मात्र अतिरिक्त उसाचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर त्यांनी ऊस शेतीला पर्याय म्हणून केळीची लागवड केली. त्यांच्या वडिलांनी 2005 मध्ये जी नाईन या जातीची केळी लागवड केली.
मात्र या जातीच्या केळीला कधी चांगला दर मिळेल तर कधी खूपच कमी. त्यामुळे केळीच्या शेतीला पर्याय अभिजीत शोधू लागले. तितक्यातच त्यांना इलायची केळी लागवड करण्याची कल्पना सुचली. 2015 मध्ये त्यांनी लाल केळी तसेच इलायची केळी लागवड केली. त्यावेळी त्यांनी सात एकर क्षेत्रावर वेलची केळी लावली. वेलची केळी ही केवळ दोन ते तीन इंच लांब असते आणि हिरवी असते. मात्र या जातीच्या केळीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात तसेच चवीला ही केळी अतिशय अप्रतिम असते.
सात एकर क्षेत्रात केळी लागवड केली आणि अवघ्या दहा महिन्यात 12 ते 15 टन इलायची केळीचे उत्पादन मिळाले. त्यावेळी पन्नास रुपये किलोचा दर मिळाला आणि लाखोंची कमाई झाली. यानंतर त्यांनी 30 एकर क्षेत्रावर या केळीची लागवड केली. दहा महिन्यांनी यातून त्यांना जवळपास दीड कोटींची कमाई झाली. यानंतर 2019 मध्ये अभिजीत यांनी आपल्या तीन एकर शेत जमिनीवर लाल केळी लावली. विशेष म्हणजे या केळीसाठी त्यांनी सेंद्रिय खतांचा वापर केला.
14 महिने योग्य पद्धतीने जोपासना केल्यानंतर यातून त्यांना 18 ते 20 टन केळीचे उत्पादन मिळाले. या केळीला 50 ते 75 रुपये प्रति किलो असा दर मिळाला. अभिजीत यांचा हा प्रयोग देखील यशस्वी झाला. अभिजीत यांच्या केळी लागवडीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर परिसरात जवळपास 500 एकर क्षेत्रावर इलायची आणि लाल केळी लागवड करण्यात आली आहे. केळीच्या शेती व्यतिरिक्त अभिजीत सिताफळ शेतीतून देखील एकरी पाच लाखांची कमाई करत आहे.
त्यांनी आठ एकरावर गोल्डन सिताफळ लागवड केली आहे. याव्यतिरिक्त रेड ड्रॅगन आणि व्हाईट ड्रॅगन याची लागवड करण्यात आली असून यातून त्यांना एकरी दहा लाखांची कमाई होत आहे. विशेष म्हणजे त्यांनी उत्पादित केलेल्या रेड बनाना आणि इलायची केळी खरेदीसाठी मल्टिनॅशनल कंपनी त्यांच्या बांधावर हजेरी लावते. निश्चितच केळी शेतीचा हा प्रयोग इतरांसाठी मार्गदर्शक ठरणार असून स्वतः सिव्हिल इंजिनिअरिंगच शिक्षण घेतल्यानंतर देखील शेती व्यवसायात आपलं करिअर घडवण्याचा हा निर्णय अभिजीत यांच्यासाठी फायदेमंद ठरला आहे.