Organic Farming:- एखाद्या तरुणाने उच्च शिक्षण घेतले व त्याला जर आपण विचारले की आता उच्च शिक्षण पूर्ण झाले आहे तर नोकरी करणार की शेती?तर याचे उत्तर प्रामुख्याने नोकरी हेच येईल. कारण प्रत्येकाच्या मनामध्ये असते की उच्च शिक्षण घ्यावे व चांगल्या पगाराची नोकरी मिळाली की स्थिरस्थावर असे जीवन जगावे.
त्यातल्या त्यात शेतीसारख्या व्यवसायाकडे गेल्या काही वर्षांपासून तरुणांचे दुर्लक्ष झाल्याचे आपल्याला दिसून येते. त्यामागे कारण पहिले तर प्रामुख्याने शेतीचे निसर्गावर असलेले अवलंबित्व हे सांगता येईल. पाऊस चांगला झाला तर शेतीमध्ये चांगले उत्पादन येते. त्या उलट मात्र दुष्काळ जर पडला तर मात्र शेतीमधून एक रुपया देखील आपल्याला मिळत नाही.
त्यासोबतच गेल्या काही वर्षांपासून अवकाळी तसेच गारपिटी सारख्या नैसर्गिक आपत्तींनी शेती व्यवसाय पुरता मोडीत काढल्याची स्थिती आहे. अशा प्रसंगी शेतीकडे उच्च शिक्षण घेऊन कोणी येईल याची शक्यता खूपच कमी वाटते. परंतु सध्या आता परिस्थिती हळूहळू बदलताना दिसून येत आहे. कारण उच्च शिक्षण घेऊन देखील आपल्याला चांगली नोकरी मिळेल याची शाश्वती राहिली नाही.
त्यामुळे आता बरेच तरुण हे शेतीकडे वळत असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती फायद्याची करताना दिसून येत आहेत. परंतु समाजामध्ये असे देखील काही व्यक्ती आहेत की ज्यांच्याकडे भरघोस पगाराच्या नोकऱ्या असताना देखील नोकऱ्या सोडल्या आणि शेतीमध्ये येऊन नशीब आजमावले व ते यशस्वी देखील झाले.
अगदी याच पद्धतीने जर आपण पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात असलेल्या भोडणी या गावचे सत्यजित हांगे आणि अजिंक्य हांगे या दोन भावांचा विचार केला तर हे दोघेही भाऊ उच्चशिक्षित असून बँकेमध्ये यांना चांगल्या पगाराची नोकरी असताना देखील यांनी बँकेच्या नोकरीला रामराम ठोकून सेंद्रिय शेती सुरू केली व आज ते यामध्ये यशाच्या शिखरावर पोहोचल्याचे चित्र आहे.
हांगे बंधूंनी सेंद्रिय शेतीत घडवले करिअर
याबाबत सविस्तर वृत्त असे की, इंदापूर तालुक्यातील भोडणी या गावचे सत्यजित आणि अजिंक्य हांगे हे उच्चशिक्षित असून त्यांनी कॉम्प्युटर सायन्स आणि अर्थशास्त्रामध्ये पदवी घेतलेली आहे व त्यानंतर त्या दोघांनी पुणे युनिव्हर्सिटी मधून एमबीए देखील पूर्ण केले व या शिक्षणाच्या बळावर त्यांनी कोटक बँक आणि एचडीएफसी बँक यासारख्या मोठ्या बँकांमध्ये नोकरी मिळवली.
परंतु या नोकरीमध्ये त्यांचे मन रमत नसल्यामुळे व घरची शेतीची पार्श्वभूमी असल्यामुळे त्यांना शेती करण्याची आवड होती. याकरिता दोघे भाऊ एकत्रितपणे आले व त्यांनी विचार करून साधारणपणे 2012 यावर्षी नोकरीला रामराम ठोकला व शेती करण्याचे निश्चित केले.
शेती करण्यासाठी त्यांनी सेंद्रिय पद्धतीने पिकांचे उत्पादन घेण्याचे ठरवले व त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले व 2017 यावर्षी त्यांनी टू ब्रदर्स ऑरगॅनिक फार्म नावाने सेंद्रिय वस्तूंचा व्यवसाय देखील सुरू केला व त्यांचा आज हा व्यवसाय 3 कोटींच्या वार्षिक उलाढाली पर्यंत पोहोचलेला आहे.
अगोदर त्यांनी खूप कमी प्रमाणामध्ये सेंद्रिय पद्धतीने पिके घ्यायला सुरुवात केलेली होती. परंतु आज हळूहळू त्यांचा सेंद्रिय शेतीचा आवाका 20 एकर पर्यंत पसरलेला आहे. दोघेही भावांनी सेंद्रिय शेतीच नाही तर सेंद्रिय उत्पादनांच्या निर्मितीत देखील मोठ्या प्रमाणावर प्रगती केली असून दैनंदिन वापरातील अनेक उत्पादने आज ते विक्री करतात.
त्यांनी स्थापन केलेल्या टू ब्रदर्स ऑरगॅनिक फार्मच्या माध्यमातून ते गुलकंद, डाळी तसेच तूप, तांदूळ, लाडू आणि चवनप्राश इत्यादी जैविक उत्पादनांचे निर्मिती करून त्यांचे ब्रँड देखील त्यांनी विकसित केलेले आहेत व हे सर्व ब्रँड ग्राहकांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. अशा पद्धतीने दोघे भावांनी सेंद्रिय शेती व सेंद्रिय उत्पादनाची निर्मिती आणि विक्री यातून खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक प्रगती साधली आहे.