Onion Farming : कांदा हे महाराष्ट्रात उत्पादित केला जाणार एक मुख्य नगदी पीक. मात्र सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या हवामान बदलाचा या पिकावर विपरीत परिणाम पाहायला मिळत आहे. अवकाळी पाऊस ढगाळ हवामान यामुळे कांदा पिकावर वेगवेगळ्या रोगांचे सावट आले आहे.
यामुळे उत्पादक शेतकरी बांधवांची काळजाची धडधड वाढली आहे. खरं पाहता या पिकाची महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात शेती केली जाते. साहजिकच या पिकावर राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असते. परंतु आता या मुख्य पिकावर निसर्गाच्या लहरीपणामुळे वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव बघायला मिळत आहे.
कांद्यावर प्रामुख्याने फुलकिडे, करपा आणि पिळ रोगाचा प्रादुर्भाव आहे. या रोगांवर वेळीच जर उपाययोजना केली नाही तर उत्पादनात भली मोठी घट येऊ शकते असे मत जाणकार व्यक्त करत आहेत. यामुळे शेतकरी बांधवांनी या रोगांवर वेळेतच नियंत्रण मिळवणे अतिआवश्यक आहे.
याशिवाय अवकाळी पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे तसेच काही ठिकाणी धुके आणि दवचे प्रमाण वाढले असल्याने मातीमध्ये बुरशीचे देखील अतिक्रमण होणार आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी तज्ञ लोकांचा सल्ला घेऊन तातडीने कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची संयुक्त फवारणी करावी असा सल्ला दिला जात आहे.
खरं पाहता या हवामानात झालेल्या अचानक बदलाचा कांदा समवेत सर्व मुख्य पिकांवर परिणाम झाला आहे. आतापर्यंत कांदा पीक अतिशय जोमात होते, पण या अवकाळी व ढगाळ वातावरणामुळे पिकावर फुलकिडे, करपा, पीळ, मर आणि जमिनीत बुरशीचे प्रमाण वाढले आहे.
दरम्यान या रोगांवर जर वेळीच नियंत्रण मिळवले नाही तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. यामुळे आज आपण या रोगावर कशा पद्धतीने शेतकरी बांधव नियंत्रण मिळू शकतात किंवा यासाठी शेतकऱ्यांनी कोणती फवारणी केली पाहिजे याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.
कांदा पिकावरील मर रोग : मर रोगामुळे कांदा पीक संकटात सापडले आहे. या रोगामुळे उत्पादनात निम्म्याहुन अधिक घट होऊ शकते. म्हणून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मेटाले कजिल (८% थझ) + मॅनकोजेव (६४% थझ) ह्या बुरशीनाशकाचे २ ग्राम प्रतिलीटर या प्रमाणात द्रावण तयार करून मुळांजवळ आळवणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
कांदा पिकावरील तपकीरी करपा रोगाचा प्रादुर्भाव : या करपा रोगाचा प्रादुर्भाव सध्या राज्यातील बहुतांशी भागात पाहायला मिळत आहे. याच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी प्रॉपिकोनॅझोल (२७% ईसी) किंवा हेक्झाकोनॅझोल (७% एससी) किंवा ट्रायसायक्लाझोल (७५% थझ) ह्या बुरशीनाशकाच्या द्रावणाची १ मिलि / ग्राम प्रतिलीटर या प्रमाणात फवारणी करावी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
कांदा पिकांवर फुलकिडे: फुलकिडीमुळे पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि उत्पादनात घट होऊ शकते. यामुळे उत्पादक शेतकऱ्यांनी याच्या नियंत्रणासाठी फिप्रोनिल (५% एससी) १ मिलि प्रतिलीटर किंवा काबीसल्फान ( २५% ईसी) या कीटकनाशकाची २ मिलि प्रतिलीटर या प्रमाणात घेऊन फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.