Potato Farming: बटाटा लागवडीतून लाखात उत्पन्न मिळेलच! फक्त वापरा या महत्त्वाच्या टिप्स, होईल फायदा

Ajay Patil
Published:
potato crop

Potato Farming:- कुठेही पिकापासून जर भरघोस उत्पादन हवे असेल तर जमिनीची पूर्व मशागती पासून तर पिकाच्या काढणीपर्यंत सगळ्या टप्प्यांवर खूप व्यवस्थितपणे नियोजन करणे गरजेचे असते. तरच भरघोस उत्पादन आपल्याला मिळणे शक्य होते. अनेक छोट्या छोट्या बाबी लक्ष ठेवून आणि वेळेत पूर्ण केल्या तर पिकापासून भरघोस उत्पादन हे आपल्याला नक्की मिळतेच मिळते. मग ते परंपरागत पिके असो किंवा भाजीपाला पिके किंवा बटाट्यासारखी कंद पिके याकरिता वेळेत व्यवस्थापन करणे गरजेचे असते.

अगदी याच पद्धतीने जर आपण बटाटा या पिकाचा विचार केला तर भरघोस उत्पादनाकरिता आणि छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असते. त्यामुळे बटाटा पिकापासून खूप चांगले उत्पादन आणि पैसा देखील मिळतो. या अनुषंगाने या लेखात आपण बटाटा पिकापासून भरघोस उत्पादन आणि नफा मिळवण्याकरिता महत्त्वाच्या असलेल्या  बाबी पाहणार असून ते शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरतील.

 बटाटा पिकापासून भरघोस उत्पादनाकरिता महत्त्वाच्या टिप्स

बटाटा पिकापासून भरघोस उत्पादन हे जमिनीच्या निवडीवर जेवढे अवलंबून आहे तेवढेच ते योग्य वेळी लागवड करण्यावर देखील अवलंबून आहे. तसेच लागवड करताना ती गादीवाफ्यावर केल्यास पाण्याचा निचरा करण्याची समस्या दूर होते व यामुळे फळसड व इतर समस्या निर्माण होत नाहीत.

बटाटा उत्पादनामध्ये जमिनीची निवड खूप महत्त्वाची असून पाण्याचा योग्य निचरा होणारी व भुसभुशीत तसेच पोयट्याची जमीन असली तर खूप फायदा होतो. पाणी दिल्यानंतर जर जमीन कठीण होत असेल किंवा घट्ट होत असेल तर बटाटा पिकासाठी अशी जमीन योग्य नसते.

 या गोष्टींची घ्यावी काळजी

बटाटा लागवड करायची असेल तर प्रामुख्याने ती ऑक्टोबर ते नोव्हेंबर या महिन्याच्या दरम्यान करणे गरजेचे आहे. कारण या पिकाला थंड हवामानाची गरज असते व योग्य वाढ होण्याकरिता 22 ते 24 अंश सेल्सिअस तापमान लागते. जमिनीच्या मध्ये बटाट्याची वाढ व विकास होत असल्यामुळे या पिकाची शाकीय वाढ झाल्यानंतर मात्र कंदाची निर्मिती होण्याकरिता 18 ते 20 अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते.

बटाट्याची योग्य वाढ व विकास होण्याकरिता गादी वाफ्यावरच लागवड करणे गरजेचे आहे. बऱ्याच ठिकाणी बटाटा लागवडीकरिता सरी वरंबा पद्धतीचा देखील वापर केला जातो. या पद्धतीमध्ये दोन ओळीतील अंतर दोन फूट तर दोन रोपातील अंतर जमिनीचा मगदूर व जातीनुसार साधारणपणे 30 ते 45 सेंटीमीटर इतका ठेवावा.

 बेण्याची निवड असते महत्त्वाची

बटाटा लागवड करण्याकरिता कंदाची सुफ्तावस्था पूर्ण झालेल्या कंदाचीच निवड करावी. बटाट्याची काढणी केल्यानंतर लगेच लागवडीसाठी निवड करू नये. बटाट्यामध्ये सुप्तावस्था असल्यामुळे काही कालावधी करिता बटाट्याचे साठवणूक केल्यानंतर ज्या बेण्यावर कार्यक्षम डोळ्यांची संख्या असेल अशा बेण्याचीच निवड लागवडीकरिता करावी. एका हेक्टर करिता 15 ते 20 क्विंटल बेणे लागते. बेणे साधारणपणे तीस ते पस्तीस ग्रॅम वजनाचे व कार्यक्षम डोळे असणारे आवश्यक असते.

 लागवडीअगोदर बेणे प्रक्रिया असते खूप महत्त्वाची

जर आपण बटाट्यावर येणाऱ्या रोगांचा विचार केला तर प्रामुख्याने उशिरा व लवकर येणारा अशा दोन प्रकारच्या करपा रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. हा प्रादुर्भाव टाळायचा असेल तर बेणे लागवडीच्या अगोदर मेन्कोझेब तीन ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात द्रावण घेऊन त्यामध्ये किमान अर्धा तास बेणे बुडवावे.

जर तुमचे वीस क्विंटल बेणे असेल तर त्याकरिता शंभर लिटरचे द्रावण पुरेसे ठरते. तसेच बेण्याची वाढ चांगली व्हावी याकरिता नत्रयुक्त घटकांची पूर्तता करण्यासाठी अडीच किलो ऍझोटोबॅक्‍टर व त्यामध्ये अधिक पाचशे मिली द्रवरूप ऍझोटोबॅक्‍टर प्रति 100 लिटर पाणी अशाप्रकारे तयार द्रावणामध्ये बटाटे कमीत कमी अर्धा तास पर्यंत बुडवून ठेवावेत व हे द्रावण वीस क्विंटल बटाटा बियाण्यासाठी पुरेसे होते.

 भरघोस उत्पादनाकरिता अशा पद्धतीने करावे खत व्यवस्थापन

जर तुम्हाला एक हेक्टर क्षेत्रामध्ये लागवड करायची असेल तर लागवडी पूर्वी किंवा लागवड करणे वेळी जेव्हा तुम्ही रान बांधतात तेव्हा 15 ते 20 टन उत्तम कुजलेले शेणखत मिसळून घ्यावे. लागवडीच्या वेळी जेव्हा तुम्ही रानाची बांधणी कराल तेव्हा 208 किलो युरिया, डीएपी 128 किलो आणि म्युरेट ऑफ पोटॅश दोनशे किलो प्रति हेक्टर याप्रमाणे मात्रा द्यावी.

लागवडीनंतर 40 दिवस झाल्यानंतर जमिनीमध्ये बटाट्याची वाढ व विकास व्हायला सुरुवात होते. या कालावधीमध्ये मात्र पिकामध्ये कुठल्याही प्रकारची आंतरमशागत करू नये. जेव्हा पीक तीस दिवसांचे असते तेव्हाच खुरपणी तसेच पिकाला भर देणे वगैरे अंतर्मशागतीची कामे आटपून घ्यावीत.

खांदणी करून खोडालगत मातीची भर द्यावी. या वेळेला प्रतिहेक्टर साधारणपणे 104 किलो युरिया खताची मात्रा द्यावी व हेक्टरी 100 किलो नत्र, 60 किलो स्फुरद व 120 किलो पालाश द्यावे व नत्र मात्र दोन वेळा विभागून द्यावे.

अशाप्रकारे जर बटाटा पिकाचे नियोजन केले तर नक्कीच भरघोस उत्पादन मिळणे शक्य आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe