Vegetable Farming:- शेती क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून मोठ्या प्रमाणावर अनेक प्रकारच्या बागायती पिकांची लागवड करून शेतकरी लाखो रुपये कमवत आहेत. शेतीला आता तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यामुळे आणि पारंपारिक पिकांऐवजी भाजीपाला आणि फळबागांची लागवड शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरताना दिसून येत आहे.
जर आपण काही शेतकरी बघितले तर अगदी मोठ्या क्षेत्रात देखील भाजीपाला पिकांची लागवड करत असून त्याला तंत्रज्ञानाची जोड देऊन लाखो नाहीतर कोटीत नफा मिळवत असून शेती क्षेत्रामध्ये त्यांनी उत्तम प्रगती साधल्याचे आपल्याला दिसून येते.
अगदी याच पद्धतीने आपण मध्य प्रदेश राज्यातील शिवपुरी जिल्ह्यातील रावत बंधूंची कृषी क्षेत्रातील कामगिरी बघितली तर ती इतर शेतकऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.
रावत बंधू घेतात आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने विविध बागायती पिकांचे उत्पादन
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शिवपुरी जिल्ह्यातील कोलारस तालुक्यातील निवोडा या गावचे रहिवाशी असलेले गिरधर आणि महेंद्र रावत या दोन्ही बंधूंनी 2015 पासून तब्बल 100 एकर क्षेत्रामध्ये हिरव्या भाजपाला आणि फळबागांच्या लागवडीतून उत्तम अशी आर्थिक प्रगती साधली आहे.
त्यांनी यामध्ये पॉलिहाऊस तंत्रज्ञानाचा वापर केला आहे व तीन एकरमध्ये चार पॉलिहाऊस उभारून विविध भाजीपाला पिकांची रोपे देखील ते त्या पॉलीहाऊस मध्ये तयार करतात. या रोपांची विक्री इतर शेतकऱ्यांनाही करतात व स्वतःच्या शेतासाठी देखील तीच रोपे ते वापरतात.
या भाजीपाला पिकांच्या रोपामध्ये प्रामुख्याने टोमॅटो, सिमला मिरची तसेच कोबी, वांगी, टरबूज आणि काकडी सारख्या भाजीपाला पिकांची रोपे तयार करतात. आज या संपूर्ण शेतीमधून ते वर्षाकाठी चार कोटींपेक्षा अधिक उलाढाल करत आहेत.
अशा पद्धतीने वळले आधुनिक शेतीकडे
रावत बंधूंचे वडील रामचरण लाल रावत अगोदर पारंपारिक शेती करत होते व यामध्ये प्रामुख्याने गहू आणि मोहरीची लागवड करायचे.परंतु 2006 पासून गिरधर आणि महेंद्र रावत यांनी शेती क्षेत्रामध्ये पाऊल ठेवले व ते देखील शेती करू लागले. परंतु पारंपारिक शेतीमध्ये मात्र होणारा खर्च आणि मिळणारा नफा यांचा कुठेच ताळमेळ बसत नसल्याचे त्यांना दिसून आले.
त्यामुळे शेतीमध्ये काहीतरी बदल करावा या उद्देशाने 2015 मध्ये हे दोघेजण अजंद या ठिकाणी गेले व तेथे वायर आणि बांबूवर टोमॅटोची लागवड केलेली त्यांनी पाहिली. त्यानंतर तिथेच काही दिवस राहून संपूर्ण माहिती घेतली व परत आल्यावर त्याच पद्धतीने चार एकर शेत जमिनीवर टोमॅटोची लागवड सुरू केली.
चार एकर टोमॅटो लागवडीसाठी त्यांना तब्बल दोन लाख रुपये खर्च तेव्हा आला व नफा मात्र वीस लाख रुपयांचा झाला. त्यानंतर त्यांचा उत्साह वाढला व त्यांनी टोमॅटोची लागवड करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये जर आपण 2016 चे उदाहरण पाहिले तर त्यांनी 50 एकर क्षेत्रावर ठिबक सिंचन, बांबू आणि तारांच्या साह्याने टोमॅटोची लागवड केली.
परंतु त्या काळामध्ये नोटबंदी झाली व त्यामुळे त्यांच्या नफ्यावर मात्र विपरीत परिणाम झाला. तसेच 2017 मध्ये देखील टोमॅटोची बियाणे दर्जेदार मिळाले नाही व त्यामुळे उत्पादनात घट येऊन त्याचा देखील फटका यांना बसला. परंतु या वर्षी जर बघितले तर त्यांनी तब्बल 80 एकर क्षेत्रामध्ये टोमॅटो,
पाच एकरमध्ये कोबी आणि 12 एकरमध्ये सिमला मिरचीची लागवड करून बंपर उत्पादन मिळवले आहे. 15 जुलै रोजी त्यांनी टोमॅटोची लागवड केली व 15 सप्टेंबर पासून टोमॅटोचे उत्पादन त्यांना मिळायला लागले.
अशाप्रकारे मिळते त्यांना आर्थिक उत्पन्न
आज टोमॅटोची काढणी सुरू झाली असून त्यांना टोमॅटो विक्रीसाठी कुठल्याही बाजारात जाण्याची गरज भासत नाही. कारण दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील बरेच व्यापारी त्यांच्या शेताच्या बांधावर येऊन टोमॅटोची खरेदी करतात. सध्या दिवसाला दररोज आठशे ते नऊशे क्रेट टोमॅटो वेगवेगळ्या बाजारपेठेमध्ये ते पाठवत असून त्यांची विक्री केली जात आहे.
तसेच बारा एकरमध्ये ज्या सिमला मिरचीची लागवड केली आहे त्या मिरचीचे उत्पादन फेब्रुवारीपासून त्यांना मिळायला सुरुवात होईल व त्यापासून 25 लाख रुपयांचा नफा मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे.
12 एकर सिमला मिरचीच्या लागवडीसाठी त्यांना एकूण 15 लाख रुपये खर्च आलेला आहे. तसेच दीड लाख रुपये खर्च करून त्यांनी कोबीची लागवड केली होती व त्या माध्यमातून आठ लाख रुपयांचा नफा त्यांना झालेला आहे.
अशा पद्धतीने वेगवेगळ्या भाजीपाला पिकांची लागवड करून आणि उत्तम व्यवस्थापन ठेवून ते भरघोस उत्पादन मिळवतात व लाखोत नफा देखील मिळवत आहेत.