Success Story : शेतीमध्ये शेतकरी बांधवांना सातत्याने वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, शासनाचे उदासीन धोरण, शेतीमालाला मिळत असलेला कवडीमोल दर यांसारख्या संकटांचा सामना करत बळीराजा लढत आहे.
अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांना जाणकार लोक शेतीमध्ये देखील बदल करण्याचा सल्ला देत आहेत. त्यामध्ये शेतकरी बांधवांना बहुपीक पद्धतीचा अवलंब करण्याचा सल्ला दिला जातो. बहुपीक पद्धतीमुळे एखाद्या रोगामुळे एखाद्या पिकाचे नुकसान झाले तर त्या पिकाची नुकसान भरपाई दुसऱ्या पिकातून भरून काढता येणे शक्य होते.
तसेच जर बाजारात एखाद्या शेतमालाला कमी दर मिळाला तर दुसऱ्या शेतमालामधून उत्पन्नात निर्माण होत असलेली तूट भरून काढता येते. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट मध्ये देखील एका शेतकऱ्याने असंच काहीसं केला आहे. आसमानी संकटांचा तसेच सुलतानी जुलूमशाहीचा सामना करत मेळघाट मधील एका शेतकऱ्याने खंबीरपणे आयडियाची युक्ती शोधून काढली आहे.
या शेतकऱ्याने बहुपीक पद्धतीचा अवलंब करत शेतीतून लाखो रुपयांची कमाई करण्याची किमया साधली आहे. मेळघाट मोथा येथील गजानन शनिवारी नामक शेतकऱ्याने बहुपीक पद्धतीनुसार आपल्या एक हेक्टर शेत जमिनीत शेती सुरू केली आहे. या प्रयोगशील शेतकऱ्याने आपल्या एक हेक्टर शेत जमिनीत जवळपास दहा ते बारा प्रकारच्या पिकांची लागवड केली आहे. यातून या शेतकऱ्याला लाखो रुपयांची कमाई देखील होत आहे. एका मीडिया रिपोर्ट नुसार, एक हेक्टर शेतामध्ये गजानन शनवारे यांनी गहू, हरभरा, भुईमूग विविध प्रकारच्या पालेभाज्या, फुलगोबी, बटाटा आणि स्ट्रॉबेरी सारख्या 10 ते 12 पिकांची लागवड केली आहे.
म्हणजेच बहुपीक पद्धतीचा अवलंब केला आहे. यामध्ये गजानन यांनी आपल्या एक हेक्टर शेताचे पाच -पाच गुंठे असे भाग केले असून. प्रत्येक पाच गुंठ्यात वेगळे पीक या पद्धतीने लागवड करण्यात आली आहे. साहजिकच वेगवेगळ्या पिकांची लागवड करण्यात आली असल्याने त्यांना यातून मोठा फायदा होत आहे. गजानन यांनी सांगितल्याप्रमाणे, शेतीमध्ये सातत्याने दुष्काळ किंवा अतिवृष्टी किंवा गारपीट यांसारख्या संकटांचा सामना करावा लागतो.
तसेच या संकटांचा सामना करून उत्पादित केलेल्या शेतमालाला अनेकदा बाजारात कवडीमोल दर मिळतो. अशा परिस्थितीत या संकटावर मात करण्यासाठी त्यांनी एका पिकावर अवलंबून न राहता बहुपीक पद्धतीचा अवलंब केला आहे. यामुळे एका पिकाचे नुकसान झाले तर त्या पिकाच नुकसान दुसऱ्या पिकातून भरून निघते.
एका शेतमालाला कमी दर मिळाला तर दुसऱ्या शेतमालातून त्याची भरपाई होते. साहजिकच शेतीमधील ही बहुपीक पद्धती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असून गजानन यांनी या पीक पद्धतीचा अवलंब करत चांगली कमाई करून दाखवली आहे. गजानन यांचा हा प्रयोग निश्चितच इतरांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.