Successful Farmer: यशाला गवसणी घालायची असेल तर विपरीत परिस्थितीला सामोरे जाण्याची कला शिकावी लागते. विपरीत परिस्थितीत देखील न खचता जो आपला प्रवास सुरू ठेवतो तो आपल्या क्षेत्रात निश्चितच यशस्वी होतो. शेतीचे क्षेत्र देखील अनेक संकटांनी भरलेले आहे.
अनेक विपरीत परिस्थित्या शेती करताना शेतकरी बांधवांना अनुभवायला मिळतात. मात्र या विपरीत परिस्थितीत जो आपला प्रवास पुढे चालू ठेवतो तो शेतीत यशस्वी होतो. शेती व्यवसायात काळाच्या ओघात बदल करणे अतिशय महत्त्वाचे आहे. कृषी तज्ञ देखील शेतकरी बांधवांना (farmer) शेती (farming) व्यवसायात बदल करण्याचा सल्ला देत असतात.
कृषी तज्ञ शेतकरी बांधवांना आधुनिकतेचि कास धरत शेती करण्याचा सल्ला देत असतात. काळाच्या ओघात शेतीमध्ये बदल केला तर निश्चितचं लाखोंची कमाई (farmers income) होऊ शकते हे दाखवून दिले आहे वरकुटे खुर्द येथील एका नवयुवकाने. वरकुटे खुर्द येथील गणेश गोविंद शेंडे या तरुणाने शेती मध्ये बदल करत आपल्या मेहनतीच्या जोरावर 30 गुंठे क्षेत्रात तब्बल 12 लाखांची कमाई करून दाखवली आहे.
या युवकाने 30 गुंठे क्षेत्रात जुगाड करून शेडनेट ची निर्मिती केली आणि मिरचीची शेती करत तब्बल 30 टन मिरचीचे उत्पादन (chilli production) घेऊन दाखवले आहे. आधुनिक शेती म्हणजे फक्त आधुनिक तंत्राचा वापर नसून आपल्या बुद्धीमत्तेचा आधुनिक पद्धतीने वापर करणे ही देखील आधुनिकताचा आहे. या युवकाने अपुऱ्या साधनात व कमी पैशात जुगाड करून शेडनेटची निर्मिती करून आधुनिक पद्धतीने शेती तर केलीच शिवाय आपल्या बुद्धिमत्तेचा आधुनिक पद्धतीने वापर केला आहे.
गणेश वरकुटे खुर्द गावातील नागोबा वस्तीत राहतात ते उच्चशिक्षित आहेत मात्र शेती करतात. वडिलांच्या आजारपणामुळे गणेश यांच्यावर बारावी पासुनच शेतीची देखील जबाबदारी आली. शेती सांभाळत त्यांनी मुक्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन देखील पूर्ण केले. त्यांच्या वयाच्या 19व्या वर्षी वडिलांचे छत्र हरपले, यामुळे घराची सर्व जबाबदारी कोवळ्या वयात गणेश यांच्या खांद्यावर आली. आई आणि दोन बहिणी यांची जबाबदारी सांभाळत गणेश यांनी शेती देखील यशस्वीरीत्या केली आहे.
गणेश यांनी 2019 मध्ये बांबूच्या सहारे दोन गुंठे क्षेत्रात साध्या शेडनेटची उभारणी केली. शेडनेट उभारणी केल्यानंतर दोन गुंठे क्षेत्रात ढोबळी मिरचीची लागवड (chilli farming) केली यासाठी 20 हजार रुपये खर्च आणि ते 40 हजारांची कमाई गणेश यांना झाली. निश्चितच जुगाड पद्धतीने तयार करण्यात आलेल्या शेडनेटमध्ये ढोबळी मिरचीचे यशस्वी उत्पादन गणेश यांना मिळाले आणि त्यांचा प्रयोग यशस्वी झाला. त्यानंतर मात्र कोरोना आला म्हणून गणेश यांनी आपला प्रयोग एक वर्षे थांबवला.
त्यानंतर ऑक्टोबर 2021 मध्ये गणेश यांनी बांबू, तार व नेटच्या मदतीने साध्या शेडनेटची पुन्हा एकदा उभारणी केली. यावेळी त्यांनी 30 गुंठे क्षेत्रात साध्या शेडनेटची निर्मिती केली. या शेडनेटसाठी गणेश यांना सव्वादोन लाख रुपये खर्च आला. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात गणेश यांनी शेडनेट उभारले आणि त्यात ढोबळी मिरचीची लागवड केली. अवघ्या दीड महिन्यात गणेश यांना ढोबळी मिरचीतुन उत्पादन मिळण्यास सुरुवात झाले.
डिसेंबर महिन्यापासून आतापर्यंत गणेश यांना ढोबळी मिरचीतून उत्पादन मिळत आहे. आतापर्यंत सुमारे 30 टन ढोबळी मिरचीचे उत्पादन मिळाले असून त्यांना यातून तब्बल 12 लाखांची कमाई झाली आहे. त्यांनी उत्पादित केलेल्या ढोबळी मिरचीला 25 रुपये किलो ते 70 रुपये किलो या दरम्यान बाजार भाव मिळाला आहे. शेडनेटसाठी सव्वादोन लाख रुपये खर्च आणि मशागतीपासून ते काढणीपर्यंत ढोबळी मिरची पिकासाठी पावणे दोन लाख रुपये खर्च असा एकूण चार लाखांचा खर्च गणेश यांना आला.
म्हणजे गणेश यांना आठ लाखांचा निव्वळ नफा राहिला आहे. खरं पाहता गणेशकडे साडेतीन एकर शेत जमीन असून तो डाळिंब शेती करत आला आहे. मात्र मध्यंतरी तेल्या रोग आणि मर रोग यामुळे डाळिंबाच्या बागा क्षतीग्रस्त झाल्या यामुळे गणेश या भाजीपाला पिकांच्या प्रयोगाकडे वळला. आज गणेश यांचा प्रयोग यशस्वी झाला असून गणेश यांना लाखों रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. निश्चितच गणेश यांची यशोगाथा इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणा देणारी आहे.