शेती व्यवसाय म्हटले म्हणजे गेल्या काही वर्षापासून सातत्याने अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वारे यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे डबघाईला आलेला व्यवसाय असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या सगळ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसतो व शेतकरी हळूहळू कर्जाच्या खाईत लोटले जातात.
कारण पिकांसाठी केलेला खर्च निघत नसल्याने साहजिकच घेतलेले कर्ज फेडता येत नाही व शेतकरी पुरता कर्जाच्या गर्तेत अडकतो. अशीच काहीशी परिस्थिती छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील शिऊर तालुक्यात असलेल्या वैजापूर गावचे रहिवाशी असलेल्या अनिल बाळनाथ भोसले यांच्यावर आलेले होती.
परंतु अनिल रावांनी या परिस्थितीत हार न मानता या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी संघर्ष केला व दूध व्यवसाय सुरू करून आज कर्जातून मुक्ती तर मिळवलीच परंतु मुलांचे शिक्षण पूर्ण करून स्वतःचे घर देखील बांधले. या लेखात आपण अनिल भोसले यांची यशोगाथा बघणार आहोत.
अनिल भोसले यांनी दुध व्यवसायातून साधली प्रगती
याबाबत सविस्तर वृत्त असे की, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात असलेल्या शिऊर तालुक्यातील वैजापूर गावचे रहिवासी असलेले शेतकरी अनिल बाळनाथ भोसले हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्याकडे वडिलोपार्जित एक एकर दहा गुंठे शेत जमीन आहे.
या जमिनीमध्ये ते कपाशी तसेच ज्वारी व बाजरी तसेच मका इत्यादी पिके घेत. परंतु वैजापूर तालुका हा तसा पाहायला गेले तर दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो व या परिस्थितीमुळे वारंवार येणारी नापिकी अनिल यांना सहन करावी लागली. पिकांचे अत्यल्प उत्पादन आणि मिळणारा कमीत कमी पैसा यामुळे कर्जबाजारीपणा वाढीस लागला.
या परिस्थितीतून मार्ग निघावा म्हणून शेतीला काहीतरी जोडधंदा करावा हा विचार त्यांच्या मनामध्ये सुरू झाला. हा विचार सुरू असताना त्यांनी दुग्धव्यवसाय करायचे ठरवले व याकरिता त्यांनी त्यांच्या परिसरातूनच हॉलस्टीन फ्रिजियन म्हणजेच एचएफ जातीच्या गाईची खरेदी केली.
या एक गाईपासून व्यवसायाला सुरुवात करून या व्यवसायातील जे काही नवनवीन तंत्र आणि महत्त्वाच्या बाबी आहेत त्या अवगत करून हा व्यवसाय वाढवायचे ठरवले. त्याकरिता त्यांनी काही गायींची नवीन खरेदी केली.
अनिल यांच्या या दूध व्यवसायामध्ये चाऱ्याची व्यवस्था व्हावी म्हणून त्यांनी शेतीतून मिश्र पिकांचे उत्पादन घेतले व चाऱ्याची व्यवस्था केली व हळूहळू दूध व्यवसायामध्ये प्रगती करत गेले.आज त्यांच्याकडे उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या पाच गाई असून दोन कालवडी देखील आहेत.
व्यवसायात केला मुक्त संचार गोठ्याचा वापर
गाईंच्या चांगल्या आरोग्या करतात त्यांनी मुक्त संचार गोठा पद्धतीचा अवलंब केला. याकरिता त्यांनी आधुनिक पद्धतीचा चाळीस फूट बाय साठ फूट मुक्त संचारासाठी गोठ्याची उभारणी केली व 30 फूट बाय चोपन्न फूट आकाराचा बंदिस्त पद्धतीचा गोठा देखील उभारला.
जनावरांना चाऱ्याची कुट्टी उपलब्ध व्हावी म्हणून कुट्टी मशीन खरेदी केले व दूध काढण्यासाठी मिल्किंग मशीन व गाईना बसण्यासाठी मॅट, डासांपासून गाईंचा बचाव व्हावा याकरिता फॅन इत्यादी व्यवस्था त्यांनी केली. अशाप्रकारे गाईंचे व्यवस्थापन करून त्यांना अधिक अधिक दूध उत्पादन मिळवण्यामध्ये यश मिळाले.
असे केले चारा व्यवस्थापन
चारा नियोजन उत्तम पद्धतीने करता यावे याकरिता त्यांनी एक एकर जमिनीमध्ये मका पीक घेऊन त्यापासून मुरघास बनवायला सुरुवात केली. तसेच त्यांच्या परिसरामध्ये इतर मका लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांकरिता मका कापणी पासून ते काढणीपर्यंतचा खर्च देऊन त्या बदल्यात सुखा चारा म्हणून मक्याची कुट्टी करून ती चाऱ्यासाठी साठवून ठेवली जाते.
तसेच त्यांनी नेपियर गवताची लागवड केलेली असून या गवताच्या माध्यमातून गाईंसाठी आवश्यक असलेल्या हिरव्या चाऱ्याची उपलब्धता ते पूर्ण करतात.
कमी गाईंपासून मिळवतात अधिक दुधाचे उत्पादन
सुरुवातीला दहा-बारा गाई असून देखील गोठ्यातून केवळ 70 ते 80 लिटर दुधाचे उत्पादन त्यांना मिळत होते. परंतु आता उच्च दर्जाच्या गाई पालन केल्यामुळे त्यांना तेवढे दुधाचे उत्पादन फक्त पाच गाईंपासून मिळत आहे. त्यांच्या गोठ्यामध्ये दिवसाला 32 लिटर दूध देणाऱ्या गाई आहेत. ते म्हणतात की सध्या दुधाचे दर कमी आहेत.
परंतु तरी देखील मी नफ्यात आहे. कारण म्हणजे उच्च दूध क्षमतेच्या गाई असण्याचा हा फायदा आहे. आज त्यांनी या दूध व्यवसायातून दुचाकी तसेच शेतात सिंचनाकरिता विहीर, स्वतःचे आरसीसी घर दूध व्यवसायातून मिळणाऱ्या नफ्यावर उभारले आहे. एवढेच नाही तर या व्यवसायावर त्यांनी दोन मुलांचे शिक्षण देखील पूर्ण केलेले आहे.