Farmer Success Story:- सध्या बदलत्या हवामानामुळे आणि गेल्या कित्येक वर्षापासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला असून हातात आलेले उत्पन्न यामुळे नष्ट होत असल्याने शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसतो.
त्यामुळे अशा परिस्थितीचा सामना करत असताना शेतकऱ्यांनी आता बदलत्या हवामानाला अनुसरून पीक पद्धती अवलंबल्याचे आपल्याला दिसून येते. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आणि पारंपारिक पिकांना फाटा देत विविध फळ पिकांच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला असून सिताफळ तसेच पेरू सारख्या फळ पिकांची लागवड आता मोठ्या प्रमाणावर शेतकरी करू लागले आहेत.
एवढेच नाही तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील अशा फळ पिकांच्या लागवडीतील लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवण्यामध्ये शेतकरी यशस्वी झाल्याचे सध्या चित्र आहे.
अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण भंडारा जिल्ह्यातील देव्हाडी या गावचे शेतकरी अरुण मुरकुटे यांचा विचार केला तर यांनी दीड एकर क्षेत्रामध्ये पेरू लागवड करून त्या माध्यमातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवण्याची किमया साध्य केली आहे.
दीड एकर पेरू लागवडीतून मिळवले दहा लाखांचे उत्पन्न
याबाबत सविस्तर वृत्त असे की, भंडारा जिल्ह्यात असलेल्या देव्हाडी या गावचे प्रगतिशील शेतकरी म्हणून ओळखले जाणारे अरुण मुटकुरे हे इतर शेतकऱ्यांप्रमाणेच अगोदर पारंपारिक धान शेती करत असत.
या माध्यमातून त्यांना खर्च जास्त आणि उत्पादन कमी मिळत असल्याने बिकट आर्थिक परिस्थितीचा सामना त्यांना करावा लागत असे. या परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी त्यांनी खचून न जाता खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले
या प्रयत्नांचाच भाग म्हणून त्यांनी कृषी विभागाचा सल्ला घेत साधारणपणे 2019 पासून पारंपारिक पिकांना तिलांजली दिली व काहीतरी बागायती शेती करावी यापद्धतीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. मुरकुटे यांच्याकडे एकूण क्षेत्र तीन एकर असून त्यांनी दीड एकर क्षेत्रामध्ये पेरू लागवड करायची ठरवली व याकरिता त्यांनी पेरूच्या व्ही.एन.आर.वाणाची निवड केली.
या पेरूच्या वाणाची त्यांनी 700 झाडांची लागवड दीड एकर क्षेत्रामध्ये केली व याकरता जवळपास सर्व पाच लाख रुपयांचा खर्च त्यांना आला. परंतु पाच लाख खर्च करून त्यांनी दहा लाखांचे उत्पन्न मिळवले. म्हणजेच दीड एकरमध्ये त्यांना एकाच वर्षात पाच लाख रुपयांचा नफा झाला.
अशा पद्धतीने अरुण मुटकुरे यांनी परिस्थितीनुसार बदलत शेतीमध्ये देखील बदल केला व पेरू लागवडीतून आज लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवले व इतर शेतकऱ्यांसाठी देखील या माध्यमातून आदर्श निर्माण केलेला आहे.
त्यामुळे पारंपारिक पिकांची शेती न करता बाजारपेठेचा अभ्यास करून व मागणी लक्षात घेऊन जर शेती केली तर नक्कीच या माध्यमातून फायदा मिळतो हे आपल्याला अरुण मुटकुरे यांच्या उदाहरणावरून दिसून येते.