Marigold Farming:- शेडनेट सारखे आधुनिक तंत्रज्ञान आता शेतीसाठी खूप वरदान ठरताना दिसून येत असून शेडनेटच्या माध्यमातून अगदी कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील लाखो रुपयांचे आर्थिक उत्पन्न शेतकऱ्यांना मिळवता येणे शक्य झाले आहे.
अगदी 10 ते 30 गुंठेपर्यंतच्या शेडनेटमध्ये देखील तीन ते चार एकरमध्ये जितके उत्पादन मिळेल तितके उत्पादन मिळवता येणे आता शक्य आहे. शेडनेटमध्ये प्रामुख्याने शेतकरी भाजीपाला पिके आणि फुलपिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड करतात.
यामध्ये खास करून फुलपिकांचा विचार केला तर जरबेरा तसेच कारनेशन, अस्टर सारख्या विविध फुल पिकांची लागवड शेतकरी करतात. अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात असलेल्या ममदापूर या ठिकाणच्या भाऊसाहेब निकम या शेतकऱ्याचा विचार केला तर त्यांनी तीस गुंठे जागेवर शेडनेट उभारून ठिबक सिंचनाची सोय करून झेंडूच्या फुलांची चार हजार रोपांची लागवड केलेली आहे.
या लागवडीतून त्यांना तीन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे. चला तर मग आपण या लेखामध्ये भाऊसाहेब निकम यांनी शेडनेटमध्ये झेंडू शेतीचे नियोजन कसे केले आहे याबद्दल माहिती घेऊ.
शेडनेटमध्ये झेंडू शेती
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात असलेल्या ममदापूर येथील भाऊसाहेब निकम या अल्पभूधारक शेतकऱ्याने शेडनेटचा अवलंब करत 30 गुंठे जागेवर ठिबक सिंचनाची सोय करत झेंडूच्या चार हजार रोपाची लागवड केलेली असून त्याचे उत्पादन आता निघायला सुरुवात झालेली आहे.
आतापर्यंत साधारणपणे 40 क्विंटलच्या आसपास त्यांना उत्पादन मिळाले असून सध्या 40 ते 50 रुपये प्रति किलोचा दर त्यांना मिळाला आहे. विशेष म्हणजे त्यांनी शेडनेटच्या साह्याने उत्पादन घेतल्यामुळे दर्जेदार फुलांचे उत्पादन त्यांना मिळाल्या मुळे भाव देखील चांगला मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यांनी लागवड करण्यासाठी 1692 या पिवळ्या रंगाच्या झेंडूच्या वाणाची लागवड करण्याचे निश्चित केले व एक ऑगस्ट रोजी पाच फुटाचे बेड पाडून त्यावर झेंडूच्या रोपांची लागवड केली. साधारणपणे लागवड केल्यानंतर 40 ते 45 दिवसांनी त्यांना फुलांचे उत्पादन मिळायला सुरुवात झाली.
फुलांची काढणीचे त्यांचे नियोजन पाहिले तर दिवसा ते फुलांची तोडणी करतात व पहाटे चार वाजता फुलांच्या विक्री करण्यासाठी ते छत्रपती संभाजी नगर शहरातील गुलमंडी या ठिकाणी नेतात. आतापर्यंत त्यांच्या फुलांच्या तीन तोडण्या झालेल्या असून 37 क्विंटल उत्पादन त्यांना मिळाले आहे. 40 ते 50 रुपये किलोचा दर त्यांना मिळाला असून अजूनही पाच ते सहा महिने उत्पादन मिळेल अशी अपेक्षा त्यांना असून या 30 गुंठा क्षेत्रात त्यांना झेंडूचे 75 ते 80 क्विंटल उत्पादन मिळणे अपेक्षित आहे.
शेडनेटमुळे दर्जेदार झेंडूचे उत्पादन मिळाले
शेडनेटमध्ये त्यांनी झेंडूचे उत्पादन घेतल्यामुळे बाहेरील वातावरणाचा आतील पिकावर कुठल्याही प्रकारचा विपरीत परिणाम झाला नसल्यामुळे दर्जेदार फुलांचे उत्पादन त्यांना मिळण्यास मदत झाली. तसेच फवारणीचा खर्च देखील कमी लागला व रोपेदेखील शेडनेटमध्ये रोगाला कमी प्रमाणात बळी पडली.
या सगळ्यांमुळे फुलांचे गुणवत्ता अधिक दर्जेदार मिळाली.त्यांना या झेंडू शेतीसाठी गुंठ्याला 1000 म्हणजेच 30 गुंठ्याला तीस हजार रुपये इतका खर्च आला आहे व यामध्ये खत बियाण्याचा खर्च महत्त्वाचा आहे. आता जो काही झेंडूच्या फुलांना 40 ते 50 रुपये प्रति किलोचा दर मिळाला आहे इतका जरी दर मिळाला तरी त्यांना 70 ते 75 क्विंटल उत्पन्नाची अपेक्षा असल्यामुळे खर्च वजा जाता पाच महिन्यात तीन लाख रुपयांचा नफा मिळेल अशी अपेक्षा त्यांना आहे.
अशा पद्धतीने जर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करण्याचे ठरवले तर कमीत कमी क्षेत्रामध्ये चांगले उत्पादन मिळत आहे ते हे सिद्ध होते.