Cotton Crop Management:- जेव्हा आपण कुठल्याही प्रकारच्या पिकांची लागवड करतो तेव्हा तुम्ही जर लागवड पद्धतीमध्ये आधुनिक लागवड पद्धतींचा वापर केला व व्यवस्थापनाच्या देखील आधुनिक पद्धती वापरल्या तर नक्कीच कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील तुम्ही भरगोस असे उत्पादन मिळवू शकतात हे आता अनेक शेतकऱ्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.
तसेच अनेक शेतकरी हे वेगवेगळे प्रयोग करत असतात व हे प्रयोग पीक लागवडीच्या बाबतीत तसेच लागवडीच्या पद्धती अशा वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्याला दिसून येतात.अशा प्रयोगाच्या माध्यमातून देखील अनेक फायदेशीर गोष्टी शेतकऱ्यांच्या हाती लागतात व त्याचा नक्कीच फायदा हा शेती पिकांच्या भरघोस उत्पादनासाठी होतो.
अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण बदनापूर तालुक्यातील बाजार वाहेगाव येथील प्रयोगशील तरुण शेतकरी जयराम लाखे यांचे उदाहरण घेतले तर यांनी वेगळा असा पॅटर्न कपाशी पिकासाठी राबवला व एकरी तीन पट कापसाचे उत्पादन वाढवले.
या युवा शेतकऱ्याने कपाशीच्या उत्पादनात केली तीन पट वाढ
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जालना जिल्ह्यातील बदनापूर हा परिसर जर बघितला तर प्रामुख्याने कोरडवाहू म्हणून ओळखला जातो व या ठिकाणी पाण्याची टंचाई दिसून येते.
परंतु या तालुक्यातील बाजार वाहेगाव येथील जयराम लाखे हा तरुण शेतकरी मात्र हलकी जमीन तसेच कमी पाऊस व एकंदरीत मराठवाड्यातील जे काही वातावरण आहे या सगळ्या गोष्टींना तोंड देत एकरी केवळ चार ते पाच क्विंटल उत्पादन मिळवण्यामध्ये यशस्वी होत होता.
परंतु खर्चाच्या मानाने मिळालेले हे उत्पादन शुल्लक होते व त्यामुळे उत्पादन खर्च देखील निघत न होता. काहीतरी वेगळे करावे या दृष्टिकोनातून मागच्या दोन वर्षापासून जयराम यांनी दादा लाड तंत्रज्ञानाचा अवलंब कपाशी पिकामध्ये केला.
या सगळ्या पॅटर्नमध्ये जर बघितले तर चार फुटाची सरी पाडली जाते व एका सरीवर सव्वा फुटावर दोन ओळींमध्ये कापसाची लागवड केली व यामध्ये टाकलेल्या सरीमुळे पावसाळ्यामध्ये शेतीत साठणारे जे काही पाणी असते व त्यामुळे होणारे नुकसान देखील टाळण्यास मदत होते. त्यानंतर एक निंदणी करून तण नियंत्रण केले व या एक खुरपणीनंतर मात्र तणनाशकाच्या फवारणी करून तण नियंत्रण केले.
काय आहे नेमके दादा लाड तंत्रज्ञान?
या तंत्रज्ञानामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब जर बघितली तर ती म्हणजे कापूस लागवडीनंतर 40 ते 45 दिवस झाले की कापसाची गळ फांदी काढली जाते व लागवडीनंतर 70 ते 75 दिवसानंतर शेंडा कापला जातो. त्यामुळे एका बोंडाचे वजन चार ते पाच ग्रॅम वरून सहा ते सात ग्रॅम पर्यंत भरते.
त्यामुळे डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत एकरी अकरा क्विंटल 50 किलो कापसाचे उत्पादन या शेतकऱ्याला मिळाले व या पद्धतीचा अवलंब केल्यामुळे त्यांच्या कापूस उत्पादनात तब्बल तीन पट इतकी वाढ झाली.
तसेच जयराम यांनी शेतीमध्ये कमीत कमी मशागत करून कपाशीची लागवड केली आहे व या सोबतच कपाशीवर रोटर मारून काडीकचरा जमिनीतच कुजविण्यात येणार आहे.
यामुळे खत आणि मशागतीचा खर्च वाचणार आहे व त्यासोबतच पुढच्या वर्षी याच सरीवर कापसाची याच अंतरावर लागवड करणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.