Wheat Farming : सध्या रब्बी हंगाम सुरू आहे. राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांनी गव्हाची पेरणी केली आहे. खरं पाहता यावर्षी गव्हाला चांगला विक्रमी दर मिळणार असल्याचा दावा जाणकार लोकांकडून केला जात आहे. त्यामुळे साहजिकच गहू उत्पादक शेतकऱ्यांना यंदा चांगली कमाई करण्याची संधी चालून आली आहे.
मात्र असे असले तरी गहू पिकाचे व्यवस्थापन करताना शेतकरी बांधवांना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे जेणेकरून त्यांना या पिकातून चांगले उत्पादन मिळू शकेल. खरं पाहता गव्हाच्या पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी किड नियंत्रण अति महत्त्वाचे ठरते.
गहू पीक ओंबी लागण्याच्या तसेच ओंबी भरण्याच्या अवस्थेत असताना पिकावर मावा कीटकाचा प्रादुर्भाव होतो. या कीटकामुळे गव्हाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होऊ शकते. जाणकार लोकांच्या मते या कीटकामुळे 40% पर्यंतचे नुकसान होऊ शकते. यामुळे या कीटकावर वेळेत नियंत्रण मिळवणे अति महत्त्वाचे ठरते. यामुळे आज आपण या कीटकावर शेतकरी बांधव कशा पद्धतीने नियंत्रण मिळवू शकतात याविषयी जाणून घेणार आहोत.
या कीटकाचा प्रादुर्भाव झाल्यास पाने पिवळसर होतात परिणामी प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते आणि पीक मरू लागत.
हे कीटक प्रामुख्याने जमिनीला घेत असलेल्या खोडावर तसेच मुळावर आपली उपजीविका भागवतात.
मावा कीटकावर खालील पद्धतीने करा नियंत्रण
सर्वप्रथम कीटकांचा गव्हाच्या पिकात किती प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे हे तपासण्यासाठी चिकटसापळे शेतात बसवा.
या कीटकांचा प्रादुर्भाव पिकात झाला आहे की नाही हे कीटकाच्या पतंगावरून समजते. चिकट सापळ्यावर जर या कीटकाचे पतंग आढळून आलेत तर यावर नियंत्रणासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत.
व्हर्टिसिलियम लेकॅनी किंवा मेटारायझियम ॲनासोपली 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. फवारणी 10 ते 15 दिवसांच्या अंतराने दोन वेळा केल्यास या कीटकावर नियंत्रण मिळवले जाऊ शकते असा दावा केला जातो. यामुळे पुन्हा मावा कीटकाचा प्रादुर्भाव पिकावर होत नाही.
तसेच शेतकरी बांधव थायमिथोक्साम ( 25%) एक ग्रॅम किंवा अॅसेटॅम्परीड पाच ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करू शकतात.
गहू पिकाच्या मुळावरील मावा किडीच्या नियंत्रणासाठी दाणेदार फोरेट(10 जी) 10 ते 12 किलो प्रति हेक्टर याप्रमाणे शेणखतात मिसळून पिकांमध्ये जमिनीवर फोकून टाकू शकतात. हे दिल्यानंतर लगेच गव्हाला पाणी देणे आवश्यक असते.
शेतकरी मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की कोणत्याही पिकावर कोणत्याही औषधाची फवारणी करण्याअगोदर तज्ञ लोकांचा तसेच कृषी सेवा केंद्र चालकांचा सल्ला घेणे तुमच्यासाठी अपरिहार्य राहणार आहे.