Snake Interesting Fact :- जीभ हा एक महत्त्वपूर्ण अवयव असून तो मानवासह इतर प्रत्येक प्राण्यांमध्ये आहे. मानवामध्ये विचार केला तर अन्नपदार्थांची चव ओळखण्यासाठी जिभेचा वापर खूप महत्वपूर्ण आहे.
तसेच बोलण्यासाठी देखील मानवामध्ये जिभेचा खूप मोठी भूमिका आहे. अगदी याच पद्धतीने अनेक प्राण्यांना देखील जीभ असते. परंतु यामध्ये सर्वात आश्चर्यकारक दिसणारी जीभ ही सापांची असते. कारण ती चक्क दोन भागांमध्ये विभागलेली असते.
सापांची जीभ दोन भागांमध्ये का विभागलेली असते याबद्दल अनेक शतकांपासून शास्त्रज्ञ आणि जीवशास्त्रज्ञांसाठी हा एक मोठा प्रश्न असून त्याचे उत्तर शोधणे आव्हानात्मक काम राहिले आहे. याबाबत अनेक मतमतांतरे असून माणसांच्या कानातल्या दोन छीद्राशी त्याचा काही संबंध आहे का?
किंवा काहींचा असा देखील समज आहे की सापांना खाण्यापिण्यामध्ये जास्त चव असल्यामुळे त्यांची जीभ दोन भागात विभागलेली असू शकते. परंतु जर आपण सत्य पाहिले तर ते खूपच वेगळे आहेत. नेमकी सापांची जीभ दोन भागांमध्ये का विभागलेली असते याबद्दलची महत्वपूर्ण माहिती आपण या लेखात घेऊ.
सापाची जीभ दोन भागात का विभागलेली असते?
त्याबद्दल कनेक्टीकट विद्यापीठातील इकोलॉजी आणि इव्होल्युशनरी बायोलॉजी चे प्रोफेसर कर्ट असे म्हणतात की सापाच्या जिभेचे दोन भागांमध्ये विभाजन सुमारे 180 दशलक्ष वर्षांपूर्वी म्हणजेच एकंदरीत डायनासोरच्या कालावधीपासून होते.
त्या कालावधीमध्ये मोठ्या प्राण्यांच्या पायाखाली येऊ नये म्हणून साप खड्ड्यांमध्ये किंवा मातीच्या छिद्रामध्ये लपून बसायचे. सापाच्या शरीराचा विचार केला तर ते लांब आणि पातळ असते. तसेच त्यांना पाय देखील नसतात आणि प्रकाशा शिवाय त्यांची दृष्टी देखील अस्पष्ट होते. अशा परिस्थितीमध्ये त्यांची जीभ त्यांच्यासाठी संरक्षक कवच आणि नाक म्हणून काम करते.
जेव्हा साप जीभ बाहेर काढतो तेव्हा त्या जिभेचा वापर तो वास घेण्यासाठी करतो आणि त्यासाठीच तो तिला हवेत फिरवतो. जीभ या अवयवाचा विचार केला तर त्याला होमेरोनासल ऑर्गन असे देखील म्हणतात. जो 1900 नंतर शोधला गेला.हा अवयव जमीनवर रेंगाळणाऱ्या प्राण्यांमध्ये आढळतो.
सापामध्ये देखील हा अवयव सापाच्या अनुनासिक कक्षेच्या खाली असतो. त्यामुळे साप जेव्हा बाहेर हवेमध्ये जीभ फिरवतो तेव्हा बाहेरील वासांचे कण त्याच्या जिभेला चिकटतात. त्यामुळे त्याला पुढे काय धोका आहे किंवा काय होऊ शकते याची जाणीव होते.
जिभेवर होमेरोनासल अवयातून बाहेर पडणारे कण असतात व त्यामुळे गंध म्हणजेच वास ओळखण्याची क्षमता त्यामध्ये असते. वास आल्यानंतर जेव्हा हे कण सापाच्या तोंडामध्ये जातात तेव्हा सापाच्या मनात संदेश पोहोचतो की पुढे धोका आहे किंवा काही प्राणी खाण्यासारखे आहेत.
जेव्हा साप आपली जीभ हवेमध्ये फिरवतो तेव्हा तो त्याची दोनही टोके दूरवर हलवतो. यामुळे सापाला मोठ्या परिसरातून त्याच्या दिशेने येणारा वास ओळखता येणे शक्य होते.
दोन वेगवेगळ्या प्रकारचे वास ओळखण्यास करते मदत
सापाची जीभ ही दोन भागांमध्ये विभागलेली असते. ती दोन भागांमध्ये विभागलेली जीभ ही दोन कानांप्रमाणेच काम करते. म्हणजेच या दोन भागांच्या माध्यमातून दोन वेगवेगळे प्रकारचे वास देखील जाणता येऊ शकतात.
जसे कानांच्या माध्यमातून वेगवेगळ्या दिशांनी येणाऱ्या आवाज आपण समजून घेऊ शकतो आणि त्यांची दिशा देखील शोधू शकतो. अगदी त्याच पद्धतीने जिभेच्या दोन्ही भागांच्या मदतीने सापाला कोणत्या दिशेला अन्न आहे आणि कोणत्या दिशेला धोका आहे किंवा कोणत्या दिशेला जावे हे समजते.
बऱ्याचदा आपण पाहिले असेल की जेव्हा साप जीभ हवेत फिरवतो तेव्हा जिभेचा एक भाग वर व एक भाग खाली जातो. अशावेळी साप मोठ्या परिसरामधील वास घेण्याचा प्रयत्न करतो व असं केल्यामुळे सापाची जीभ हवेत पंखासारखा आकार बनवते.
वेगवेगळ्या प्रकारचे वास गोळा करण्यासाठी जिभेचे दोन्ही भाग त्याला मदत करतात. पुढे त्याला कोणत्या दिशेला फायदा होईल किंवा कुठे धोका आहे याची जाणीव पटकन होते. त्यामुळे सापाची जीभ हा त्याचा जगण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा भाग आहे.