महाराष्ट्रातील कोविड-19 ची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे तसेच अहमदनगर जिल्ह्यातील व शहरातील कोविड-19 ची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील. व शहरात दररोज नवीन नवीन तीस चाळीस रुग्ण सापडतात. त्यामुळे सध्याची कोविड-19 ची परिस्थिती भयानक निर्माण झाली आहे. अहमदनगर जिल्ह्याचे चारही बाजूचे असलेले पुणे,नाशिक,बीड आणि सोलापूर या जिल्ह्यातील मा .आयुक्त साहेब यांनी कोविड-19 ची वाढती संख्या पहाता पुन्हा एकदा एकदा पुर्ण पणे लाॅकडाऊन व संचारबंदी जाहीर केला आहे.
गेल्या मार्च महिन्यापासून जिल्ह्यातील व शहरातील कोविड-19 चा प्रादुर्भाव पुर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन आणि महापालिका प्रशासन विविध उपाययोजना करतच आहेत. परंतु केवळ काही बेजबाबदार लोकांच्या बेफिकरपणे वागणे आणि शासकीय नियमाचे काटेकोर पालन न केल्यानेच अहमदनगर जिल्ह्यातील व शहरातील कोविड-19 चा प्रसार झालेला आहे हे सुद्धा नाकारता येणार नाही. आता जर जनतेला वाचवायचे असेल तर जिल्ह्यात पुन्हा एकदा पुर्ण पणे लाॅकडाऊन करणेच योग्य आहे असे वाटते आहे.
अनलाॅकडाऊन भाग 2 मध्ये जास्त प्रमाणात शिथिलता आणली आहे. त्यामुळे अनेक उद्योग व्यवसायासह हाॅटेल आणि लाॅज , दारू दुकाने, तसेच छोटे छोटे व्यवसाय सुरू केले आहेत. परंतु जनतेकडून शासकीय सूचना चे काटेकोर पालन झाले नाहीत. लोकांना जरा जास्तच मोकळीक मिळाली म्हणून लोकांनी शासकीय नियमांची अक्षरशः पायमल्ली केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील संगमनेर, पाथर्डी, जामखेड, नेवासा आणि इतर तालुक्यातील रूग्णाची संख्या वाढत आहे. तसेच शहरात सुद्धा दररोज कोरोना बाधीत रूग्ण सापडले आहेत.
आता प्रशासनाने कठोर भूमिका घेण्याची गरज आहे. पुणे आणि औरंगाबाद च्या धर्तीवर अत्यावश्यक सेवा वगळून अहमदनगर शहरात पुर्ण पणे लाॅकडाऊन करणेच योग्य आहे असे वाटते. तरच काही प्रमाणात कोविड-19 ची साखळी खंडीत होऊन कोरोना आटोक्यात येईल असे वाटते आहे. वास्तविक पहाता लाॅकडाऊन व संचारबंदी च्या काळात गोरगरीब लोकांना उपासमारीच्या संकटांना सामोरे जावे लागु नये, त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा तसेच विस्कळीत झालेली अर्थिक व्यवस्था सुधारण्या साठी मदत होईल म्हणून सरकार आणि जिल्हा प्रशासन यांनी अहमदनगर जिल्ह्यातील व शहरातील लाॅकडाऊन व संचारबंदी शिथील केली.
आजही अहमदनगर शहरात परवानगी नसताना व शासकीय नियमाचे उल्लंघन करून वसंत टाकीज माळीवाडा, अमरधाम च्या पाठीमागे, सारसनगर रोड याभागात अक्षरशः गटारीवर भाजीपाला बाजार भरतोच. याभागातील लोकांनी यापूर्वी अनेक तक्रारी केल्या आहेत पण महापालिका प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. वास्तविक या भागात बेकायदेशीर भाजीपाला बाजार भरतोच कसा हाच अनुत्तरीत प्रश्न निर्माण झाला आहे. अगोदरच साथीचे रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यात पुन्हा अशा ठिकाणी भरणारा भाजीपाला बाजार यामुळे अनेक लोकांचे आरोग्याचे बाबतीत प्रश्न निर्माण झाला आहे.
भाजी विक्रेत्यांकडे मास्क, हॅन्डवाॅश सॅनिटायझर नसतात तर सोशल डिस्टन्स ठेवला जात नाही.यापूर्वी हा सगळा भाग कंटेनमेंट झोन व बफर झोन म्हणून जाहीर केला होता. त्यामुळे त्या भागातील नागरिकांचे जिवितास धोका निर्माण झाला आहे. कालच सारसनगर भागातील एका महिलेचा कोविड-19 ने मृत्यू झाला आहे. तसेच कापडबाजार व गंजबाजार येथील तरूणांना कोविड-19 मुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. सध्या कोविड-19 ने डाॅक्टर आणि नर्स यांना सुद्धा बाधीत केले आहे. अजूनही कोविड-19 वर योग्य लस उपलब्ध झालेली नाही. अशा परिस्थितीत दररोज नवीन नवीन कोरोना बाधीत सापडणे हे खरोखरच धोकादायक ठरू शकते.
आता पर्यंत प्रशासनाने सुद्धा नागरिकांना खुप मोकळीक दिली आहे. परंतु अनेक बेरोजगार लोकांनी त्याचा गैरफायदा घेतला आहे. अर्थात लाॅकडाऊन व संचारबंदी च्या काळात सुद्धा बेजबाबदार लोकांचे बेकायदेशीर व्यवसाय सुरूच होते आणि यापुढेही ते निश्चितच सुरू राहतील यात शंकाच नाही. कारण जो पर्यंत अशा बेजबाबदार धनदाडंगे लोकांना राजकीय व शासकीय वरदान आहे तो पर्यंत हे असेच चालू राहणार आहे. आणि त्यांचे या गैरकृत्याला बळी पडतील ते गोरगरीब आणि सर्व सामान्य मध्यमवर्गीय लोक. जो पर्यंत अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा वगळून शहरात येणारे इतर दुचाकी व चारचाकी वाहने रस्त्यावर आणण्याची बंद होणार नाहीत तो पर्यन्त गर्दी वाढतच जाणार आहे.
व्यवसाय सुरू राहिले तरच लोकांना अर्थिक समस्या निर्माण होणार नाहीत हे जरी खरे असले तरी कुठेतरी शासकीय सूचनाचे सुद्धा पालन केले पाहिजे हे पण सत्य आहे. मा जिल्हाधिकारी साहेब आता आपणच शहरातील कोविड-19 चा प्रादुर्भाव पुर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी पोलिस प्रशासन, महापालिका प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी, डाॅक्टर, समाजसेवक, पत्रकार मंडळी आणि विविध सामाजिक कार्यकर्ते आणि संस्था यांचे सोबत त्वरित एक बैठक आयोजित करून शहरात पुर्ण पणे लाॅकडाऊन करण्या बाबतीत निर्णय घ्यावा हिच विनंती आहे.
आता दुसरी बाजू अशी आहे की, लाॅकडाऊन आणि जमावबंदीचे आदेश दिले तर काही संघटना विरोध करातील सुद्धा. कारण त्यांना फक्त प्रसिद्धी पाहिजे व राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे हे अहमदनगर च्या जनतेला चांगलेच माहित आहे. खरं तर ही वेळ जनतेला वाचविण्याची आहे फक्त राजकारण करण्याची नाही याची जाणीव असू द्या हिच अपेक्षा. आता किरकोळ सर्दी खोकला आला तरी फक्त काहीच डाॅक्टर मंडळी डायरेक्ट कोविड-19 ची चाचणी करण्याचा सल्ला रूग्णांना देतात. कोविड-19 च्या चाचणी साठी सरकारने ठरवून दिलेल्या पैशा पेक्षा जास्त पैसे उकळण्याचा प्रकार सुद्धा सुरू आहेत अशा स्वरूपाच्या बातम्या देखील वर्तमानपत्रात आल्या आहेत. या बाबतीत पण प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे असे वाटते.
कोविड-19 ची तपासणी करण्यासाठी गेलेली व्यक्ती अगोदरच घाबरवून गेलेली असते. त्यामुळे खाजगी डाॅक्टर सागंतील तेवढे पैसे दिले जातात. त्यामुळे सरकारने सरकारी दवाखान्यात व्हेंटीलेटर, औषध, व्हॅक्सीन औषध, बेड इ. सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या तर गोरगरीब जनतेला निश्चितच त्याचा फायदा होईल आणि अर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही. अर्थात समाजसेवेचा वसा घेतलेल्या अहमदनगर मधील काही आदरणीय डाॅक्टर मंडळी यांनी प्रामाणिक पणे काम केले आहे आणि जिल्हा प्रशासनाला पुर्ण पणे मदतीचा हात दिला आहे हे सुद्धा नाकारता येणार. त्याचाच एक भाग म्हणून जुने दिपक हाॅस्पिटल झोपडी कॅन्टीन व औरंगाबाद रोडवर एम्स हाॅस्पिटल येथे कोविड-19 चे खाजगी हाॅस्पिटल सुरू झाले आहेत.
त्यामुळे त्यां सर्व आदरणीय डाॅक्टर मंडळीचे आभारच मानले पाहिजेत. सर्व सामान्य लोकांना डाॅक्टर मध्येच देव दिसतो हेच खरे आहे. नागरिक हो अजुन ही भय संपले नाही याची जाणीव असू द्या हिच अपेक्षा. घराबाहेर पडताना शासकीय सूचनांचे काटेकोर पालन करावे तसेच कोविड-19 बाबतीत थोडे जरी लक्षणे दिसू लागली की त्वरित डाॅक्टरनां दाखवा आणि तपासणी करून घेतली पाहिजे. विनाकारण घराबाहेर पडू नये. प्रशासनाने लाॅकडाऊन व संचारबंदी लागू करताना नागरिकांना पण विनाकारण त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी हि विनंती आहे.
काही दुर्दैवी घटना सांगुन किंवा पुर्व कल्पना देऊन घडत नसतात. अशा वेळी किचकट अटी व शर्ती घालणे अयोग्य आहे. मागे पोलिस प्रशासन यांनी जवळचे नातेवाईक यांचे निधन झाले तर मृत्यूचा दाखला दिला तरच जाण्यासाठी पास दिला जाईल असे जाहीर केले होते. वास्तविक महापालिकेत सुद्धा मृत्यू दाखला मिळण्यासाठी एकवीस दिवस लागतात, अशा वेळी ग्रामीण भागात रात्री अपरात्री मृत्यू दाखला कसाकाय मिळेल याची जाणीव पोलिस प्रशासन यांनी ठेवली पाहिजे.
या किचकट अटी मुळे अनेक लोकांना जवळच्या व घरातील व्यक्तीच्या अंतयात्रेत सहभागी होता आले नाही.त्यामुळे जे सहज शक्य आहे त्या अटी शर्ती घालणे योग्य आहे असे वाटते आहे. एक मात्र निश्चितच आहे की,अचानक घडलेल्या घटनेची सत्यता पडताळून पाहूनच रात्री अपरात्री येण्याची व जाण्यासाठी परवानगी द्यावी लागेल. मा जिल्हाधिकारी साहेब आपणास नम्र विनंती आहे की, अहमदनगर जिल्ह्यातील व शहरातील जनता सुरक्षित रहावी म्हणून पुर्णतः लाॅकडाऊन व संचारबंदी लागू करावी हिच नम्र विनंती.
ॲड शिवाजी अण्णा कराळे
सदस्य जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर
99 22 545 545