नमस्कार मित्रांनो,
सध्या देशात करोना नावाचा व्हायरस संपूर्ण देशभर थैमान घालतोय. कोरोना प्रदुर्भाव टाळण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत आणि त्यामुळेच कोरोना आटोक्यात येत आहे. सरकारने 31जुलै 2020 पर्यंत लाॅकडाऊन जाहीर केला आहे. असे असले तरी जनतेच्या अडचणी सुटाव्यात म्हणून छोटे छोटे व्यवसाय सुरू केले आहेत. परंतु गेले दोन महिन्यांपासून लोकांना काहीही कामधंदा नसल्याने अर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. ती अर्थिक घडी पुर्ववत होण्यासाठी अजुन किती काळ लागेल हे अनिश्चित आहे. तसेच आतापर्यंत सर्व शाळा आणि काॅलेज बंद आहेत.
परंतु सध्या ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी विविध शाळा आणि काॅलेज आणि खासगी क्लास चालक तयार झाले आहेत. परंतु फक्त लाॅकडाऊन आहे तोपर्यंत ऑनलाईन क्लास आहेत की वर्षभर शाळा ऑनलाईनच शिक्षण देणार हे गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे कदाचित शाळा आणि काॅलेज लवकरच सुरू होणार असे दिसते. वास्तविक कोरोना चा प्रदुर्भाव टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण पध्दती चांगली असली तरी ती सर्व सामान्य लोकांना परवडणारे नाही हे सत्य सुद्धा नाकारता येणार नाही.
आता लवकर शाळेची घंटा वाजली जाणार की नाही हे पहाणे अवचित्याचे आहे.शहरातील काही खासगी शाळांनी फीस भरण्यासाठी पालकांना सक्ती केली आहे. त्या बाबतीत अनेकदा तक्रार झाली आहे. आता ऑनलाईन शिक्षण घेणे कितपत योग्य आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी ॲन्ड्राॅईड मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून एका विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याची बातमी काल परवा एका वर्तमानपत्रात वाचली. मन थोडं सुन्न झालं. विद्यार्थी आपल्या पालकांची परिस्थिती का समजून घेत नाहीत हेच समजत नाही.
ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाला फार मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला आहे. आजकाल विद्यार्थी किरकोळ कारणावरून आत्महत्या करतात. कधी कुणी परीक्षेत नापास झाला तर आत्महत्या करतो तर कुणाला कमी मार्क मिळाले आत्महत्या करतो.परंतु आत्महत्या केल्याने सर्व प्रश्नांची सोडवणूक होतेच असे नाही. खरोखरच आत्महत्या करणे ही खुपच भयानक गोष्ट आहे तशीच विचार करायला लावणारा प्रश्न सुध्दा आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ आपले पालक आपली मागणी पुर्ण करीत नाहीत म्हणून आत्महत्या करणं चुकीचं आहे. ऑनलाईन शिक्षण घेणे खरंच किती विद्यार्थ्यांना आणि पालकांना शक्य होईल? जे कुटुंब सधन आहेत किंवा शासकीय नोकरीत आहेत किंवा व्यावसायिक आहेत असे लोक आपल्या मुलांना ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल फोन घेऊन देऊ शकतात. परंतु ज्या कुटुंबाची एका वेळेच्या जेवणाची सोय होत नाही असेही काही कुटुंब आहेत. काही गोरगरीब कुटुंबाना डोक्यावर छप्पर नाही, काही कुटुंब झोपडपट्टीत कसेतरी आपले जीवन जगतात. तिथे लाईट नसते, पिण्याचे पाणी नसते तर ड्रेनेज आणि प्रसाधनगृह नसतात. लोकांचे घरचे धुणीभांडी व मोलमजुरी करून आपले जीवन जगणारे सुद्धा काही कुटुंब आहेत.
तरी सुद्धा पोटाला चिमटा घेऊन अशाही परिस्थितीत ते आपल्या मुलांना कसे तरी शाळा शिकवतातच. परंतु ज्यांचे हातावर पोट आहेत अशा काही लोकांना दररोज रोजगार उपलब्ध होतोच असे नाही, अशा परिस्थितीत मुलांना ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल फोन घेणे कसे शक्य आहे? कोणत्याही कंपनीचा अगदी हलका ॲन्ड्राॅईड मोबाईल घेतला तरी कमीत कमी आठ ते दहा हजार रुपये लागतात. ज्यांची परिवाराची परिस्थिती अत्यंत बिकट आहे त्यांनी हा मोबाईल कसा घ्यायचा. बर एका कुटुंबात कमीत कमी दोन मुलं शिक्षण घेत असतातच. त्यामुळे ते वेगवेगळ्या वर्गात शिक्षण घेत असतात.
अशा वेळी दोन दोन मोबाईल घेणे व त्याला नेट बॅलन्स देणे या परिवाराला कसे शक्य होईल. तेवढ्या पैशात त्या गरीब कुटूंबाचे चार सहा महिने राशन होते. जर विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण साठी मोबाईल मिळाले नाही तर अजुन किती विद्यार्थ्यांना आपले जीव गमवावा लागेल हे निश्चित सांगता येत नाही. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण पध्दती बाबत सरकारने काही तरी योग्य धोरण आखणी करण्याची शाळांना सूचना करणे आवश्यक आहे.शक्य असल्यास सर्व गोरगरीब विद्यार्थ्यांना शाळेने मोबाईल देणे शाळेवर बंधनकारक करणे आवश्यक आहे. नाहीतर गोरगरीब लोकांची मुलंमुली शिक्षण घेऊच शकत नाहीत.
एकतर सध्या शाळा आणि काॅलेज ची शिक्षणाची फीस फार मोठी आहे. ती फीस भरतानाच पालकांची दमछाक होते. त्यात वेगवेगळ्या विषयांचे क्लास आहेत. त्यांची फीस सुद्धा गोरगरीब पालकांचे आवाक्यात नाही. तसेच काही शाळा डोनेशन घेतल्या शिवाय प्रवेश देत नाहीत. शासकीय शाळेतील शिक्षक खुप चांगले शिकवतात. तसेच ठराविकच काही शासकीय शाळांमध्ये शिक्षणा संबधीच्या सोयी सुविधा चांगल्या आहेत. परंतु अनेक वेळा शासकीय शाळांना लोकसहभागावर अवलंबून रहावे लागते. ग्रामीण भागातील ब-याच शाळा सुसज्ज नाहीत. त्यामुळे शासकीय शाळेत फक्त गरीब व मध्यमवर्गीय लोकांची मुलंमुली असतात.
प्रायव्हेट शाळेत जशा सोयी सुविधा उपलब्ध आहेत तशा सोयी शासकीय शाळेत नाहीत. खरोखरच शासकीय शाळा सरकारने सुसज्ज आणि चांगल्या केल्या पाहिजेत तरच गोरगरीब लोकांची मुलंमुली शिक्षण घेउ शकतील. आता ऑनलाईन शिक्षण पध्दती मध्ये नोट्स कशा मिळतील? विद्यार्थी दिवसभर काय वाचणार व अभ्यास कसा करणार ? प्रत्यक्षात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना समोरासमोर शिकवणे आणि ऑनलाईन शिकवणे यात फार मोठा फरक आहे. विद्यार्थ्याना दिवसभर मोबाईल वापरणे व अभ्यास करणे तर शक्य नाही. जर दिवसभर मोबाईल वापरला तर त्याचे अनेक दुष्परिणामांचा सामना करावा लागेल.
कधी कधी विज्ञान हे शाप की वरदान असा निबंध पुर्वी शाळेत परीक्षा साठी हमखास यायचा. तेव्हा वाटायचं कि, विज्ञान वरदान आहे. परंतु प्रत्यक्षात आता पाहिले कि असे वाटते की, विज्ञान शाप आहे. अगोदरच काही श्रीमंत लोकांनी आपले मुलांना मोबाईल फोन घेऊन दिले आहेत. मोबाईल मुळे आगोदरच कौटुंबिक स्वास्थ्य बिघडले आहे. त्यातच आता ऑनलाईन शिक्षण पध्दती आली आहे.
देशातील लाॅकडाऊन पुर्णपणे संपला जात नाही तोपर्यंत महाराष्ट्र सरकारने शाळा आणि काॅलेज बंदच ठेवले पाहिजे. सध्या महाराष्ट्रात कोरोना चे रूग्ण जास्त आहेत तसेच रूग्ण बरे होण्याचे प्रमाण सुद्धा चांगले आहे. त्यामुळे निश्चितच कोरोनाची महामारी लवकरच आटोक्यात येईल.शिक्षण घेणे जरी महत्वाचे असले तरी आणि विद्यार्थ्याचे शैक्षणिक वर्षं वाया जाऊ नये हे खरे असले तरी फक्त ऑनलाईन शिक्षण पध्दती मुळे विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागू नये हिच अपेक्षा आहे.
ॲड शिवाजी अण्णा कराळे
सदस्य जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर
99 22 545 545