शून्यातून विश्व निर्माण करणारे माजी खासदार व ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांचा जीवनप्रवास

Ahmednagarlive24
Published:

कुठलाही राजकीय वारसा नसतानाही विलक्षण जिद्द, जनसंग्रहाचा व्यासंग यातून माजी खासदार व ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांनी ग्रामीण भागाचा कायापालट करण्याचे स्वप्न पाहिले. परिश्रमपूर्वक मोठे काम करण्याची जिद्द उराशी बाळगले. सोनईतून येऊन नगर जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच साहित्य क्षेत्रात त्यांनी अतुलनीय काम केले. त्यांच्या कष्टाने सोनईसह परिसराचे सोने झाले. ज्येष्ठ नेते गडाख यांचा आज वाढदिवस. त्यािनमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला हा आढावा.

सोनई सारख्या छोट्या गावात ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे बालपण गेले. त्यामुळेच त्यांना शेतकरी, कष्टकरी माणसांचे, दलितांचे, शेतकऱ्यांचे जगणे कधी परके वाटलेच नाही. गडाख यांनी तरुण वयात वडील गेले, तेव्हा सर्वांचा विरोध पत्करून दहाव्याला जेवण न घालता जेवणाचा सर्व खर्च मागासवर्गीय वस्तीतील शाळेसाठी दिला.

उच्च शिक्षण घेऊन साहेब शाळेत शिक्षकाची नोकरी करत असताना जिल्हा परिषद निवडणुका लागल्या होत्या. मित्र आणि जुन्या जाणत्यांच्या आग्रहाखातर निवडणुकीला होकार दिला. त्यांनतर त्यांचा राजकारणातील प्रवास सुरू झाला. यापूर्वी त्यांनी महाविद्यालयाच्या सचिवपदाची निवडणूक जिंकली होती.

पंचायत समिती सभापतिपदाच्या काळात परिसरातील शेतकऱ्यांची खासगी साखर कारखान्याकडून होत असलेली लूट त्यांना पाहवत नव्हती. त्यामुळे त्यांनी सोनई येथे मुळा सहकारी साखर कारखाना काढण्याचा संकल्प केला. प्रखर विरोध सहन करत आणि संघर्ष करत त्यांनी तो उभारला आणि गेली तीन दशके यशस्वीपणे चालवून दाखवला.

जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या कार्यकाळात यशवंतरावांनी त्यांनी शेतकऱ्यांना शेतीसोबत जोडधंदा करण्यासाठी गाई वाटल्या. सर्वाधिक बजेट पशुसंवर्धन विभागावर खर्च केले होते. आशिया खंडातील सर्वात मोठ्या अहमदनगर जिल्हा बँकेची धुरा यशस्वीपणे सांभाळली. त्याकाळी त्यांनी सोसायटीमार्फत अनेक शेतकऱ्यांना कर्ज वाटप करून पीक कर्ज कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले.

जिरायत भागातील शेतकऱ्यांना कॅनॉलचे पाणी मिळत नसल्यामुळे लिफ्ट योजना सुरू करून दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला ओलिताखाली आणली. नगर दक्षिण मतदारसंघातून लोकसभेच्या तीन निवडणुका जिंकल्या. या सर्व निवडणुकीतून सर्वांच्या लक्षात राहिलेली निवडणूक म्हणजे गडाख-विखे लढत आणि पुढे कोर्टात केस गेली.

राजकीय सुडाने निर्माण झालेला ‘विखे-गडाख’ वाद म्हणजे जिल्ह्याच्या इतिहासातील राजकीय काळे पान आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील बाळासाहेब विखे विरुद्ध यशवंतराव गडाख खटल्यामुळे १९९१ मध्ये खऱ्या अर्थाने देशात निवडणूक आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली.

१९९७ मध्ये नगर येथे ७० वे मराठी साहित्य संमेलन गडाखांनी भरवले. ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी १९७९ मध्ये त्यांनी मुळा एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. अजातशत्रू व्यक्तिमत्त्व ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांना वाढदिवसाच्या उदंड शुभेच्छा.

शब्दांकन –

इंजिनिअर विकास राजळे, लोहोगाव, ता. नेवासे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment