Samruddhi Mahamarg Tunnel :- महाराष्ट्राचा विकासाचा महामार्ग म्हणून समृद्धी महामार्गाचा उल्लेख केला जातो.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गाचे काम जोरात सुरू असून लवकरच मुंबईपर्यंत हा महामार्ग वाहतुकीस खुला होईल अशी शक्यता आहे.
महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन महत्त्वपूर्ण शहरांना जोडणारा सहाशे किलोमीटरचा हा महामार्ग असून या महामार्गाचे नाव हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असे आहे. या महामार्गाच्या पहिल्या टप्प्या हा नागपूर ते शिर्डी दरम्यान सुरू करण्यात आला होता व त्यानंतर शिर्डी ते भरविर पर्यंत दुसरा टप्पा सुरू करण्यात आलेला आहे.
इगतपुरी पासून ते मुंबई पर्यंत अनेक आव्हानात्मक टप्प्यांवर या महामार्गाचे काम सुरू असून त्यातील काही महत्त्वाचे आव्हानात्मक असलेले टप्प्यांचे काम पूर्ण करण्यात आलेले आहे. राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांची कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून समृद्धी महामार्ग खूप महत्त्वाचा ठरणार आहे.
कसारा घाटातील अनेक आव्हानात्मक टप्प्यांमधील एक टप्पा म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबी व रुंदीचा आठ किलोमीटर लांबीचा एक दुहेरी बोगदा तयार करण्यात आलेला आहे. या बोगदयामुळे आता कासारा ते इगतपुरीचे अंतर देखील कमी होणार आहे आणि नाशिक पासून मुंबई देखील वेगात गाठता येणार आहे. याच बोगद्याविषयीची माहिती आपण या लेखात घेऊ.
हा आहे महाराष्ट्रातील सर्वात लांबी व रुंदीचा बोगदा
समृद्धी महामार्गावर आठ किलोमीटर लांबीचा दुहेरी बोगदा तयार करण्यात आला असून महाराष्ट्रातील सर्वात लांब व रुंदी असलेला हा बोगदा आहे. अत्यंत खडतर आणि आव्हानात्मक परिस्थितीमध्ये तीन महिने आधी हा बोगदा तयार करण्यात आला आहे.
समृद्धी महामार्गावर कळसुबाई मार्गाजवळील पिंपरी सद्रोदिन व शहापूर तालुक्यातील वशाला बुद्रुक( कसारा ) दरम्यान 13.1 किलोमीटर लांबीचा सहा लेनचा मार्ग बांधण्यात आला असून या दरम्यान दोन पूल आणि दुहेरी बोगदा देखील बांधण्यात आलेला आहे व या बोगद्याचे काम आता पूर्ण झालेले आहे.
कसे आहे या बोगद्याचे स्वरूप?
13.1 किलोमीटर लांब असलेल्या या पॅकेज मधील 8215 मीटर लांबीचा बोगदात तीन भाग करून तयार करण्यात आला आहे. यामध्ये जर आपण इगतपुरीच्या बाजूने विचार केला तर इगतपुरी ते कसारा या दिशेने 180 मीटरचा उतार बोगद्यात आहे.
यामुळेच या बोगद्याचा आकार इंग्रजी एस अक्षरासारखा करण्यात आलेला आहे. हा बोगदा एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगराला कनेक्ट करण्याकरिता वीस मजली इमारती जितकी उंच राहील तेवढ्या उंचीवर एक व्हायाडक्ट देखील उभारण्यात आले आहे.
या बोगद्याच्या बांधकामादरम्यान देशातील प्रथमच हाय प्रेशर वाटर मिस्ट सिस्टम प्रणाली वापरण्यात आलेली आहे. हे प्रणाली वापरल्यामुळे समजा बोगद्यात आग लागली किंवा तापमान 60° पर्यंत पोहोचले तर त्या ठिकाणची अग्निशमन यंत्रणा आपोआप काम सुरू करेल अशा पद्धतीचे हे तंत्रज्ञान आहे.
तसेच या बोगद्यातून प्रवास करत असताना प्रवासादरम्यान प्रवाशांना इंटरनेटची सुविधा मिळावी याकरिता बोगद्यामध्ये लिकी केबलची व्यवस्था केली आहे. आठ किलोमीटर लांबी असलेले ट्वीन टनेल एकमेकांना जोडण्याकरिता 26 पासिंग पॅसेज देखील तयार करण्यात आले आहेत.
समजा एखाद्या वेळी काही आपत्कालीन परिस्थिती बोगद्यामध्ये निर्माण झाली तर दुसरा पाचशे मीटर लांबीचा आपत्कालीन बोगदा देखील बांधण्यात आलेला आहे. या आपत्कालीन बोगद्यातून समृद्धी महामार्गावरून थेट जुन्या मुंबई नाशिक महामार्गावर थेट जाता येणार आहे.
काय होईल या बोगद्याचा फायदा?
या बोगद्यामुळे नाशिक ते ठाणेदरम्यानच्या प्रवासाचे अंतर कमी होणारच आहे. परंतु इगतपुरी आणि कासारादरम्यानच्या अंतर दहा मिनिटांमध्ये पूर्ण करता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे नक्कीच प्रवाशांचा वेळ वाचण्यास खूप मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे.