Farmer Success Story:- सध्या अनेक सुशिक्षित तरुण शेतीकडे मोठ्या प्रमाणात वळले असून करिअर म्हणून बरेच तरुण आता शेतीचा विचार करू लागले आहेत. असे तरुण शेतीमध्ये येताना परंपरागत शेती पद्धती आणि पिके यांना फाटा देत आधुनिक पद्धतीने आणि तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करताना दिसून येत आहेत.
आजकालचे तरुणाई शेतीमध्ये प्रामुख्याने फळबाग लागवड तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीपाला लागवड व स्ट्रॉबेरी तसेच सफरचंदासारखे प्रयोग देखील यशस्वी करताना दिसून येत आहेत.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि मेहनतीच्या जोरावर शेती परवडण्याजोगी कशी करता येते हे सिद्ध करणारे तरुणांचे असे अनेक उदाहरणे आपल्याला दिसून येतात.
अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुक्यात असलेल्या बोरी या गावच्या एका तरुण शेतकऱ्याचा विचार केला तर या शेतकऱ्यांनी तीन एकर खडकाळ जमिनीमध्ये डाळिंबाची लागवड करून लाखात नफा मिळवला आहे व याच तरुण शेतकऱ्याची यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.
3 एकर डाळिंब बागेतून मिळवला 31 लाख रुपयांचा निव्वळ नफा
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात असलेल्या बोरी या गावच्या दीपक सोनवणे या तरुण शेतकऱ्याने चार वर्षांपूर्वी तीन एकर खडकाळ जमिनीमध्ये 1000 डाळिंबाच्या झाडांची लागवड केली होती. उत्तम व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचा जोरावर त्याने यशस्वीरित्या डाळिंबाची बाग फुलवली व नवरात्रोत्सवात माल येईल या पद्धतीने उशिरा आंबे बहार धरला व त्या पद्धतीने नियोजन केले.
या सगळ्या व्यवस्थापन आणि मेहनतीला आता चांगले यश मिळाले असून मेहनतीच्या जोरावर उत्पादित केलेल्या डाळिंबाला चांगला बाजार भाव देखील मिळाला आहे व या डाळिंब विक्रीतून दीपक सोनवणे यांना चक्क 31 लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. दीपक सोनवणे यांचा ठिबक सिंचन विक्रीचा व्यवसाय असून ते प्रयोगशील शेतकरी देखील आहेत. जेव्हा त्यांनी डाळिंब लागवडीचा निर्णय घेतला तेव्हा जैन टिशू कल्चर नर्सरीच्या माध्यमातून त्यांनी भगवा या डाळींबाच्या जातीची एक हजार रोपांची खरेदी केली व शेतामध्ये लागवड केली. लागवड करताना अंतराला खूप महत्त्व दिले व दोन झाडांमध्ये 13 बाय 9 फुटांचे अंतर ठेवले.
गेल्या काही वर्षापासून डाळिंब फळ पिकावर तेल्या आणि मर या दोन रोगांनी थैमान घातलेले आहे व बऱ्याच बागा या रोगामुळे अडचणीत असताना दीपक यांनी मात्र डाळिंबाला कोणत्या कालावधीमध्ये जास्त दर मिळतो याचा सखोल अभ्यास केला व त्या पद्धतीने धाडसी निर्णय घेत एप्रिल महिन्यामध्ये आंबे बहार धरण्याचे नियोजन केले. त्यांच्या मते पावसाळ्याच्या कालावधीत डाळिंब रोगाला बळी पडण्याचा धोका असतो व बाजार भाव देखील चांगला मिळत नसल्यामुळे त्यांनी एप्रिल महिन्यात आंबे बहार धरला.
बहार नियोजन करण्यापूर्वी सर्व डाळिंब फळ पिकाला बेसल डोस टाकले व त्यासोबत लेंडी खत टाकून चार एप्रिलला पहिले पाणी दिले. तसेच खत व औषधांचे योग्य पद्धतीने नियोजन करून झाडांची छाटणी देखील अगदी वेळेवर केली. कीटकनाशकांचा फवारणी तसेच जैविक बॅक्टेरियांचे संतुलन देखील खूप चांगल्या पद्धतीने केले व या सगळ्या व्यवस्थापनामुळे फळांची फुगवण देखील चांगली झाली व रंग तसेच आकार देखील चांगला मिळाला असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
जर त्यांचा एकूण डाळिंब बागेची स्थिती पाहिली तर 1000 झाडे असून त्यांना यावेळेस 174 रुपये प्रति किलोचा दर मिळाला व एकूण उत्पन्न 21 टन मिळाले. यामध्ये त्यांचा सात लाख रुपये खर्च होता व खर्च वजा जाता त्यांना 31 लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला.
अशा पद्धतीने योग्य व्यवस्थापन केले तर शेतीमध्ये देखील चांगले उत्पादन मिळवता येते व खूप पैसा मिळवता येतो हे सिद्ध होते.