Bank Rule Of Deposit:- जेव्हापासून केंद्र सरकारने पंतप्रधान जनधन योजना सुरू केली तेव्हापासून भारतातील अगदी गरिबातल्या गरीब व्यक्तीचे देखील बँकेत खाते उघडले गेले व असे देशातील कोट्यावधी नागरिक बँकिंग क्षेत्राशी जोडले गेले आहेत.त्यामुळे आता थोड्याफार प्रमाणात का होईना प्रत्येकाचे बँक खात्यामध्ये पैसे असतात.
यामध्ये सहकारी संस्था तसेच पतपेढी, जिल्हा सहकारी बँका तसेच राष्ट्रीयकृत बँकांमध्ये आपल्याला बचत खाते दिसून येतात. परंतु आपण बऱ्याचदा ऐकतो की काही पतसंस्था किंवा काही बँका दिवाळखोरीला निघतात किंवा त्या बुडतात.
अशावेळी मात्र गुंतवणूकदारांनी जे पैसे ठेवलेले असतात किंवा बचत खात्यामध्ये व्यक्तींचे जे पैसे असतात त्या पैशांचे काय होते? याबाबत मोठा प्रश्न निर्माण होतो. अशा परिस्थितीत बँकांच्या माध्यमातून आपल्याला पैसे परत मिळतात का? हा देखील एक मोठा प्रश्न असतो. त्यामुळे याविषयीची काही महत्त्वाची माहिती थोडक्यात बघू.
बँक बुडाली तर तुम्हाला किती पैसे परत मिळतील?
तुमचे ज्या बँकेत खाते आहे व ती बँक बुडाली तर नियमानुसार तुम्हाला कमाल पाच लाख रुपये परत मिळतात. तुमचे जर यापेक्षा जास्त रक्कम जमा असली तरीही. म्हणजे तुमचे दहा लाख जरी बँकेत असतील तर त्यापैकी तुम्हाला फक्त पाच लाख रुपये परत मिळतात.
जवळपास हा नियम सर्व सरकारी आणि खाजगी बँकांना लागू आहे. यामध्ये बघितले तर 4 फेब्रुवारी 2020 च्या अगोदर बँकांमध्ये ज्या ठेवी ठेवलेल्या राहायच्या त्यावर फक्त एक लाख रुपयांचा विमा होता.
परंतु 2020 मध्ये हा नियम बदलण्यात आला व आता ठेवीसाठी महत्त्वाचे असलेले विमा संरक्षण एक लाख रुपयांवरून पाच लाख रुपये करण्यात आले.
किती दिवसात परत मिळतात हे पैसे?
तुम्ही या प्रकारची विमा प्रणाली बघितली तर यामध्ये करंट अकाउंट तसेच सेविंग अकाउंट, आवर्ती खाते यासह सर्व प्रकारच्या ठेवींचा समावेश करण्यात आला आहे. तसे याबद्दल जर नियम बघितला तर बँक बुडाल्यास खातेदारांना 90 दिवसाच्या आतमध्ये हे पैसे मिळतात.
यामध्ये जर बघितले तर जी बँक अडचणीत असते ती बँक पहिल्या 45 दिवसातच विमा महामंडळाकडे सोपवले जाते याबाबतीत कुठल्याही ठरावाची प्रतीक्षा न करता 90 दिवसात ही पैसे परत करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते.
एकाच बँकेच्या अनेक शाखांमध्ये पैसे असतील तर?
समजा तुम्ही एकाच बँकेच्या अनेक शाखांमध्ये खाते उघडले असतील तर नियमानुसार सर्व खाते एकच मानले जातात. तरी तुमचे सर्व खात्यांमध्ये पैसे असले तरीही सर्वांची रक्कम एकच म्हणून जोडली जाईल आणि एकत्र पाच लाख रुपये दिले जातात.
परंतु तुमची ठेव रक्कम जर पाच लाख रुपयापेक्षा कमी असेल तर खात्यात तुमची जमा असलेली जितकी रक्कम आहे तितकी रक्कम तुम्हाला मिळत असते.
बँकेत एफडी केली असेल तर त्या पैशांचे काय होते?
तुम्ही बँकेमध्ये एफडी केली असेल आणि बचत खाते किंवा आवर्ती खाते किंवा इतर कोणत्याही योजनेत पैसे गुंतवले असतील तरी देखील सर्व रक्कम जोडून तुम्हाला जास्तीत जास्त पाच लाख रुपये या माध्यमातून मिळतात.
जर तुमची ठेव पाच लाख रुपये पेक्षा कमी असेल तर तुमची जमा रक्कम जितकी आहे तितके पैसे तुम्हाला परत मिळतात. म्हणजेच पाच लाख रुपये पेक्षा तुमची ठेव जास्त असेल तर मात्र तुम्हाला काही पैशांचे नुकसान सहन करावे लागते.