Investment In Gold:- कमावलेल्या पैशांची बचत करून त्यांची व्यवस्थित गुंतवणूक करणे हे भविष्यातील आर्थिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची बाब आहे. गुंतवणूक करताना गुंतवणूक सुरक्षित राहावी व मिळणारा परतावा चांगला मिळावा या महत्वाच्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूकदार गुंतवणूक करतात.
यामध्ये जर आपण गुंतवणुकीचा विचार केला तर अनेक वर्षांपासून बरेच जण सोन्यामध्ये गुंतवणूक करतात व ही गुंतवणूक वाया जात नाही असं म्हटलं जातं. कारण याचा एक दुहेरी फायदा होत असतो. सोन्यातील गुंतवणूक केल्याने सोने अंगावर परिधान देखील करता येते व जेव्हा एखाद्या वेळेस आर्थिक अडचण उद्भवली तर ते आपल्याला खूप कामाला देखील येते.
त्यामुळे सोन्यातील केलेली गुंतवणूक कधीच वाया जात नाही किंवा आपले नुकसान होत नाही अशा पद्धतीची असते. परंतु आता नुसते सोने खरेदी करून त्यामध्ये पैसे गुंतवणे या व्यतिरिक्त आता काही पर्याय सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी समोर आलेले आहेत. नेमके हे पर्याय कोणते आहेत? याबद्दल त्यांचे महत्त्वपूर्ण माहिती आपण घेऊ.
सोन्यात गुंतवणूक करण्याचे हे आहेत नवीन पर्याय
1- सॉव्हरन गोल्ड बॉण्ड– तुम्हाला जर सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर हा पर्याय खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही हा बॉण्ड खरेदी केला तर तुम्हाला या माध्यमातून चांगले व्याज मिळण्याची शक्यता असते. यामध्ये तुम्हाला बॉण्ड स्वरूपामध्ये सोनं मिळते. म्हणजे तुम्ही जे काही पैसे गुंतवलेले आहेत त्या पैशांची हमी सरकारच्या माध्यमातून दिली जाते.
यामध्ये सॉव्हरीन गोल्ड बॉण्ड रिझर्व बँकेच्या माध्यमातून जारी केला जातो व त्याची एक किंमत ठरलेली असते व हा बॉण्ड आठ वर्षांमध्ये परिपक्व अर्थात मॅच्युअर होतो. याचा अर्थ आठ वर्षानंतर सोन्याचा जो भाव असतो त्यानुसार तुम्हाला रक्कम परत मिळते. महत्वाचे म्हणजे त्यावेळी मिळणारी तुम्हाला जी काही रक्कम असते त्यावर कुठल्याही प्रकारचा कर लागू होत नाही. हे बॉण्ड प्रत्येक महिन्याला जारी केले जातात व त्यांची वेगवेगळी किंमत असते.
समजा आठ वर्षे पूर्ण होण्याआधी तुम्हाला काही आर्थिक गरज असली तर तुम्ही त्या अगोदर देखील हे बॉण्ड विकू शकतात. तुम्हाला जर हे बॉण्ड विकत घ्यायचे असतील तर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने बँक किंवा एचएससीआयएल ऑफिस किंवा पोस्ट ऑफिस आणि एजंट कडून फॉर्म घेऊन विकत घेऊ शकतात. तसेच ऑनलाईन पद्धतीने तुम्ही रिझर्व बँकेची वेबसाईट किंवा बँकांच्या ऑनलाईन एप्लीकेशनच्या माध्यमातून फॉर्म विकत घेऊ शकतात व या माध्यमातून हे बॉण्ड खरेदी करू शकतात.
2- ईटीएफ( गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडस्)- या प्रकारामध्ये तुम्ही जसे शेअर खरेदी करतात त्याचप्रमाणे ही खरेदी करता येते. याकरिता तुम्हाला स्वतःची डिमॅट अकाउंट ओपन करणे गरजेचे असते व या माध्यमातून तुम्ही ईटीएफ ची खरेदी करू शकतात व त्याची विक्री तुम्ही रोजच्या रोज देखील करू शकतात.
गोल्ड ईटीएफ काही कंपन्यांच्या माध्यमातून जारी केला जातो व तुम्ही तो विकत घेऊ शकतात व याची सिक्युरिटी म्हणजे सोनं हीच असते. जेव्हा तुम्हाला पैशांची गरज असते किंवा ईटीएफचे भाव वाढले असे तुम्हाला वाटले तर तुम्ही त्याची विक्री करू शकतात.
परंतु यातील एक समस्या म्हणजे तुम्हाला ज्या दिवशी ईटीएफ विकायचे आहेत त्याचवेळी ते विकले जातील की नाही हे पक्के नसते. तुम्हाला आज सोने विकायचे आहे पण खरेदी करणारा उपलब्ध नसेल तर समस्या निर्माण होऊ शकते. या कारणामुळे भारतात ईटीएफ जास्त प्रसिद्ध किंवा लोकप्रिय नाही.
3- म्युच्युअल फंड्स– म्युच्युअल फंडच्या माध्यमातून तुम्ही गोल्ड फंड मध्ये पैशांची गुंतवणूक करू शकता व ही गुंतवणूक तुम्ही पाचशे रुपयांपासून करू शकतात. छोट्या गुंतवणुकी करिता हा एक उत्तम पर्याय आहे. म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्या अनेक कंपन्या गोल्ड फंडमध्ये कार्यरत असून या माध्यमातून तुम्हाला गुंतवणूक करता येते.
यामधील केलेल्या गुंतवणुकीचा परतावा हा तुम्हाला बाजारातील चढउतारानुसार मिळतो. यामध्ये पैसे गुंतवण्याचा प्रमुख फायदा म्हणजे दोन वर्षांनी जर तुम्हाला पैशांची गरज भासली तर तुम्हाला कंपनी पैसे परत करतेच. यामध्ये खरेदीदार असो किंवा नसो त्याचा काहीच फरक पडत नाही म्हणजेच ईटीएफ मध्ये जी समस्या आहे ती याच्यात नाही. त्यामुळे हा देखील पर्याय खूप महत्त्वाचा आहे.
4- सोन्याच्या दागिन्यांची खरेदी– यामध्ये तुम्ही प्रत्यक्ष सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करू शकतात. त्यामध्ये तुम्ही सोन्याची कोणतीही दागिने किंवा नाणी किंवा बिस्किटे यामध्ये गुंतवणूक करू शकतात. परंतु नाणी आणि सोन्याची बिस्किटे यांचा जर सोन्याच्या दागिन्यांच्या तुलनेत विचार केला तर खरेदीमध्ये काही फरक असतो.
दागिन्यांमध्ये काही मेकिंग चार्ज देणे गरजेचे असते व हा 20 ते 22% पर्यंत असतो. परंतु त्या तुलनेत सोन्याची नाणी किंवा बिस्किटे खरेदी करण्यावर मजुरी दोन ते चार टक्के असते. तसेच प्रत्यक्ष सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीमध्ये सोन्याची सुरक्षिततेबाबत देखील काळजी घेणे गरजेचे असते. परंतु इतर पर्यायांमध्ये अशा पद्धतीचा प्रश्न उद्भवत नाही. त्यामुळे तुम्हाला जर सोन्यात फक्त गुंतवणूक करायची असेल तर बॉण्डचा पर्याय हा चांगला ठरतो.