Sandalwood Farming : या 9 वी पास शेतकऱ्याची आहे 300 कोटीची शेती, 27 एकरात आहे चंदनाची लागवड

Ajay Patil
Published:
sandalwood farming

Sandalwood Farming :- काही शेतकरी शेतीमध्ये इतका भन्नाट प्रयोग करतात की पाहून आपण थक्क होतो. म्हणजेच अगदी काहीतरी जगावेगळे करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि त्याला कष्टाची जोड देऊन चांगल्यापैकी ते यशस्वी देखील होतात. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीपाला पिकांची तसेच फळ पिकांची लागवड तर आता शेतकरी करूच लागले आहेत. यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या विदेशी भाजीपाला तसेच ड्रॅगनफ्रुट सारखे वेगवेगळ्या प्रकारची फळे आणि इतकेच नाही तर महाराष्ट्रामध्ये सफरचंदाची लागवड मोठ्या प्रमाणावर शेतकरी यशस्वी करत आहेत.

साहजिकच या सगळ्या मागे काहीतरी करण्याची इच्छा आणि त्यासाठी कष्ट उपसण्याची तयारी खूप महत्त्वपूर्ण असते. परंतु याहीपेक्षा अगदी भन्नाट असा शेतीतील प्रयोग जर पाहिला तर चंदनाची शेती हा होय. आता चंदनाची लागवड करायची म्हटले तर व्यक्ती किती लावू शकतो याचा एक अंदाज आपल्याला बांधता येऊ शकतो. अहमदनगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने चक्क 27 एकरामध्ये चंदनाची लागवड केलेली आहे. या 27 एकर चंदन लागवडीतून त्यांना येणाऱ्या काही वर्षात प्रचंड प्रमाणात नफा देखील मिळेल अशी शक्यता आहे. नेमकी याच शेतकऱ्याची यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.

 27 एकरात चंदनाची लागवड

याबाबत सविस्तर वृत्त असे की,श्री राजेंद्र रावसाहेब गाडेकर हे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात असलेल्या पिंपळनेर गावचे रहिवाशी असून त्यांचे शिक्षण फक्त नववी पास इतके आहे. राजेंद्र गाडेकर यांनी अगदी जगावेगळा प्रयोग करत सत्तावीस एकरामध्ये चंदनाची लागवड केली आहे. शेतामध्ये कायमच नवनवीन प्रयोग करण्यात व्यस्त असणारे गाडेकर यांनी कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्याच्या दृष्टिकोनातून खूप प्रयत्न केले.

नेमकी सत्तावीस एकर एवढ्या मोठ्या क्षेत्रामध्ये चंदनाची लागवड करण्यामागे असलेले महत्त्वाचे कारण सांगताना गाडेकर यांनी म्हटले की, सुरुवातीला माळरानाची शेती असल्यामुळे त्यांनी डाळिंब, आवळा, सिताफळ यांची लागवड केलेली होती व त्या माध्यमातून देखील ते खूप चांगले उत्पन्न मिळवत होते. परंतु 2014 मध्ये जो काही दुष्काळ पडला व तेव्हा त्यांच्या लक्षात आले की शेतामध्ये लागवड केलेली फळबागा जळायला लागली परंतु शेताच्या बांधांवर नैसर्गिकरित्या उगवलेली झाडे मात्र हिरवीगार दिसत होती.

याच दृष्टिकोनातून त्यांनी चंदनाची लागवड करण्याचे ठरवले. निसर्गावर मात करण्याच्या दृष्टिकोनातून चंदनाची लागवड करण्याचे ठरवण्याचे देखील त्यांनी आवर्जून म्हटले. निसर्गात होत असलेल्या बदला सोबत शेती पद्धतीत बदल करणे देखील गरजेचे आहे या दृष्टिकोनातून त्यांनी चंदन लागवडीचा निर्णय घेतला. कारण चंदन हे दुष्काळामध्ये चांगले तग धरणारे झाड असल्यामुळे चंदनाची लागवड केली. नंतर लागवडीचा निर्णय घेतल्यानंतर त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यायला लागले. घरच्यांनी देखील विरोध केला.

परंतु घरी आई वडील आणि पत्नी यांच्याशी व्यवस्थितपणे चर्चा करून त्यांनी सगळ्यांचा पाठिंबा मिळवला. चंदनाची लागवड करण्या अगोदर त्यांनी याचा परिपूर्ण अभ्यास केला व त्यामध्ये त्यांना आढळून आले की चंदन हे झाड कशा प्रकारचे आहे तसेच त्याला लागणारे पाणी आणि जमीन इत्यादी बाबींचा सखोल अभ्यास केला व त्यानंतर 27 एकर मध्ये एकूण 12000 झाडांची लागवड केली आहे. चंदनाच्या बाबतीत काय म्हटले जाते की चंदनाचे झाड चोरीला जाते.

म्हणून त्यांनी सुरक्षिततेकरिता काय उपाययोजना करता येतील याचा अभ्यास गुगलच्या माध्यमातून त्यांनी केला व त्या माध्यमातून झटका करंट तसेच सजीव कुंपण इत्यादी माध्यमांचा अवलंब केला. एवढेच नाही तर त्यांनी चंदनाच्या झाडाला चीप देखील बसवलेले आहेत.

 अशा पद्धतीचे आहे गाडेकर यांचे चंदन लागवडीचे तंत्र

चंदन हे परोपजीवी वृक्ष असल्यामुळे चंदनाच्या झाडासोबत गाडेकर यांनी सिताफळ, आवळा आणि आंब्यासारखी उत्पन्न देणारे फळझाडांची लागवड केली आहे. यामागे देखील पाऊस पडला नाही तरी सिताफळाचे झाड तग धरून राहते. कडुनिंबाचे झाड देखील व्यवस्थितपणे दुष्काळात तग धरते व लागवड केलेले चंदनाचे झाडे कडुनिंब आणि सीताफळावर जगणार आहे त्यामुळेच त्यांनी आंतरपीक म्हणून सिताफळ तसेच पपई या फळ पिकांची लागवड केली व त्यापासून देखील त्यांना खूप चांगले आर्थिक उत्पन्न मिळत आहे.

एका एकरामध्ये त्यांनी 410 चंदनाची झाडे लावली असून 27 एकरची जर लागवड पाहिली तर यामध्ये 12,000 एकूण चंदनाचे झाडे आणि चंदन जगवण्यासाठी आवश्यक असणारी सीताफळ तसेच आवळा व आंबे असे मिळून 45000 हजार झाडांची लागवड त्यांनी 27 एकर मध्ये केली आहे. 27 एकर मध्ये चंदनाची लागवड करताना त्यांनी एकाच वेळी लागवड न करता तीन टप्प्यात लागवड केलेली आहे. सुरुवातीला पाच हजार झाडांची  लागवड केली व त्यांच्या सोयीनुसार त्यांनी क्षेत्रात वाढ केली. चंदनाची लागवड करताना त्यांनी दहा बाय दहाच्या अंतर ठेवून लागवड केलेली आहे.

 चंदन लागवडीसाठी मिळते शासकीय अनुदान

गाडेकर यांनी सांगितल्याप्रमाणे चंदन लागवडीसाठी महाराष्ट्र राज्य फुलोत्पादन औषधी मंडळ पुणे ही संस्था चंदन लागवडी करीता हेक्टरी 58 हजार रुपयांचे अनुदान देते. तसेच ड्रीपसाठी लागणारे अनुदान देखील शासनाकडून त्यांनी मिळवले आहे.

 चंदनाच्या बागेची सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून घेतली काळजी

गाडेकर यांनी चंदनाच्या झाडाचे संरक्षण करता यावे याकरिता सजीव कुंपणाचा वापर केला. झटका करंटचा देखील त्यांनी वापर केलेला आहे. तसेच कुंपणाची जाळी देखील बसवलेली असून त्याही पुढे जात त्यांनी प्रत्येक चंदनाच्या झाडांमध्ये मायक्रोचीप देखील बसवलेली आहे. जर एखाद्या वेळेस चंदनाचे झाड चोरीला गेले तरी मायक्रोचीपच्या माध्यमातून त्यांना कवू शकते की झाड नेमके कोणत्या ठिकाणी चोरीला गेलेले आहे किंवा आता कोणत्या ठिकाणी आहे. अशा आधुनिक पद्धतीने त्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना केलेल्या आहेत.

गाडेकर यांनी सांगितले चंदन लागवडीसाठी लागणारी जमीन आणि पाण्याची व्यवस्था

गाडेकर यांनी सांगितल्याप्रमाणे तीनही प्रकारच्या जमिनीमध्ये चंदनाचे उत्पादन चांगले येऊ शकते परंतु तरी देखील चांगल्या उत्पादनाकरिता हलकी जमीन ही उत्तम असते. कारण चंदनाचे उत्पादनाचा विचार केला तर त्याचा गाभा हा प्रमुख उत्पन्नाचा स्त्रोत असतो. जेव्हा झाडांमध्ये हा गाभा भरत असतो तेव्हा  झाडाला कमी पाण्याचे आवश्यकता असते व त्या दृष्टिकोनातूनच पाण्याचे नियोजन करावे लागते. लागवड करताना एक बाय दीडचा खड्डा घेऊन त्यामध्ये शेणखत व बाकीची आवश्यक खते टाकून तसेच बुरशीजन्य पावडर टाकून चंदनाची लागवड करणे गरजेचे आहे.

त्यानंतर त्यासोबत सीताफळ आणि आंब्यांसारखे तसेच कडूनिंब किंवा सिसवसारखी झाडे लावणे देखील गरजेचे आहे. सुरुवातीच्या कोवळ्या झाडावर काळी बुरशी येऊ नये याकरिता एम 45 सारख्या बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणाकरिता आवश्यक फवारणी करणे देखील गरजेचे असते. परंतु गाडेकर यांनी सांगितल्यानुसार हे एक जंगली वृक्ष असल्यामुळे जास्त प्रमाणात रोग व किडींचा प्रादुर्भाव होत नाही. जेव्हा चंदनाच्या झाडांची दोन वर्षानंतर छाटणी केली जाते तेव्हा छाटणी केल्यानंतर झाडांना बोर्डो पेस्ट लावणे गरजेचे आहे असे देखील त्यांनी आवर्जून म्हटले.

 चंदनाच्या अर्थकारण कसे असते?

गाडेकर यांनी त्यांच्या चंदन शेतीचे अर्थकारण सांगताना म्हटले की, त्यामध्ये एका एकरा मधून अकरा कोटी या प्रमाणे पहिल्या टप्प्यातील 5000 झाडांची लागवड केली असून ती 12 एकर क्षेत्रामध्ये आहे. गाडेकर यांनी कायदेशीर दृष्ट्या सर्व बाबी पूर्ण करून चंदनाची लागवड केली आहे. इतकेच नव्हे तर सातबारा उताऱ्यावर देखील चंदनाची नोंद त्यांनी करून घेतलेली आहे. म्हणजे चंदनाच्या लागवडीसाठी आवश्यक सर्व गोष्टी ते कायद्याच्या दृष्टिकोनातून करत आहेत.

त्यामुळे केंद्र शासनाची मैसूर सॅंडल म्हणून जी कर्नाटकातील कंपनी आहे त्या ठिकाणी 9400 रुपये प्रति किलो चंदनाच्या गाभ्याची किंमत आहे. एका गाभ्यापासून तेरा वर्षात 28 ते 30 किलो गाभा त्यांना मिळणार आहे. यामुळे 30 किलो गाभा याप्रमाणे नऊ हजार  रुपये दर पकडला तर दोन लाख 70 हजार रुपये एका झाडापासून उत्पन्न त्यांना मिळणार आहे.

एका झाडापासून दोन लाख 70 हजार रुपये उत्पन्न पकडले तर 400 झाडांचे उत्पन्न 11 कोटींच्या आसपास जाते. तसेच दरवर्षी गाभ्याचे दर हे वाढत जातात असे त्यांनी सांगितले. तर तेरा वर्षानंतर झाडांची तोड केली तर एका एकरातून 20 ते 22 कोटी रुपये उत्पन्न मिळण्याचे अपेक्षा त्यांना आहे. आजमीतिला त्यांचे बाग ही पाच ते सहा वर्षाची झाली असून अजून तीन ते चार वर्षांनी त्यांच्या हातात उत्पन्न मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe