Business Idea :- बऱ्याच जणांची स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असते किंवा तसा विचार तरी मनात येत असतो. परंतु बऱ्याचदा व्यवसाय कोणता करावा हे लवकर सुचतं नाही आणि सुचले तरी लागणारा पैसा कसा उभारावा याबद्दल अनेक प्रश्न निर्माण होतात.
व्यवसायाची निश्चिती करताना संबंधित व्यवसायाला बाजारपेठेत मागणी किती प्रमाणात आहे? हे प्रामुख्याने पाहणे गरजेचे असते. दैनंदिन वापरातल्या वस्तू किंवा उत्पादने बनवण्याचा व्यवसाय किंवा खाद्यपदार्थाच्या संबंधित असलेले व्यवसायांना बाजारपेठेत कायम मागणी आपल्याला दिसून येते.
परंतु या क्षेत्रात देखील अनेक छोट्या मोठ्या कंपन्या असल्यामुळे तुम्ही तयार करत असलेले उत्पादन हे दर्जेदार असणे देखील तितकेच गरजेचे असते. या आधारेच आपण या लेखामध्ये खाद्यपदार्थाशी संबंधित म्हणजेच नमकीन बनवण्याचा व्यवसाय कसा सुरु करावा व त्यासाठी काय काय तयारी करावी लागते? यासंबंधीचे महत्त्वपूर्ण माहिती घेऊ.
नमकीन व्यवसाय कसा सुरू करावा?
नमकीन बनवण्याचा व्यवसाय हा एक फायदेशीर व्यवसाय आहे. बऱ्याच घरांमध्ये देखील नमकीन बनवले जाते. तसेच बाजारपेठेमध्ये उघड्यावर देखील आपण स्नॅक्स म्हणजेच नमकीन विक्री केले जात असल्याचे पाहतो.
बऱ्याचदा प्लास्टिकच्या बॅगेमध्ये किंवा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये देखील पॅकिंग करून नमकीन विकले जाते व अशा पॅकिंग नमकीन वर कोणत्याही कंपनीचे किंवा ब्रँडचे नाव नसते. कारण अशा पद्धतीचे नमकीन हे घरी किंवा गृह उद्योगात बनवलेले असते व ते विक्री केले जाते.
म्हणजेच यावरून तुमच्या लक्षात येते की तुम्हाला जास्त खर्च करायचा नसेल तर तुम्ही अगदी घरातून या व्यवसायाला सुरुवात करू शकतात. तसेच तुम्हाला जर इतर ब्रँड प्रमाणे स्वतःचा ब्रँड तयार करून त्या नावाने हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तो देखील तुम्ही सुरू करू शकतात. परंतु यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे असते.
जागेची निवड असते महत्त्वाची
नमकीन बनवण्याचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला जागेचा शोध घेणे गरजेचे असते. परंतु ही जागा तुम्ही तुमच्या नमकीनच्या दुकानासाठी नाही तर ती नमकीन बनवण्यासाठी बघायचे आहे
त्यामुळे ती जागा बाजारपेठेच्या मध्यभागी असणे गरजेचे नाही. त्याऐवजी तुम्हाला स्वस्त जागा मिळेल अशी जागेचा शोध घेणे गरजेचे आहे. तसेच महत्त्वाचे म्हणजे वीज तसेच पाणी व रस्ता इत्यादी सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध असाव्यात.
महत्वाचे म्हणजे तुमच्या अवतीभवती स्थानिक बाजारपेठ असेल तर त्यापासून चे अंतर हे दहा किलोमीटर पेक्षा जास्त नसावे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला जर 96 हजार किलो नमकीन तयार करण्याचा प्लांट उभारायचा असेल तर त्याकरिता तुम्हाला पंधराशे ते अठराशे चौरस फूट जागेची गरज भासते. तुमचे स्वतःची जागा असेल तर चांगलेच परंतु नसेल तर तुम्ही भाडेतत्त्वावर किंवा भाडे करार करून अशी जागा घेऊ शकता.
नमकिन व्यवसायासाठी लागणारे परवाने आणि नोंदणी
तर तुम्हाला या व्यवसायामध्ये स्वतःचा ब्रँड निर्माण करायचा असेल तर त्याकरिता तुम्हाला काही परवाने आणि नोंदणी करणे गरजेचे असते. त्यासाठी तुम्हाला….
1- व्यवसाय नोंदणी – अंतर्गत एका प्रोप्रायटरशिप फर्म किंवा वन पर्सन कंपनी, पार्टनरशिप फर्म किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी इत्यादी अंतर्गत नोंदणी करणे गरजेचे असते.
2- कर नोंदणी- यामध्ये तुम्हाला जीएसटी नोंदणी करणे गरजेचे असते व त्यासोबतच अग्निशमन आणि प्रदूषण विभागाकडून एनओसी यांची देखील गरजेचे असते.
3- अन्न परवाना- यामध्ये तुम्हाला भारतीय अन्नसुरक्षा प्राधिकरण अर्थात एफएसएसएआयकडून अन्न परवाना घेणे गरजेचे असते.
4- ट्रेडमार्क नोंदणी- तुमच्या ब्रँडचे नाव संरक्षण करण्यासाठी तुम्हाला ट्रेडमार्क नोंदणी करावी लागते.
5- त्या नोंदणी व्यतिरिक्त तुम्हाला दुकान आणि आस्थापना नोंद ही फॅक्टरी ऍक्ट अंतर्गत करावी लागते.
व्यवसायासाठी लागणारी यंत्र सामग्री
हा व्यवसाय सुरू करण्याकरता तुम्हाला काही यंत्रसामग्रीची आवश्यकता भासते. यामध्ये तुम्ही कणिक मिक्सर, कच्च्या मालापासून भुजिया सेव तयार करण्यासाठी आवश्यक मशीन, डिझेल बर्नर्स आयताकृती बॅच टिलटिंग फ्रायर मशीन आवश्यक असते व याचा उपयोग करून नमकीन योग्य तळले जाते.
मसाला ड्रम लागतो व याचा उपयोग नमकीन सह ड्रममध्ये मीठ आणि इतर मसाले, फ्लेवर्स इत्यादी मिसळले जातात व पॅकिंग मशीनची आवश्यकता तुम्हाला भासते. पॅकिंग मशीनच्या सहाय्याने तुम्ही तयार नमकीन 50, 100, पाचशे ग्रॅम ते एका किलो पॅकिंग मध्ये पॅक करू शकतात व त्याला सीलबंद करू शकतात.
नमकीन तयार करण्यासाठी लागणारा कच्चामाल
नमकीन तयार करण्याकरता तुम्हाला बेसन, तेल, मीठ मसाले, मुग किंवा उडीद इत्यादी प्रकारच्या डाळी, शेंगदाणे तसेच बटाटा इत्यादी प्रकारचा कच्चामाल लागतो व या सगळ्या कच्चामालाचा नमकीन बनवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने वापर केला जातो. या सगळ्या गोष्टी पूर्ण केल्यानंतर तुम्ही नमकीन बनवणे सुरू करू शकतात. नमकीन बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किती खर्च येतो?
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारा खर्च हा तुम्ही किती प्रमाणामध्ये म्हणजेच कोणत्या स्तरावर हा व्यवसाय सुरू करणार आहात त्यावर सगळे अवलंबून असते. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा ब्रँड किंवा कंपनीची नोंदणी न करता घरातल्या घरात सुरुवात करायची असेल तर
सुरुवातीच्या टप्प्यात तुम्हाला घरात उपलब्ध गॅस स्टोव्ह आणि इतर भांड्याचा वापर करून आणि स्थानिक बाजारातून कच्चामाल आणून हा व्यवसाय सुरू करू शकतात व यामध्ये तुम्हाला 20000 किंवा त्याहून कमीत कमी किंमतीत घरात हा व्यवसाय सुरू करता येतो. परंतु तुम्हाला जर 96 हजार किलो क्षमतेचा प्लांट उभारायचा असेल तर त्याकरता तुम्हाला 14 ते 18 लाख रुपयांची गुंतवणूक लागू शकते.