Success Story:- आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने शेती क्षेत्राचे रुपडेच पालटून गेलेले आहे. तंत्रज्ञानाचा वापर आणि त्याला कष्टांची जोड तसेच विविध पिकांची लागवड या माध्यमातून शेतकरी आता खूप मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेऊ लागले असून काही शेतकरी कोटी रुपये उत्पन्न मिळवण्यामध्ये देखील यशस्वी झालेले आपल्याला दिसून येतात.यामध्ये बाजारपेठेचा अभ्यास, त्यानुरूप केलेली पिकांची लागवड व नियोजन इत्यादी बाबी खूप महत्त्वाच्या ठरतात.
कमीत कमी क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यामध्ये देखील शेतकरी यशस्वी होतात. तसेच काही शेतकरी अगदी 40 ते 50 एकर क्षेत्र असून या क्षेत्राचे देखील योग्य प्रकारे नियोजन करून पिकांची विविधता जोपासून खूप मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळवतात.
याच मुद्द्याला धरून जर आपण पुणे जिल्ह्यात असलेल्या आंबेगाव तालुक्यातील भागडी या गावच्या गोपाळ गवारे या शेतकऱ्याचा विचार केला तर टोमॅटो लागवड आणि झेंडू फुलशेती या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने आर्थिक उत्पन्न मिळवले आहे. या शेतकऱ्याने टोमॅटो आणि झेंडू या फुलशेतीचे नियोजन कसे केले? याबद्दलची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
आंबेगावच्या शेतकऱ्याने केली कमाल
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील भागडी या गावचे शेतकरी गोपाळ लक्ष्मण गवारे यांनी त्यांच्या शेतीमध्ये टोमॅटोची लागवड केलेली होती. आपल्याला माहित आहेच की यावेळेस टोमॅटोला कधी नव्हे एवढे उच्चांकी दर मिळाल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना फार मोठा फायदा झाला व तसाच फायदा गोपाळ गवारे यांना देखील झाला. साधारणपणे 1994 पासून ते टोमॅटोची लागवड करतात. या दरम्यानच त्यांनी 94 या सालापासून ते 97 या सालापर्यंत टोमॅटो आणि झेंडूचे उत्पादन घ्यायला सुरुवात केली.
अगोदर दोन ते तीन एकरामध्ये टोमॅटोचे पीक घेत असताना काही वेळा त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर कमी बाजार भाव मिळाल्याने तोटा देखील झाला व त्यानंतर त्यांनी टोमॅटोचे पीक क्षेत्रामध्ये घट केली. परंतु 2006 पासून दहा एकर जमिनीमध्ये त्यांनी परत टोमॅटो लावायला सुरुवात केली व आतापर्यंत 20 एकर क्षेत्रामध्ये त्यांनी टोमॅटोची लागवड केली आहे.उरलेल्या क्षेत्रात फुल पीक घेण्याचे ठरवले व झेंडूची लागवड केली. टोमॅटो उत्पादनातून त्यांना खूप चांगला फायदा झाला आणि झेंडू शेतीतून देखील त्यांना यावर्षी खूप मोठा फायदा होताना दिसून येत आहे.
तसे पाहायला गेले तर टोमॅटो सारखेच हे कुटुंब वीस वर्षापासून फुलशेतीत देखील आहेत. त्यांचे जर आपण झेंडू फुलशेतीचे नियोजन पाहिले तर सणासुदीचा कालावधी डोळ्यासमोर ठेवून त्या पद्धतीने ते नियोजन करतात. या वर्षी देखील त्यांनी 36 हजार झेंडूच्या रोपांची लागवड केली असून एकूण सात एकर क्षेत्र झेंडू फुल पिकाने व्यापले आहे. आतापर्यंत या सात एकर मधून जवळजवळ 35 टन झेंडूच्या फुलांचे उत्पादन त्यांना मिळालेले आहे व सध्याचा बाजार भाव साधारणपणे 40 रुपये प्रति किलो इतका आहे. या सगळ्या उत्पादनातून त्यांना आतापर्यंत दहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळाला आहे.
येणारा काळ हा सण आणि उत्सवांचा असल्यामुळे झेंडूच्या फुलांची मागणी वाढण्याची शक्यता असल्यामुळे अजून पाच ते दहा लाख रुपयांचा नफा मिळेल अशी अपेक्षा त्यांना आहे. जर आपण टोमॅटो आणि झेंडू या दोन्ही पिकांचे एकत्रित आर्थिक उत्पन्न पकडले तर सुमारे तीन महिन्यात त्यांना एक कोटी वीस लाखांचे उत्पन्न हाती आले आहे. या उत्पन्नामध्ये टोमॅटोचा खूप मोठा वाटा आहे.जसे महाराष्ट्रामध्ये इतर शेतकऱ्यांनी टोमॅटो विक्रीतून कोटींची उड्डाणे घेतली अगदी त्याच पद्धतीने गवारे यांनी देखील टोमॅटो उत्पादनातून खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक उत्पन्न मिळवले.