Scheme For Women:- केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून समाजातील आर्थिक दुर्बल घटकांचे जीवनमान सुधारावे याकरिता अनेक योजना राबविण्यात येत आहेत. अशा घटकांना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत करता यावे याकरिता या योजनांचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे.
अशा योजनांच्या माध्यमातून व्यवसाय उभारणीला देखील मदत केली जाते. स्वतःच्या व्यवसाय उभारणीतून अशा घटकांचे आर्थिक दृष्टिकोनातून सक्षमीकरण करणे व त्यांना स्वावलंबी बनवणे हा सरकारचा प्रमुख उद्देश आहे.
यासोबतच महिलांच्या बाबतीत विचार केला तर त्यांना सामाजिक सुरक्षितता व सामाजिक मानसन्मान मिळणे, आर्थिक दृष्टिकोनातून महिला स्वावलंबी होणे व त्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे याकरिता देखील महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून सरकारच्या अनेक योजना खूप महत्त्वाच्या आहेत.
या योजनांचा लाभ घेऊन महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात व आर्थिक दृष्टिकोनातून स्वावलंबी होऊ शकतात. त्यामुळे या लेखात आपण सरकारच्या अशा योजना बघणार आहोत ज्या योजनांच्या मदतीने महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात.
महिलांसाठी महत्त्वाच्या आहेत सरकारच्या या योजना
1- अन्नपूर्णा योजना- अन्नपूर्णा योजना ही सरकारची एक महत्वपूर्ण योजना असून या योजनेअंतर्गत सरकारच्या माध्यमातून महिला उद्योजकांना अन्न संबंधित व्यवसायामध्ये 50 हजार रुपये पर्यंत कर्ज देण्यात येते. या माध्यमातून मिळणारी रक्कम भांडी तसेच मिक्सर ग्राइंडर,
हॉट केस, टिफिन बॉक्स आणि वर्किंग टेबल इत्यादी उपकरणे खरेदी करण्यासाठी वापरली जाऊ शकते. अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कर्जानंतर पहिल्या महिन्याचा ईएमआय भरावा लागत नाही.
मिळालेल्या कर्जाची रक्कम 36 महिन्यामध्ये म्हणजे 36 महिन्याच्या मासिक हप्त्यांमध्ये परतफेड करावी लागते. या योजनेअंतर्गत घेतलेल्या कर्जाचा व्याजदर हा संबंधित बँक व बाजाराचा दर यावर ठरवला जातो.
2- महिलांसाठी असलेली मुद्रा कर्ज योजना- महिलांना त्यांचा व्यवसाय आर्थिक दृष्टिकोनातून मजबूत करता यावा याकरिता सरकारने महिलांसाठी मुद्रा कर्ज योजना सुरू केली आहे. या माध्यमातून ट्युशन सेंटर किंवा ब्युटी पार्लर सारख्या एखादा व्यवसाय महिलांना सुरू करता येतो.
विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत मिळणारे कर्जासाठी कुठल्याही गोष्टीची तारण ठेवण्याची आवश्यकता भासत नाही. या अंतर्गत तीन प्रकारे कर्ज दिले जाते व ते म्हणजे शिशु प्रकारांतर्गत 50 हजार रुपये कर्ज मिळते. किशोर कर्जाची रक्कम 50000 ते कमाल पाच लाख रुपये तर तिसरी श्रेणीमध्ये दहा लाख रुपयापर्यंत कर्ज मिळते.
3- स्त्री शक्ती योजना- ही महिलांसाठी असलेली एक वेगळ्या प्रकारचे सरकारी योजना असून या योजनेच्या माध्यमातून महिला उद्योजकांना काही सवलती देऊन आर्थिक दृष्ट्या आधार देण्यात येतो.
महिला उद्योजकांना त्यांच्या राज्य सरकारच्या उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत नाव नोंदणी करावी लागते व यामध्ये महिलांनी घेतलेल्या दोन लाख रुपयापेक्षा जास्त कर्जावर काही अंशी व्याज सवलत देण्यात येते.
4- स्टँड अप इंडिया योजना- ही योजना महिला आणि एससी एसटी प्रवर्गातील लोकांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्वपूर्ण योजना आहे व या अंतर्गत दहा लाख रुपयांपासून एक कोटी रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते.
स्टँड अप इंडिया योजनेच्या माध्यमातून महिला स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करू शकतात. या योजनेअंतर्गत मिळणारे कर्ज हे उत्पादन, सेवा तसेच कृषी संबंधित उपक्रम किंवा व्यवसाय क्षेत्रासाठी प्रामुख्याने दिले जाते.