Banana Crop Farming:- तरुण शेतकरी, शेतीमधील तंत्रज्ञान आणि आधुनिक व्यवस्थापन पद्धती यांचा मेळ जर शेतीमध्ये जुळून आला तर कमी क्षेत्रामध्ये देखील भरघोस आणि दर्जेदार असे पिकांचे उत्पादन मिळते. हे आपल्याला अनेक शेतकऱ्यांच्या उदाहरणावरून सध्या दिसून येत आहे.
शेतीमध्ये आलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान व त्या तंत्रज्ञानाचा वापर करून पीक पद्धतीत केलेला बदल आणि विविध फळबागा व भाजीपाला पिकांची लागवड शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे.या सगळ्या गोष्टींना मात्र कष्टाचे देखील जोड लागते व तेव्हा कुठे शेतीमध्ये यशस्वी होता येते.
अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण संगमनेर तालुक्यातील कोंची या गावचे प्रगतिशील युवा शेतकरी किरण गोसावी यांची जर यशोगाथा बघितली तर ती इतर शेतकऱ्यांना नक्कीच प्रेरणादायी असे आहे.
डोंगराळ भागामध्ये असलेल्या त्यांच्या शेतामध्ये त्यांनी नऊ किलोमीटर अंतरावरून पाईपलाईनच्या सहाय्याने पाणी आणून दीड एकर क्षेत्रामध्ये शेततळे बनवले व त्यामध्ये केळी पिकाचे यशस्वी उत्पादन घेतले असून त्यांची ही केळीची निर्यात इराणला देखील करण्यात आली आहे व पहिल्याच तोड्यात त्यांना जवळपास दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
किरण गोसावी यांनी अशा पद्धतीने केले केळीचे नियोजन
याबाबत सविस्तर वृत्त असे की, संगमनेर तालुक्यातील कोंची या गावचे प्रगतिशील युवा शेतकरी किरण गोसावी हे शेतीमध्ये सातत्याने अनेक प्रयोग करत असतात व या प्रयोगाचाच भाग म्हणून त्यांनी केळीची लागवड करण्याचे ठरवले. परंतु त्यांचे जे काही शेत होते ते पूर्ण डोंगराळ भागात असल्याने मात्र पाण्याची उपलब्धता नव्हती.
म्हणून त्यांनी अगोदर शेततळे उभारले व त्या ठिकाणहून तब्बल नऊ किलोमीटर अंतरावरून पाईपलाईनच्या साह्याने पाणी आणले व दीड एकर क्षेत्रामध्ये शेततळे बनवून पाण्याची व्यवस्था केली व दीड एकर क्षेत्रावर शेडनेटमध्ये फेब्रुवारी महिन्यात केळी रोपांची लागवड केली. शेडनेटसारख्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे दर्जेदार अशा केळीचे उत्पादन त्यांना मिळाले.
शेडनेटमध्ये केळी पिकवल्याने फळांचा आकार देखील चांगला आला व या केळीची थेट निर्यात इराणला करण्यात आली आहे. साधारणपणे दहा फेब्रुवारीला शेडनेटमध्ये मल्चिंग पेपरचा वापर करून त्यावर त्यांनी केळीच्या रोपांची लागवड केली होती. त्यानंतर साधारणपणे साडेनऊ महिन्यानंतर केळीचे घड काढणीला आले.
साधारणपणे याला 22 रुपये प्रति किलोचा दर मिळाला. कमीत कमी पाण्यात ठिबकच्या साह्याने पाण्याचे उत्तम नियोजन करून त्यांनी यशस्वीपणे पिकाचे उत्पादन मिळवले. केळीची लागवड करताना त्यांनी साडेसहा बाय पाच फूट अंतरावर दीड एकर क्षेत्रात 1250 केळीच्या रोपांची लागवड केली.
सध्या त्यांची केळीचे उत्पादन मिळायला लागले असून पहिल्या तोड्यात दहा टन केळीचे उत्पादन निघून सव्वा दोन लाख रुपयांचा नफा त्यांना मिळाला व आणखी 30 टन केळीचे उत्पादन मिळेल असा अंदाज त्यांना आहे.
शेडनेटमध्ये केळी लागवड केल्यामुळे त्यांना मजुरी कमी लागली तसेच औषधांची देखील मोठ्या प्रमाणावर बचत होण्यास मदत झाली व कमी कालावधीत पीक काढणीस तयार झाले.
महत्त्वाचे म्हणजे वादळ वाऱ्यापासून देखील पिकाचे संरक्षण होऊन नुकसान झाले नाही. तसेच फळांचा आकार देखील चांगला राहिला व पेपरचा वापर केल्यामुळे तणांचा प्रादुर्भाव न झाल्याने निंदणीचा खर्च देखील वाचला.सगळ्यात महत्वाचे म्हणजे केळीच्या रोपांवर शेडनेटमुळे बाहेरील वातावरणाचा कुठलाही विपरीत परिणाम न झाल्याने पीक दर्जेदार आले.
त्यांना मजुरी तसेच रोपे व खत तसेच औषध इत्यादींचा खर्च मिळून एक लाख दहा हजार रुपये एकूण खर्च आला. नारायणगाव येथील व्यापाऱ्याने शेताच्या बांधावर येऊन प्रति किलो बावीस रुपये या दराने त्यांच्या केळीची खरेदी केली.