Birth Certificate:- व्यक्तीच्या संदर्भात जर आपण कागदपत्रांचा विचार केला तर यामध्ये आधार कार्ड आणि पॅन कार्ड व शिधापत्रिका हे प्राथमिक स्वरूपातील महत्त्वाची कागदपत्रे आहेत व त्यानंतर त्याच्या शैक्षणिक कागदपत्रे देखील तितकेच महत्त्वाचे असतात. त्यामध्ये आधार कार्ड हे आता सर्वत्र लागू करण्यात आलेले असून अगदी तुमच्या बँक खात्यापासून तर तुमच्या पॅन कार्ड किंवा रेशन कार्डला देखील आधार नंबर लिंक करण्यात आलेला आहे.
त्यामुळे आधार कार्ड हे एक महत्त्वाचे कागदपत्र सरकारी कामांमध्ये पुरावा म्हणून वापरले जाते. त्या व्यतिरिक्त आता संपूर्ण देशामध्ये एक ऑक्टोबर 2023 पासून जन्ममृत्यू नोंदणी( सुधारणा ) कायदा 2023 लागू करण्यात आला असून जन्म दाखला म्हणजेच बर्थ सर्टिफिकेट आता अनेक सरकारी कामांसाठी पुरावा म्हणून वापरण्यात येणार आहे.
तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स काढायचे असेल किंवा मतदार यादी तयार करायची असेल, हा क्रमांक नोंदणी करिता तसेच विवाह नोंदणीसाठी व इतर सरकारी नोकरीच्या नियुक्तीसाठी देखील आता जन्म दाखला आवश्यक करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता जन्म दाखल्याच्या बाबतीत अनेक महत्त्वाच्या बाबी नागरिकांना माहीत असणे गरजेचे आहे.
उदाहरणच घ्यायचे झाले तर बऱ्याचदा जन्मदाखलावरील नावांमध्ये चूक असते किंवा नावाच्या स्पेलिंग मध्ये चूक झालेली असते. अशावेळी मुलांना शाळेत ऍडमिशन घेताना देखील समस्या निर्माण होऊ शकते. बालकांचा जन्म शहरातील एखाद्या दवाखान्यात होतो व संबंधित दवाखान्यातून जन्म प्रमाणपत्र मिळते.परंतु आवश्यक असलेला जन्माचा दाखला हा संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेकडून आपल्याला घ्यायचा असतो.
परंतु बऱ्याचदा पालक यामध्ये दुर्लक्ष करतात व तसा दाखला घेत नाही. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे जन्माची नोंद तर केली जाते परंतु त्यामध्ये नाव समाविष्ट केले जात नाही. त्यामुळे नंतर नाव समाविष्ट करणे खूप गरजेचे असते. या सगळ्या समस्यांच्या अनुषंगाने आपण या लेखात याविषयी काही महत्त्वाची माहिती बघणार आहोत.
जन्म दाखला मध्ये अशापद्धतीने समाविष्ट करा नाव
बऱ्याचदा बालकांचा जन्म होतो व जन्माची नोंद नावाशिवाय केली जाते. त्यामुळे काही दिवसानंतर नागरिक जन्म दाखल्यामध्ये मुलाचे किंवा मुलीचे नाव समाविष्ट करायला जातात व ते करता येते. ज्या नागरिकांच्या अथवा त्यांच्या पाल्यांची नावाशिवाय जन्म नोंदणी झाली आहे व याला पंधरा वर्षे उलटून गेले आहेत असे नागरिक जन्म दाखला मध्ये नाव समाविष्ट करून घेऊ शकतात.
दुसरे महत्त्वाचे म्हणजे 1969 पूर्वीच्या ज्या काही जन्म नोंदणी आहेत व त्यामध्ये देखील जर नावाचा समावेश नसेल तरी देखील नागरिक अर्ज करू शकता. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नागरिकांना जन्म दाखल्यात 27 एप्रिल 2036 पर्यंत नावाची नोंदणी करता येणार आहे व त्यानंतर मात्र जन्म दाखल्यामध्ये बाळाच्या नावाची नोंदणी करता येणार नाही असं देखील आरोग्य विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आल आहे.
अशा पद्धतीने नाव नोंदणीसाठी कुठे जायचे?
नाव नोंद करायचे असेल तर ज्या ठिकाणी जन्माची नोंदणी केली असेल तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेशी संपर्क साधणे गरजेचे आहे. त्यामध्ये जर आपण ग्रामीण भागाचा विचार केला तर या ग्रामीण भागात ग्रामसेवक व शहरी भागात नगरपरिषद किंवा महानगरपालिका यांच्याशी संपर्क साधने महत्त्वाचे आहे.
जन्म दाखल्यामध्ये नाव समाविष्ट करायचे असेल तर आधीच अर्जदाराच्या नावाच्या खात्रीसाठी संबंधितांचा शाळा सोडल्याचा दाखला तसेच दहावी व बारावीचे शैक्षणिक प्रमाणपत्र तसेच आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे लागतात व त्यानंतर नागरिकांना त्यांच्या नावासहित जन्म दाखले हे दिले जातात.
जन्म दाखल्यात नावात चूक असेल तर दुरुस्ती कशी करायची?
जन्मदाखल्यामध्ये जर नावात दुरुस्ती करायची असेल तर त्यासाठी प्रतिज्ञापत्र करून घेणे गरजेचे आहे व याकरिता शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर हे शपथपत्र अर्थात प्रतिज्ञापत्र तयार करून घ्यावे लागते. जन्म दाखल्यामध्ये नावात बदल किंवा दुरुस्ती करणेबाबत अशा टायटलचे ते शपथपत्र असणे गरजेचे असते.
यामध्ये अर्जदाराचे संपूर्ण माहिती तसेच जुने चुकलेले नाव किंवा त्यामागचं कारण जसं की नजर चुकीने नाव टाकण्यात आलं पण खरं नाव काय आहे अशी सविस्तर माहिती तुम्हाला शपथपत्रात नमूद करावी लागते. तुम्ही सेतू कार्यालय किंवा नोटरीच्या वकिलांकडून करून घेऊ शकतात.
या शपथपत्रासोबत पालकांचे आधार कार्ड तसेच बाळाचे आधार कार्ड असेल तर त्याची झेरॉक्स प्रत जोडणे गरजेचे असते. ही सगळी कागदपत्रे तुम्ही जमा केल्यानंतर एका आठवड्यात तुम्हाला दुरुस्ती करून जन्म दाखला मिळण्याची शक्यता असते.
जन्माची नोंद कुठे व कशी करतात?
बाळाचा जन्म झाल्यानंतर त्यासंबंधीची महत्त्वाची माहिती ग्रामपंचायत तसेच नगरपालिका किंवा महानगरपालिका यांना कळवावी लागते. जन्म शहरी किंवा ग्रामीण यापैकी कुठेही झाला असेल तरी जन्म झाल्यापासून 21 दिवसाच्या आत ही माहिती दिली गेली पाहिजे कारण 21 दिवसाच्या आत अशा पद्धतीची जन्माची माहिती देणे कायद्याने देखील बंधनकारक आहे. तुम्ही या 21 दिवसाच्या कालावधीमध्ये नोंद केली व जन्मदाखला मागितला तर त्याकरता कुठलेही शुल्क आकारले जात नाही.
परंतु या मुदतीमध्ये जर जन्म दाखला घेतला नाही तर त्याकरिता शासनाचे जे काही नियम आहेत त्याप्रमाणे लेट फी आकारली जाते. त्यानंतर बाळाच्या आई वडिलांच्या आधार कार्ड व प्रसूतीनंतर दवाखान्यातून मिळालेले जे काही जन्मपत्र आहे या आधारे संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था जन्म दाखला देत असतात व हाच जन्म दाखला आता बहुतेक सरकारी कामांसाठी एकमेव पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे.