नमस्कार मित्रांनो
रोज नवीन नवीन विषयावर “थोडंसं मनातलं” हे सदर लिहून कोरोना प्रदुर्भाव टाळण्याचे संदर्भात जनजागृती करतोय. त्याची दखल ही अहमदनगर मधील पत्रकार मंडळीनी घेतली. तसेच वाचकांनी सुद्धा फोन, मेसेज द्वारे आपल्या भावना आणि सूचना व्यक्त केल्या. धन्यवाद मित्रांनो.कोरोना संदर्भात काळजी कशी घ्यावी व कोणत्या नियमाचे काटेकोर पालन करावे या बाबतीत समाजमाध्यमावर, आकाशवाणी आणि वर्तमानपत्रातुन प्रशासन जनजागृती करतच आहे. लाॅकडाऊन चा आता कदाचित हा शेवटचा टप्पा असु शकेल अशी अपेक्षा आहे. पण अजून तरी तशा स्वरूपाचे आदेश प्रशासन आणि सरकार कडून आलेले नाहीत.
संपूर्ण जगभर कोरोना थैमान घालतोय. आपल्या देशात ही कोरोनाचा प्रभाव आहेच हे वेगवेगळे माध्यमातून व वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या वरून समजते. कोरोनाचा प्रदुर्भाव टाळण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून 31 जूलै पर्यंत टप्प्याटप्प्याने लाॅकडाऊन जाहीर केला आहे. लाॅकडाऊन च्या काळात सर्व व्यवहार बंद असल्याने अर्थिक घडी विस्कळीत झाली आहे याचा विचार करून काही प्रमाणात लाॅकडाऊन व संचारबंदी शिथील केली आणि काही व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली आहे. अहमदनगर शहरातील लोकांना येणा-या अडचणी विचारात घेऊन, तसेच लोकांना रोजगार मिळेल याचा विचार करूनच प्रशासनाने व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली आहे.
अहमदनगर सध्या नाॅन रेड झोन मध्ये असल्याने टप्प्याटप्प्याने व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली होती. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील बफर आणि कंटेनमेंट भाग वगळता जवळपास सर्व भागामध्ये दुकान उघडी करण्याची परवानगी दिली आहे. अर्थात प्रशासनाने दिलेल्या नियमाचे काटेकोर पालन करूनच याला परवानगी दिली आहे. असे असताना सोशल डिस्टन्स ठेवला पाहिजे, मास्क वापला पाहिजे, सॅनिटायझर वापरले पाहिजे, तसेच गर्दी टाळली पाहिजे या सुचना पण दिल्या. परंतु आता कापडबाजार सुरू झाला आहे.
अनेक जबाबदार नागरिकांनी प्रशासनाचे सर्व नियम पाळले तसेच ग्राहकांमध्ये सुद्धा उत्साह निर्माण झाला आहे. जनतेच्या दृष्टीने खरोखर ही आनंदाची गोष्ट आहे. परंतु अजुनही काही बेजबाबदार लोकांनी आणि दुकानदारानी प्रशासनाचे आदेश धाब्यावर बसवले असल्याचे निदर्शनास आले आहे. याचा अर्थ आम्ही फक्त प्रशासनाचीच बाजु लोकांचे समोर मांडतो असे नाही. जे मनात आले ते लिहित गेलो आहे. रोडवर भरणारा भाजीपाला बाजार, चितळेरोड, कापड बाजार आणि मार्केट यार्ड मध्ये दुकानात झालेली तुडुंब गर्दी पाहून तर लोकांनी अक्षरशः प्रशासनाचे आदेश धुडकावून लावले की काय असे क्षणभर वाटले. त्यामुळे कधी कधी काही बेजबाबदार वागणारे विक्रेते विनाकारण भाववाढ करतात. त्यामुळे नागरिक हो सुरक्षितपणे खरेदी करा हि विनंती.
खरं सांगायचं तर कोरोना जातपात आणि धर्म पहात नाही. त्याचा प्रदुर्भाव कोरोना बाधीत व्यक्ती संपर्कात आल्यानेच कोरोना ची लागण होत आहे. त्यासाठी आपणच आपली काळजी घेणे आवश्यक आहे. सर्व बाजारपेठा खुल्या झाल्या याचा अर्थ असा नाही की आपण पूर्ण पणे मनाला येईल तसे वागायचे. अजून ही इथले भय संपले नाही याची जाणीव नागरिकांनी ठेवावी अशी अपेक्षा आहे.
बेजबाबदार लोकांच्या वागणूकी अनेक जबाबदार नागरिक पण अडचणीत येतात. खरं तर प्रशासन कायमच आपल्या सोबत असल्याने आपणच प्रशासनाला मदत करायला पाहिजे. वास्तविक दोन दिवसात सोशल डिस्टन्स चा फज्जा उडाला आहे. त्यामुळेच “सोशल डिस्टन्स” म्हणजे काय रे भाऊ? असं म्हणायची वेळ आली आहे. पोलिस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन तसेच महापालिका प्रशासन यानी फोर्सफुली उपाययोजना करणे गरजेचे आहे तरच काही प्रमाणात हा प्रश्न मार्गी लागेल असे वाटते. फक्त गुन्हे दाखल करून हा प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे आदेशाचे उल्लंघन केले तर जास्तीत जास्त दंड आकारला पाहिजे.
विनाकारण गुन्हे दाखल करून काहीच उपयोग होत नाही. कारण अगोदरच न्यायालयात किती तरी केसेस पेंडीग आहेत, त्यामुळे दंड आकारला पाहिजे. नियम मोडणे ही आता फॅशन झाल्या सारखी वाटायला लागली आहे. दुचाकी वाहनांना परवानगी दिली आहे, परंतु एकाच दुचाकीवर तीन तीन लोक प्रवास करताना अनेक वेळा दिसतात. आता जिल्हाधिकारी साहेब यांनी प्रत्येक पोलिस स्टेशन च्या हद्दीत चेक पोस्ट तयार केली आहेत व बेजबाबदार लोकांवर केसेस दाखल करा असे आदेश दिले आहेत. तसेच सायंकाळी 7 ते सकाळी 5 पर्यंत संचारबंदी कडक केली आहे. खर तर लाॅकडाऊन च्या काळात प्रवास करण्यासाठी परवानगी नव्हती तेव्हा अपघाताचे प्रमाण कमी झाले होते.
परंतु पास काढून प्रवास करण्यासाठी परवानगी दिल्यामुळे अनेक अपघात झाले आहेत आणि कोरोनाचा प्रसार सुध्दा झाला आहे. आता दोन तीन दिवसातच चारपाच अपघात होऊन काही लोक मृत्युमुखी पडले आहेत. नागरिक हो, जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन, डाॅक्टर आणि नर्स लोकप्रतिनिधी, महापालिका प्रशासन, सामाजिक संस्था, समाजसेवक, शिक्षक मंडळी आणि इतर कोरोना योद्धे आपण सगळे सुरक्षित रहावे म्हणूनच स्वतः ची व कुटुंबाची पर्वा न करता जनतेची काळजी घेत आहेत याची जाणीव आपणच ठेवली पाहिजे अन्यथा आपणच आपला जीव धोक्यात घालण्यास जबाबदार असणार आहोत.
प्रशासनाला पण जनतेच्या अडचणी समजतात, ते सुद्धा छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेत नाहीत, याचा अर्थ त्यांचे लक्ष नाही असा गैरसमज करून घेऊ नये. प्रत्येक वेळी कायदाच वापरण्याची गरज नसते, काही वेळा सांमजस्याने पण बरेच प्रश्न सुटतात. जनता सुरक्षित रहावी म्हणून अनेक कोरोना योद्धे बळी गेले आहेत. आपल्याला या लाॅकडाऊन ने बरेच काही शिकवले आहे. त्यामुळे पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून आपणच खबरदारी घेणे आवश्यक आहे. लाॅकडाऊन च्या काळात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. अनेकांना रोजगार नव्हता, छोटे छोटे व्यवसाय बंद होते त्यामुळे खुप मोठी अर्थिक घडी विस्कळीत झाली आहे.
शेतक-यांचे ही खुप नुकसान झाले आहे. आता त्यांची बी बियाणे , औषधे खरेदी करण्याची लगबग आहे. पण शेतकरी बांधवांनी सुद्धा काळजी घ्यावी. तुम्ही जगाचे पोशिंदे आहात. त्यामुळे शेतकरी जगला तर देश जगेल. आता व्यवसाय सुरू झाल्याने कदाचित लवकरच पुन्हा जनजीवन सुरळीत चालू होईल. परंतु सगळे काही सुरक्षित आणि सुरळीत होण्यासाठी आपण सर्वांनीच काळजी घेणे व शासकीय सूचनाचे पालन करावे ही नम्र विनंती. आपण सुजाण नागरीक म्हणून प्रशासनाला साथ दिली पाहिजे. आपल्या परिसरात नवीन संशयास्पद कोणी आढल्यास प्रशासनाचे निदर्शनास आणून दिले पाहिजे. त्यामुळे काळजी घ्यावी हि विनंती आहे . प्रशासन आणि नागरिकांनी मिळून ही लढाई लढणे गरजेचे आहे. त्यामुळे शासकीय सूचना चे काटेकोर पालन करावे ही नम्र विनंती. सुरक्षित आणि सुरळीत जनजीवनासाठी तुम्हाला खुप शुभेच्छा. घरीच रहा सुरक्षित रहा
ॲड शिवाजी अण्णा कराळे
सदस्य जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर
99 22 545 545