Poultry Farming:- शेतीला जोडधंदा म्हणून जे काही व्यवसाय केले जातात त्यामध्ये कुक्कुटपालन हा व्यवसाय अगदी कित्येक वर्षापासून भारतात केला जातो व अगदी परसातील कुक्कुटपालन ही संकल्पना भारतामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागात आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसून येते.
यामध्ये देशी जातीच्या म्हणजेच गावरान कोंबड्या पालनाकडे शेतकऱ्यांचा कल आपल्याला दिसून यायचा परंतु आता कुक्कुटपालन व्यवसायामध्ये तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर आल्याने हा व्यवसाय व्यावसायिक दृष्टिकोनातून अनेक बेरोजगार तरुण मोठ्या प्रमाणावर करताना दिसून येत आहेत
पोल्ट्रीमध्ये ब्रॉयलर कोंबड्यांचे पालन तसेच देशी कोंबड्यांच्या वेगवेगळ्या विकसित करण्यात आलेल्या जातींचे पालन करून अनेक बेरोजगार तरुण आणि शेतकरी लाखो रुपयांचे उत्पन्न या माध्यमातून मिळवत आहे. देशी कोंबड्यांचे पालन करायचे असेल तर याकरिता आता अनेक जाती देखील विकसित करण्यात आलेले आहेत व या माध्यमातून अंडी व मांस उत्पादन हा प्रमुख आर्थिक उत्पन्नाचा स्रोत आहे.
कुक्कुटपालन व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून कर्ज सुविधा देखील मिळते व त्यामुळे बेरोजगार तरुणांना कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करणे सोपे जाते.
देशी कोंबड्यांच्या जातींमध्ये अनेक प्रकार असून कोंबडी पालन व्यवसाय सुरू करताना योग्य व दर्जेदार जातीची निवड करणे गरजेचे असते.त्यामुळे या लेखांमध्ये आपण कोंबडीच्या एका महत्त्वाच्या अशा जातीची माहिती घेणार आहोत व तिचे नाव आहे कॅरी निर्भिक हे होय. याच कोंबडीच्या जातीची वैशिष्ट्ये आपण या लेखात बघू.
कॅरी निर्भिक कोंबडीच्या जातीची वैशिष्ट्ये
कोंबड्यांमध्ये आपल्याला अनेक जाती आढळून येतात व प्रत्येक जातीची वेगवेगळी अशी गुणवैशिष्ट्ये असतात. या सगळ्या कोंबड्यांच्या जातींमध्ये जर आपण कॅरी निर्भीक जात पाहिली तर ती कोंबडी पालनाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आणि फायदेशीर अशी जात आहे.
या जातीच्या कोंबडीचे मांस हे उत्तम दर्जाचे असते व अंड्याचे उत्पादन देखील या कोंबड्यांची जास्त असते. या कोंबडीचे पालन करून किंवा संगोपन करून कुक्कुटपालन करणारे लघुउद्योजक देखील या माध्यमातून चांगला नफा कमवू शकतात. कोंबड्यांची ही एक देशी जात असून या कोंबडीचे मांस प्रथिनांनी समृद्ध असे आहे.
तसेच ही कोंबडी अतिशय चपळ असते व आकाराने मोठी तसेच दिसायला देखील सुंदर दिसते व स्वभावाने या जातीच्या कोंबड्या लढाऊ आणि मजबूत प्रतिकारशक्ती असलेल्या असतात. वीस आठवड्याच्या आतमध्ये या कोंबड्यांचे वजन तब्बल १८४७ ग्रॅम म्हणजेच दीड किलोच्या पुढे पोहोचते.
जर आपण या कोंबड्यांची अंडी उत्पादन क्षमता पाहिली तर ती प्रत्येक वर्षाला 190 ते 200 अंडी पर्यंत असून एका अंड्याचे वजन 45 ग्रॅम असते. त्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या या कॅरी निर्भिक जातीच्या कोंबडीचे पालन करून शेतकरी दुप्पट नफा या माध्यमातून मिळवू शकतात.
विशेष म्हणजे ही कोंबडीची जात इंडो- जर्मन यांच्या संयुक्त प्रयत्नातून विकसित करण्यात आलेली आहे व ही 2000 यावर्षी विकसित करण्यात आली.