Chilli Farming : भारतात मसाला पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मिरची हे देखील एक प्रमुख मसाला पीक असून याचा भाजीपाला पिकात देखील समावेश केला जातो. मिरचीची लागवड आपल्या राज्यासहं संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात केली जाते. मिरचीला बाजारात मोठी मागणी असल्याने निश्चितच अल्पकालावधीत या पिकाच्या शेतीतून शेतकऱ्यांना चांगली कमाई होते.
जाणकार लोक देखील शेतकरी बांधवांना काळाच्या ओघात बदल करत हंगामी तसेच भाजीपाला वर्गीय पिकांच्या शेतीला देखील प्राधान्य दिले पाहिजे असा सल्ला देत आहेत. मात्र असे असले तरी कोणत्याही हंगामी पिकातून चांगले दर्जेदार असे उत्पादन मिळवण्यासाठी त्या पिकाच्या सुधारित जातींची शेती करण्याचा सल्ला जाणकार लोकांकडून दिला जातो.
अशा परिस्थितीत मिरचीच्या शेतीतून चांगले उत्पादन मिळवण्यासाठी मिरचीच्या सुधारित जातींची लागवड करणे आवश्यक आहे. यामुळे आज आपण आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी मिरचीच्या काही सुधारित जातींची माहिती घेऊन हजर झालो आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया मिरचीच्या काही सुधारित जाती.
पुसा ज्वाला :- मिरचीची ही एक सुधारित जात म्हणून ओळखली जाते. या जातीला ICAR-IARI नवी दिल्लीने विकसित केले आहे. या जातीच्या मिरच्या मध्यम आकाराच्या असतात. शिवाय या जातीपासून विक्रमी उत्पादन देखील मिळते. ही जात थ्रिप्स आणि माइट्स सारख्या कीटकांना सहनशील असल्याचा दावा जाणकारांनी केला आहे. कृषी तज्ञांच्या मते, या जातीपासून ८.५ टन हेक्टर इतके हिरवी मिरचीचे उत्पादन घेतले जात आहे आणि १.८ टन प्रति हेक्टर सुकी लाल मिरचीचे उत्पादन यापासून मिळू शकते.
पंत सी 1: मिरचीची ही एक सुधारित जात म्हणून शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. या जातीची एक मोठी विशेषता म्हणजे या जातीच्या मिरच्या वरच्या दिशेने वाढतात. पंत C1 वाण मोझॅक आणि लीफ कर्ल विषाणूंना माफक प्रमाणात प्रतिरोधक असल्याचा दावा देखील केला जात आहे. मिरचीच्या या प्रगत जातीपासून 7.5 टन हेक्टरी हिरवी मिरचीचं उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जातो आणि जर लाल मिरची उत्पादनाबाबत बोलायचं झालं तर 1.5 टन हेक्टरी सुकी लाल मिरचीचे उत्पादन यापासून मिळत असल्याचे सांगितले जाते.